‘मडगांवचो आवाज’ तर्फे अभिनव निषेध
गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी)
मडगाव मल्टीस्टोरेज पार्किंग कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन १५ सप्टेंबर २०१५ रोजी मोठ्या दिमाखात पार पडले. मात्र, दहा वर्षांनंतरही या प्रकल्पाची एकही वीट बसवली गेली नसल्यामुळे ‘मडगांवचो आवाज’ या संघटनेने या प्रकल्पाला श्रद्धांजली अर्पण करत अभिनव निषेध नोंदवला. हा प्रकल्प स्थानिक आमदाराच्या निष्क्रियतेचे प्रतीक ठरल्याचा आरोप युवा नेते प्रभव नायक यांनी केला.
मडगावमधील वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्येचे समाधान म्हणून या प्रकल्पाची आखणी करण्यात आली होती. परंतु, हा प्रकल्प गेली दहा वर्षे खितपत पडला आहे. मडगावच्या आमदाराला हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात सपशेल अपयश आले, अशी टीका नायक यांनी केली.
मडगावकरांना दररोज वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्यांमुळे त्रास सहन करावा लागतो. हा प्रकल्प पूर्ण झाला असता तर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असता. शहरासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत अपयशी ठरलेले आमदार हे अकार्यक्षमतेचे जिवंत उदाहरण आहेत, असे नायक म्हणाले.
पक्षबदलू आमदार तथा मंत्री दिगंबर कामत यांनी नेहमीच मडगावची फसवणूक केली असून विकासाच्या केवळ बाता मारल्या आहेत. शहराला दिलासा देणारा हा प्रकल्प आज पोकळ आश्वासनांचे प्रतीक ठरला आहे.
प्रभव नायक यांनी निदर्शनास आणून दिले की, दरवर्षी या प्रकल्पाच्या सुरूवातीस होणारे अपयश हे स्थानिक आमदाराच्या निष्क्रियतेचा आणि अकार्यक्षमतेचा स्पष्ट पुरावा आहे. मल्टीस्टोरेज पार्किंग कॉम्प्लेक्स आज अकार्यक्षमतेचे स्मारक बनले असून जनतेच्या अपेक्षा शिलान्यासाच्या दगडाखाली गाडल्या गेल्या आहेत.
‘मडगांवचो आवाज’ ही संघटना नागरिकांना अशा खोट्या आणि फसव्या आश्वासनांची आठवण करून देत राहील. आमचा लढा केवळ पार्किंग प्रकल्पापुरता मर्यादित नसून, वारंवार निवडून येऊनही अपयशी ठरलेल्या लोकप्रतिनिधींना जबाबदार धरण्याचा आहे, असे नायक यांनी स्पष्ट केले.
आज या प्रकल्पाच्या शिलान्यास नामफलकावर पुष्पचक्र अर्पण करून ‘मडगांवचो आवाज’ने एक ठाम संदेश दिला आहे. मडगावचे तरुण यापुढे निष्क्रियता आणि अकार्यक्षमतेचे मूक साक्षीदार राहणार नाहीत. मडगावकरांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा पुरवणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे, असा ठाम दावा प्रभव नायक यांनी केला.





