
हस्तक्षेपानंतर माफीच्या मागणीसह संप घेतला मागे
गांवकारी, दि. १० (प्रतिनिधी)
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याबाबतीत घडलेला प्रकार पुन्हा कधीच घडणार नाही. डॉक्टरांनी सादर केलेल्या विविध मागण्यांची लवकरच पूर्तता केली जाईल. मुख्यमंत्री या नात्याने आपण हमी देतो, असे सांगून आंदोलक डॉक्टरांची डॉ. प्रमोद सावंत यांनी समजूत काढल्यानंतर अखेर गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी आपला नियोजित संप मागे घेतल्याचे जाहीर केले.
चोवीस तासांत आरोग्यमंत्री राणे यांनी आपत्कालीन विभागात येऊन डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांची माफी मागावी आणि ही माफी कॅमेरात टिपून सोशल मीडियावर व्हायरल करावी, अशी मागणी काल आंदोलक डॉक्टरांनी केली होती. ही मागणी मान्य न झाल्यास संप पुकारण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. रात्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डीन, वैद्यकीय अधीक्षक तथा गोवा निवासी डॉक्टर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. विश्वजीत राणे यांनी यापूर्वीच माफी मागितली आहे. त्यांनी आपत्कालीन विभागात येऊन माफी मागण्याची मागणी तूर्त सोडून द्यावी. तसेच, असेल तर आपण गोमेकॉत येऊन सर्व आंदोलकांची समजूत काढतो, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी जाहीर करून या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.
अखेर मुख्यमंत्री पोहोचले गोमेकॉत
आज दुपारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले. तिथे डीन कार्यालयासमोर आंदोलनकर्त्या डॉक्टरांना त्यांनी संबोधित केले. डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांच्याबाबतीत घडलेला प्रकार दुर्दैवी आहे, पण यापुढे असा प्रकार घडणार नाही, याची काळजी आपण घेतो, असे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनकर्त्यांनी डीनसमोर ठेवलेल्या मागण्यांची लवकरच पूर्तता केली जाणार असल्याची हमी त्यांनी दिली. विश्वजीत राणे यांनी स्वतः हजर राहून माफी मागण्याची मागणी आपल्या विनंतीनुसार सोडून द्यावी आणि हे आंदोलन मागे घेऊन रुग्णांच्या सेवेत डॉक्टरांनी परतावे, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना दिला धीर
अत्यंत हीन पद्धतीने आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी अपमान केलेल्या डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांच्या खांद्यावर हात ठेवत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी त्यांना धीर दिला. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे योगदान हे खूप मोठे आहे आणि सरकार नेहमीच त्याची कदर करत असल्याचे ते म्हणाले. असले प्रकार यापुढे अजिबात होऊ देणार नाही, असे सांगून त्यांनी हा संप मागे घेण्याची विनंती केली. यानंतर गोवा निवासी डॉक्टर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या यशस्वी हस्तक्षेपानंतर हा संप मागे घेत असल्याचे जाहीर करून अखेर या नाट्यावर अधिकृत पडदा पडला.