‘नशामुक्त गोवा’चा नारा आणि महसुलाची नशा !

एका हातात ‘नशामुक्ती’चा फलक आणि दुसऱ्या हातात मद्य-कॅसिनोंच्या महसुलाचा हिशेब घेऊन आपण नेमके कोणते गोवा घडवत आहोत?

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘नशामुक्त भारत’ घडविण्याचे आवाहन केले. अशा आवाहनाचे स्वागतच व्हायला हवे. पण प्रश्न घोषणेचा नाही, सरकारच्या धोरणाचा आणि कृतीचा आहे. नशामुक्ती ही एखाद्या दिवसाची रॅली, भाषण किंवा सरकारी इव्हेंट नाही. ती खरोखरच ध्येय असेल तर सरकारला स्वतःच्या महसूल धोरणांकडेही आरशात पाहावे लागेल.

गोव्याच्या वास्तवाकडे पाहिले तर हा विरोधाभास अधिक ठळक होतो. राज्याच्या अधिकृत आकडेवारीनुसार २०२४-२५ मध्ये उत्पादन शुल्कातून तब्बल ९४७.८७ कोटी महसूल मिळाला. २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात राज्य उत्पादन शुल्कातून १,०५० कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. दुसरीकडे, विधानसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२६ या काळात कॅसिनोंमधून सरकारला १,७४९ कोटींहून अधिक महसूल मिळाला. राज्यात १७ ऑनशोअर आणि सहा ऑफशोअर अशा २३ कॅसिनो परवान्यांची नोंद आहे.

म्हणूनच सवाल विचारावा लागतो एका हातात ‘नशामुक्ती’चा फलक आणि दुसऱ्या हातात मद्य-कॅसिनोंच्या महसुलाचा हिशेब घेऊन आपण नेमके कोणते गोवा घडवत आहोत?

नशामुक्तीचा अर्थ मद्य किंवा कॅसिनो उद्योग एका रात्रीत बंद करणे एवढाच सरधोपट असू शकत नाही. पर्यटनावर अवलंबून असलेल्या गोव्याच्या अर्थव्यवस्थेचे वास्तवही दुर्लक्षित करता येणार नाही. पण मग सरकारने प्रामाणिकपणे सांगावे की व्यसनाधीनता रोखण्यासाठी त्याचे ठोस धोरण काय आहे? प्रतिबंध, उपचार, पुनर्वसन, जनजागृती, अल्पवयीनांपर्यंत मद्य व अमली पदार्थ पोहोचू नयेत यासाठीची अंमलबजावणी आणि व्यसनामुळे उद्ध्वस्त होणाऱ्या कुटुंबांना आधार यासाठी परिणामकारक व्यवस्था कुठे आहे?

गावागावांत अमली पदार्थ पोहोचत असल्याच्या तक्रारी असतील, मद्याच्या व्यसनामुळे कुटुंबांचे आरोग्य आणि सामाजिक जीवन उद्ध्वस्त होत असेल, तर केवळ ‘नशामुक्त भारत’च्या घोषणा पुरेशा नाहीत. नशेच्या बाजाराला मोकळीक आणि नशामुक्तीच्या मंचावर उपदेश या दोन भूमिका एकाच वेळी किती काळ चालणार?

गांधीजींची जयंती म्हणजे पुष्पहार आणि भाषणांचा दिवस नव्हे. गांधींच्या नावाने घोषणा करताना शासनाच्या कृतीतही त्या मूल्यांचे प्रतिबिंब दिसायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज गांधींच्या विचारांना मानवतेशी जोडत त्यांच्या संदेशातून उत्तम समाज घडविण्याचे आवाहन केले आहे.

नशामुक्तीचा नारा द्यायचाच असेल तर तो इव्हेंटपुरता नको; धोरणात उतरवा. अन्यथा गांधी-शास्त्रींच्या प्रतिमेला हार घालणे सोपे आणि त्यांच्या मूल्यांशी प्रामाणिक राहणे कठीण एवढाच संदेश समाजात जाईल.

  • Related Posts

    दारी कशाला, कार्यालयातच सेवा द्या !

    लोकांनी सरकारच्या दारी जायचे किंवा सरकारने लोकांच्या दारी यायचे, यापेक्षा सरकारी कार्यालयात गेलेल्या नागरिकाचे काम वेळेत का होऊ नये ? नागरिकांना सरकारी कार्यालयांत हेलपाटे न मारता सुलभ, पारदर्शक आणि कालबद्ध…

    कंत्राटी शिक्षकांना न्याय द्या

    वर्षानुवर्षे शासनाच्या नियमित कामकाजाचा भाग बनलेल्या कर्मचाऱ्यांना केवळ कंत्राटी शिक्का मारून कायम असुरक्षित ठेवणे अन्यायकारक आहे. राज्य सरकारने दहा वर्षे कंत्राटी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्याची घोषणा केली; मात्र…

    You Missed

    03/10/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 3, 2026
    • 15 views
    03/10/2026 e-paper

    दारी कशाला, कार्यालयातच सेवा द्या !

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 3, 2026
    • 21 views
    दारी कशाला, कार्यालयातच सेवा द्या !

    सुर्लाची जखम पुन्हा भळभळणार…

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 3, 2026
    • 19 views
    सुर्लाची जखम पुन्हा भळभळणार…

    From Mining Scar to Forest — Surla Fears 4,000-Crore Dump Rush Could Reopen Old Wounds

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 3, 2026
    • 14 views
    From Mining Scar to Forest — Surla Fears 4,000-Crore Dump Rush Could Reopen Old Wounds

    Mangrove Trees Allegedly Felled at Undir-Bandora; Environment Forum Seeks FIR, Restoration

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 2, 2026
    • 17 views
    Mangrove Trees Allegedly Felled at Undir-Bandora; Environment Forum Seeks FIR, Restoration

    गोव्यात सत्ता परिवर्तनासाठी काँग्रेस हाच पर्याय : सचिन पायलट

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 2, 2026
    • 34 views
    गोव्यात सत्ता परिवर्तनासाठी काँग्रेस हाच पर्याय : सचिन पायलट