लोकांचा आवाज ऐकला नाही तर असंतोष वाढतो. सरकारने तो टप्पा येऊ देऊ नये. संघर्ष दडपण्यापेक्षा त्यामागची कारणे दूर करणे, हाच लोकशाहीचा खरा मार्ग आहे.
एखादी रिअल इस्टेट कंपनी राजकीयदृष्ट्या प्रभावशाली व्यक्तींशी संबंधित जमीन खरेदी करते, त्यानंतर त्या जमिनीवर संपूर्ण गावाचे भौगोलिक, सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय चित्र बदलण्याची क्षमता असलेला महाकाय प्रकल्प उभा राहतो आणि सरकारी यंत्रणांकडून त्याला झपाट्याने परवानग्या मिळतात, तेव्हा प्रश्न विचारणे हा गुन्हा ठरू शकत नाही. अशा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या गावकऱ्यांना सरसकट ‘विकासविरोधी’ किंवा ‘सरकारविरोधी’ ठरवणेही योग्य नाही.
कारापूर-सर्वणचा संघर्ष याच पार्श्वभूमीवर समजून घ्यावा लागेल. हाऊस ऑफ अभिनंदन लोढाच्या प्रकल्पाशी संबंधित जमिनीच्या मालकी हक्कावरच आता न्यायालयीन वाद उभा राहिला आहे. राणे कुटुंबातील सदस्यांनी दाखल केलेला दावा न्यायालयात पुढे चालणार आहे. न्यायालयाने अद्याप मालकी हक्काबाबत अंतिम निर्णय दिलेला नाही; पण दावा प्राथमिक टप्प्यात फेटाळला गेला नसल्याने प्रश्न गंभीर असल्याचे निश्चितपणे म्हणता येते.
त्याचवेळी प्रकल्पाला नगर नियोजन खाते आणि अन्य सरकारी यंत्रणांकडून मिळालेल्या मंजुऱ्यांच्या प्रक्रियेबाबत आंदोलनकर्त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. स्थानिक पंचायतीने अखेर कामबंद आदेश जारी केला, ही बाबही दुर्लक्षित करता येणार नाही.
तब्बल १६१ दिवस आंदोलन करणाऱ्या कारापूरवासीयांना मात्र आता वेगळ्याच लढाईला सामोरे जावे लागत आहे. आंदोलनाशी संबंधित व्यक्तींविरोधात पोलिस तक्रारी, खंडणीचे आरोप, अटक, मानहानीचे दावे आणि राज्याबाहेरून येणाऱ्या चौकशीच्या नोटिसांमुळे एक मूलभूत प्रश्न निर्माण होतो. असहमती व्यक्त करणाऱ्या नागरिकांचा आवाज कायदेशीर प्रक्रियांच्या ओझ्याखाली दाबला जातो आहे का?
स्वप्नेश शेर्लेकर यांच्या व्हिडिओवर थेट अयोध्येतील भाजप युनिटने तक्रार दाखल करणे आणि त्याच अयोध्येत हाऊस ऑफ अभिनंदन लोढाचा मोठा व्यावसायिक प्रकल्प असणे यामुळे प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. मात्र या दोन घटनांमध्ये प्रत्यक्ष संगनमत असल्याचा पुरावा अद्याप समोर आलेला नाही. म्हणूनच संबंधितांनी याबाबत पारदर्शक स्पष्टीकरण देणे अधिक आवश्यक ठरते.
लोकशाहीमध्ये सरकारला प्रश्न विचारणे, विकासाच्या स्वरूपावर आक्षेप घेणे आणि आपल्या गावाच्या अस्तित्वासाठी आंदोलन करणे हा नागरिकांचा अधिकार आहे. त्याचे उत्तर पोलिस तक्रारी आणि खटल्यांच्या मालिकेतून मिळत असल्याची भावना निर्माण होणे सरकारसाठीही धोक्याची घंटा आहे.
कारापूरचा प्रश्न केवळ एका बिल्डरचा किंवा एका गावाचा राहिलेला नाही. प्रश्न आहे गोव्याच्या जमिनीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नेमका कुणाचा?
लोकांचा आवाज ऐकला नाही तर असंतोष वाढतो. सरकारने तो टप्पा येऊ देऊ नये. संघर्ष दडपण्यापेक्षा त्यामागची कारणे दूर करणे, हाच लोकशाहीचा खरा मार्ग आहे.







