मुख्य सूत्रधारांना हुडकून काढाच…

रामा काणकोणकर यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना पकडून मूळ सूत्रधाराच्या मुसक्या आवळण्यात पोलिस यशस्वी ठरले, तर जनतेच्या मनातील पोलिसांची प्रतिमा नक्कीच सुधारेल.

सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहेत. सर्वच राजकीय विरोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. दिवसाढवळ्या राजधानीच्या कार्यक्षेत्रात, तोंडावर बुरखा न घालता बिनधास्तपणे रामा काणकोणकर यांना जी क्रूर मारहाण करण्यात आली, आणि विशेष म्हणजे मारहाण करत असताना गुंडांपैकी एकजण मोबाईलवरून या घटनेचे चित्रीकरण करत होता, हे सीसीटीव्ही फुटेजवर पाहिल्यानंतर तळपायाची आग मस्तकात जाणे स्वाभाविकच आहे.
पोलिसांनी तत्परतेने ६ पैकी ५ जणांना अटक केली आहे. हे सर्वजण सराईत गुन्हेगार असल्याचे सांगितले जाते. याचा अर्थ असा की कुणीतरी या गुंडांना रामा काणकोणकर यांच्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली होती, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे केवळ गुंडांना अटक करून भागणार नाही, तर या घटनेमागचा खरा सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेणे पोलिसांसाठी अत्यावश्यक आहे.
सामाजिक कार्यकर्ते हा घटक गोवा मुक्तीपूर्व आणि मुक्तीनंतरही गोव्याच्या सामाजिक व राजकीय रचनेचा महत्त्वाचा भाग ठरलेला आहे. या सामाजिक चळवळीतून अनेक विषय मार्गी लागले आहेत. राजकीय व्यवस्थेवर नजर ठेवण्यासाठी आणि वचक निर्माण करण्यासाठी सामाजिक चळवळीची गरज आहे. काँग्रेसच्या काळात ह्याच सामाजिक कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून तत्कालीन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी काम केले आणि भाजपला सत्तेत आणले. आज भाजप सत्तेत आहे, परंतु काँग्रेस सामाजिक कार्यकर्त्यांपासून दोन हात लांबच आहे, याचे कारण सत्ताधाऱ्यांची भीती असावी.
आज सत्ताधाऱ्यांची दहशत इतकी वाढली आहे की सर्वच राजकीय विरोधक मोजून-मापून काम करताना दिसतात. अशा वेळी निर्भयपणे आणि जिवावर उदार होऊन सामाजिक व राजकीय विषयांवर बोलणारे सामाजिक कार्यकर्ते हेच आपले तारणहार आहेत, असे लोकांना वाटले तर त्यात वावगे काय?
रामा काणकोणकर यांच्यावर अलिकडच्या काळात झालेला हा तिसरा हल्ला आहे. यापूर्वी दोन हल्ले झाले होते, त्यात नेमके कुणाला अटक झाली होती आणि त्या हल्ल्यांमागची कारणे काय होती, हे पोलिसांनाच ठाऊक असेल. आता हा तिसरा प्राणघातक आणि हिंसक हल्ला सर्वसामान्यांच्या मनात भीती निर्माण करणारा ठरला आहे. या हल्ल्यातही तीच माणसे सहभागी असल्यामुळे, असे काय कारण आहे की ते वारंवार रामा काणकोणकर यांच्यावर हल्ला करत आहेत, हे शोधणे पोलिसांसाठी खरी कसोटी ठरेल.
सामाजिक कार्यकर्त्यांना खंडणीखोर म्हणून हिणवणे ही तर सध्या एक स्टाईलच बनली आहे. परंतु तसे जर खरोखरच घडत असेल, तर त्याचाही शोध घेणे गरजेचे आहे, जेणेकरून जे प्रामाणिकपणे सामाजिक कार्य करतात, त्यांच्यावर तरी अशा आरोपांचे धाडस कुणी करणार नाही.
पोलिसांनी पकडलेल्या गुंडांना जर खरोखरच खाकीचा जोर दाखवला, तर नक्कीच मूळ सूत्रधारांची माहिती मिळू शकते. पण ही माहिती सार्वजनिक करण्याचे धाडस पोलिस करतील का, हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
अलिकडेच पोलिस महासंचालक आलोक कुमार यांची एक मुलाखत पाहिली. ते ज्या पद्धतीने बोलतात किंवा जनतेच्या मनात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्याच्या नेमका उलट अनुभव लोकांना येतो. पोलिस हे पूर्णतः राजकीय हुकुमांचे ताबेदार बनले आहेत, असे लोकांना वाटते. आपल्याला पोलिसांकडून न्याय मिळणार नाही आणि कुणा राजकीय नेत्याचा वशिला लावल्याशिवाय पोलिस मदतीला येणार नाहीत, असे चित्र पसरले आहे. हे चित्र बदलण्याचे आव्हान पोलिस महासंचालकांनी स्वीकारले पाहिजे.
रामा काणकोणकर यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना पकडून मूळ सूत्रधाराच्या मुसक्या आवळण्यात पोलिस यशस्वी ठरले, तर जनतेच्या मनातील पोलिसांची प्रतिमा नक्कीच सुधारेल.

  • Related Posts

    जमीन हडप; जाळे किती खोल ?

    जमीन खरेदी-विक्री करणाऱ्याची चौकशी करून उपयोग नाही. त्या व्यवहाराला आवश्यक कागदपत्रे, परवानग्या किंवा प्रशासकीय मान्यता कोणी आणि कोणत्या आधारावर दिली, हेही तपासले गेले पाहिजे. गोव्यातील जमीन हडप प्रकरणांची व्याप्ती पाहता…

    इन्कलाब झिंदाबाद !

    गोव्याचा युवक आपल्या जमीन, रोजगार, पर्यावरण आणि भवितव्याबाबत निर्भयपणे सवाल करू लागला, तर त्याच्या प्रश्नांना उत्तर दिले जाईल की त्याच्या सवालांनाच समस्या मानून त्यांना दिमागी नक्षल म्हटले जाईल ? शहीद…

    You Missed

    Carrying Capacity Study Pending, Yet Tuem Panchayat Clears Houses With Swimming Pools

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 29, 2026
    • 16 views
    Carrying Capacity Study Pending, Yet Tuem Panchayat Clears Houses With Swimming Pools

    29/09/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 29, 2026
    • 8 views
    29/09/2026 e-paper

    जमीन हडप; जाळे किती खोल ?

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 29, 2026
    • 22 views
    जमीन हडप; जाळे किती खोल ?

    चला दोस्त हो, भवितव्यावर ‘बोलू काही’ !

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 29, 2026
    • 28 views
    चला दोस्त हो, भवितव्यावर ‘बोलू काही’ !

    Let the Youth Speak: ‘Youth Connect’ to Discuss Goa’s Future

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 29, 2026
    • 16 views
    Let the Youth Speak: ‘Youth Connect’ to Discuss Goa’s Future

    काश्मिरा खोतची स्वतंत्र संगीतविश्वात झेप

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 28, 2026
    • 19 views
    काश्मिरा खोतची स्वतंत्र संगीतविश्वात झेप