ते पण अवतार होते !

ते म्हणाले, “आज ख्रिसमस ना, आज भगवान येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव. जशी आपण गोकुळाष्टमी भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव म्हणून साजरी करतो, तसाच ख्रिसमसचा सण येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव म्हणून साजरा करतात,” बाबा म्हणाले.

मला आठवते, मी त्यावेळी पहिलीत होतो. आम्हाला ख्रिसमसची सुट्टी होती. सुट्टी असल्यामुळे शेजारच्या प्रविणसोबत खेळण्यासाठी दिवसभर त्याच्याच घरी होतो. संध्याकाळी बाबा शेतातून आले. ते संध्याकाळी माझ्याकडून प्रार्थना म्हणून घेत आणि नंतर पाढे घेत. त्या दिवशी बाबांनी फक्त प्रार्थना घेतली आणि ते एक छोटेसे पुस्तक वाचू लागले.
“बाबा, आज पाढे नाही का म्हणायचे?”
“नाही. मला हे पुस्तक वाचायचे आहे.”
मला पाढे म्हणायला आवडत नसे आणि बाबा कधीच पाढे म्हणून घ्यायला चुकत नसत. त्यामुळे मला एका बाजूला आनंद वाटत असला तरी मला ते कोणते पुस्तक वाचत आहेत, त्याचे कुतूहल होते.
“बाबा, कोणते पुस्तक? गोष्ट आहे का त्यात?” मी विचारले.
“स्वामी विवेकानंदांनी येशू ख्रिस्तांवर लिहीलेले पुस्तक आहे हे. मी रात्री झोपताना येशू ख्रिस्तांची गोष्ट सांगेन,” बाबा म्हणाले.
रात्री झोपताना मी त्यांना गोष्टीची आठवण केली.
ते म्हणाले, “आज ख्रिसमस ना, आज भगवान येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव. जशी आपण गोकुळाष्टमी भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव म्हणून साजरी करतो, तसाच ख्रिसमसचा सण येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव म्हणून साजरा करतात,” बाबा म्हणाले.
“पण ते ख्रिश्चन लोकांचे देव ना?” मी विचारले.
बाबा हसले आणि म्हणाला, “हा अमक्याचा देव, तो तमक्याचा देव असे नसते. सर्वांचा देव एकच असतो. तुला संत नरहरी सोनारांची गोष्ट ठाऊक आहे ना? त्यांच्याकडे एकदा एक विठ्ठलाचा भक्त आला आणि म्हणाला, ‘मला विठ्ठलाला सोन्याचा कंबरपट्टा अर्पण करायचा आहे. तुम्ही उत्तम कारागीर आहात असे ऐकलेय, म्हणून आलो.’
संत नरहरी सोनार हे भगवान शंकरांचे भक्त होते. ते भगवान शंकरांचे एकनिष्ठ भक्त होते म्हणजे ते शंकर सोडून इतर कोणत्याही देवाचे दर्शन देखील घेत नसत. ते त्या विठ्ठल भक्ताला म्हणाले, ‘तुम्ही जर तुमच्या विठ्ठल मूर्तीच्या कंबरेचे माप आणून देत असाल तर मी कंबरपट्टा बनवून देईन. त्याप्रमाणे त्या विठ्ठल भक्ताने विठ्ठल मूर्तीच्या कंबरेचे माप आणून दिले. नरहरींनी त्या मापाप्रमाणे एक सुंदर कंबरपट्टा बनवला. विठ्ठल भक्त तो घेऊन आनंदाने विठ्ठलाच्या देवळात गेला. त्याने तो पट्टा विठ्ठल मूर्तीला घालायचा प्रयत्न केला पण तो सैल झाला. म्हणून पट्टा घट्ट करण्यासाठी तो भक्त पुन्हा नरहरींकडे आला. त्यांनी तो घट्ट करून दिला. भक्त पुन्हा विठ्ठलाच्या देवळात आला. पण आता तो पट्टा तोकडा पडू लागला. पुन्हा तो नरहरींकडे गेला. असे अनेकदा झाले. शेवटी त्या भक्ताने नरहरींना कळकळीची विनंती केली की माप घ्यायला त्यांनी स्वतः विठ्ठलाच्या देवळात यावे. नरहरी एका अटीवर यायला तयार झाले. काय होती त्यांची अट? ते डोळ्यावर पट्टी बांधून गाभाऱ्यात येतील, जेणेकरून त्यांना विठ्ठलाला बघावे लागणार नाही! त्याप्रमाणे ते डोळ्यांवर पट्टी बांधून गाभाऱ्यात पोचले. ते मूर्तीच्या कंबरेचे माप घेऊ लागले. पण त्यांच्या हाताला ती विठ्ठलाची मूर्ती न जाणवता, शंकराची पिंडी जाणवू लागली. आपण शंकराच्या पिंडीचेच माप घेतोय असे वाटून त्यांनी डोळ्यांची पट्टी सोडली. बघतात तर काय, विठ्ठलाची मूर्ती. या अनुभवातून त्यांना हे ज्ञान झाले की जो त्यांचा आराध्य शंकर आहे, तोच विठ्ठल आहे, तोच सर्व झाला आहे. गीतेच्या चौथ्या अध्यायात भगवान म्हणतात, जेव्हा जेव्हा धर्म म्हणजे चांगलेपणा नाहीसा होतो आणि अधर्म माजतो म्हणजे लोक वाईट वागू लागतात, तेव्हा चांगलेपणा राखण्यासाठी आणि वाईटपणा दूर करण्यासाठी भगवान जन्म घेतात. जेव्हा जेरूस्लेममध्ये गरीब लोकांना श्रीमंत लोक त्रास देऊ लागले. लोक एकमेकांसोबत मारामारी करू लागले, देवळाबाहेर दुकाने लावून देवाला हे द्या, ते द्या म्हणून पुजारी सांगू लागले, तेव्हा भगवंतानी येशू ख्रिस्तांचा अवतार घेतला आणि गोरगरिबांना मदत करा, देव भक्तीचा भुकेला आहे, त्याला दुसरे काही नको, दुसर्‍याला करुणेने जिंका असा उपदेश दिला. गीतेत काम आणि क्रोध जिंकलेला माणूस हा स्थितप्रज्ञ असतो असे सांगितले आहे. भगवान येशू तसेच होते. ते गरिबीतच राहिले. त्यांना जेव्हा खोट्या आरोपावरून क्रुसावर चढवण्याची शिक्षा देण्यात आली, तेव्हा त्रास देणार्‍या मंडळींचा त्यांना राग आला नाही. उलट ते म्हणाले, ‘देवा यांना माफ कर. ते काय करत आहेत, ते त्यांना समजत नाहिये.’ किती प्रेमळ असतील ना येशू. येशू जसे त्यांना त्रास देणार्‍यांना क्षमा करत होते तसेच संत ज्ञानेश्वर पसायदान मागताना म्हणतात, ‘जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे!’ म्हणजे दुष्टांचा दुष्टपणा नाहीसा होऊ दे, त्यांना चांगले काम करण्यात गोडी वाटू दे, सर्वांना एकमेकांविषयी मैत्री वाटू दे म्हणजे जग चांगले होऊन जाईल.”
“बाबा, देवाचे किती अवतार झाले आतापर्यंत?” मी निरागसपणे प्रश्न केला.
बाबा म्हणाले, “खूप! एकदा अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणाला, तुम्ही साक्षात परब्रह्म, तुमच्यासारखा दुसरा अवतार नाही! तेव्हा भगवान त्याला जवळच असलेल्या जांभळाच्या झाडाकडे घेऊन गेले आणि म्हणाले, ‘तुला काय दिसतेय?’
अर्जुन म्हणाला, ‘जांभळेच जांभळे लगडलेली आहेत.’
‘किती?’
‘मोजता येणार नाहीत इतकी.’
‘आता झाडाच्या जवळ जा आणि बारकाईने पहा.’
अर्जुन जवळ जाऊन पाहू लागला.
‘प्रत्येक जांभळाच्या ठिकाणी तूच दिसतोस! भगवान, तुमचे अनंत अवतार आहेत. मी तुम्हाला संकुचितपणे फक्त द्वारकाधिश म्हणून पहात होतो.’
रामकृष्ण परमहंस म्हणायचे, जसे पाण्याला कोणी जल म्हणतात, कोणी वाॅटर म्हणतात, कोणी पानी म्हणतात, तसेच त्याला हिंदू ब्रम्ह म्हणतात, ख्रिश्चन गाॅड म्हणतात तर मुस्लिम अल्ला म्हणतात. जसा तो कृष्ण म्हणून आला, तसा तो येशू म्हणून आला आणि महंमद पैगंबर म्हणून आला. रामकृष्णांनी ख्रिश्चन पद्धतीने साधना करून पाहिली आणि त्यांना येशू ख्रिस्तांचे दर्शन झाले. एकदा एका स्नेह्याकडे त्यांनी मेरी आणि बाळ येशूचे चित्र पाहिले आणि ते भावसमाधीत गेले. त्यांनी मुस्लिम धर्माप्रमाणे देखील साधना करून पाहिली होती. हे सर्व मार्ग एकाच परमेश्वराकडे घेऊन जातात असे ते सांगत. स्वामी विवेकानंदानी सुरू केलेल्या रामकृष्ण मिशनमध्ये ख्रिसमसचा उत्सव साजरा केला जातो. येशू ख्रिस्त, महम्मद पैगंबर, पारशी धर्माचे झरतुष्ट्र, भगवान बुद्ध यांची काय शिकवण होती याची पुस्तके रामकृष्ण मिशनने प्रकाशित केली आहेत. प्रत्येक सण ही देवाच्या वेगवेगळ्या अवतारांचे चिंतन करण्याची संधी असते. ते कसे जगले, त्यांनी कोणती शिकवण दिली, नेहमीच्या जीवनात ती शिकवण कशी अंमलात आणता येईल याचे चिंतन करायचे म्हणजे मन शुद्ध होत जाते. जसजसे मन शुद्ध होत जाते तसतसे आपण देवाच्या जवळ जातो.”
…..
डॉ. रुपेश पाटकर
लेखक मानसोपचारतज्ज्ञ आणि साहित्यिक आहेत.

  • Related Posts

    ‘बस्स झाले, आता पुरे करा…’

    एक पोलिस, निर्लज्जपणे आणि सीसीटीव्ही कॅमेरे त्याच्याकडे बघत असतानाही एका कुख्यात गुन्हेगाराला तुरुंगातून बाहेर काढतो… म्हणजे ही काय एस्कॉर्ट सर्व्हिस आहे!त्यात एका प्रतिष्ठित राजकीय पक्षाचा नेता, पेशाने वकील, वर नमूद…

    कुंकळळीकरिणीच्या चरणी धार्मिक सलोख्याची सेवा

    भक्तीभावात आणि शांततेत जत्रोत्सव पार पडणार कुंकळ्ळी, दि. २३ (प्रतिनिधी) फातर्पेतील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरिणीचा वार्षिक जत्रोत्सव ४ ते ९ जानेवारी २०२४ पर्यंत साजरा होणार आहे. या जत्रोत्सवात परंपरागत धार्मिक सलोख्याचे…

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    You Missed

    25/12/2024 e-paper

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 25, 2024
    • 2 views
    25/12/2024 e-paper

    25/12/2024 e-paper

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 25, 2024
    • 2 views
    25/12/2024 e-paper

    ते पण अवतार होते !

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 25, 2024
    • 6 views
    ते पण अवतार होते !

    ‘बस्स झाले, आता पुरे करा…’

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 25, 2024
    • 7 views
    ‘बस्स झाले, आता पुरे करा…’

    सरत्या वर्षाच्या पर्यटनाला अपघाताचे गालबोट

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 25, 2024
    • 7 views
    सरत्या वर्षाच्या पर्यटनाला अपघाताचे गालबोट

    श्रद्धास्थानांचा राजकीय आखाडा नको

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 25, 2024
    • 8 views
    श्रद्धास्थानांचा राजकीय आखाडा नको
    error: Content is protected !!