
सरकारातील मंत्र्यांमध्ये नाराजी, नाव जाहीर करण्याचे आव्हान
पणजी,दि.६(प्रतिनिधी)
माजीमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी सरकारातील एका मंत्र्याला १५ ते २० लाख रूपये लाच दिल्याचा आरोप केल्यानंतर आज या आरोपांच्या चौकशीच्या मागणीने जोर धरला आहे. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांना राज्यपालांकडे तर आरटीआय कार्यकर्ते सुदिप ताम्हणकर यांनी भ्रष्टाचार विरोधी विभागाकडे लेखी तक्रार दाखल करून या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.
नाव घ्या… काहीच फरक पडत नाही…
माजीमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी केलेल्या आरोपांबाबत वाहतुकमंत्री मॉविन गुदीन्हो यांनी थेट नाव घ्या,असे आवाहन केले होते. आज महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांनी मडकईकर यांनी पैसे नेमके कुणाला दिले, मंत्र्याला की अन्य कुणाला हे स्पष्ट करावे,असे सांगितले तर नगर विकासमंत्री विश्वजीत राणे यांनी आपल्याला काहीच फरक पडत नाही,अशी प्रतिक्रिया दिली. या विविध प्रतिक्रियांवरून आता हा मंत्री नेमका कोण,अशी नवी चर्चा सुरू झाली आहे. जनतेकडून सर्वंच मंत्र्यांबाबत आता सार्वजनिक ठिकाणी चर्चा सुरू झाली असून हा मंत्री कोण असावा, याबाबत प्रत्येकजण आपापले अंदाज व्यक्त करत आहेत.
मंत्री कोण हे मडकईकरच सांगू शकतात- मुख्यमंत्री
पैसे घेणारा तो मंत्री कोण हे केवळ पांडुरंग मडकईकरच सांगू शकतात. त्यांनी केलेल्या विधानात कुणाचेही नाव घेतलेले नाही आणि त्यामुळे कुणावरही संशय घेणे योग्य ठरणार नाही,असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
सीबीआय चौकशी करा
काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी मडकईकरांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हावी,अशी मागणी केली आहे. एका माजी मंत्र्यांकडून झालेला हा आरोप गंभीर आहे. भ्रष्टाचाराला थारा देणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात मग या प्रकारावर सरकार गप्प का,असा सवाल कवठणकर यांनी केला. आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी भ्रष्टाचार विरोधी विभागाकडे तक्रार दाखल करून मडकईकर यांना नोटीस पाठवून यासंबंधी त्यांची जबानी नोंदवून तो मंत्री कोण, हे जाणून घ्यावे आणि ताबडतोब कारवाई करावी,अशी मागणी केली आहे.