नीज गोंयकारांचा कठिणकाळ


इथे खाप्रेश्वर ही लोकदेवता इथल्या नीज गोंयकारांचे प्रतिनिधीत्व करते आणि त्यामुळे त्याची विटंबना आणि त्याचा अपमान हा इथल्या नीज गोंयकारांचा अपमान ठरतो.

मुंबईत मराठी माणूस जसा हरवला आहे, तसाच आता आपल्या गोव्यात आमचा गोंयकारांचा प्रवास सुरू झाला आहे. पर्वरीतील श्री खाप्रेश्वराला ज्या निर्दयतेने सरकारने उखडून काढले, तो अप्रत्यक्ष गोंयकारपणावरील एक प्रयोगच होता. काही सामाजिक कार्यकर्ते आणि ठरावीक लोक सोडता संपूर्ण नीज गोंयकार पेटून उठलाच नाही, हे सरकारने ओळखले आहे. गोंयकारपण आणि गोंयकारांचा आपल्याच भूमीत उपरा बनण्याची ही सुरूवात आहे. धर्माची विटंबना घडली असताना ह्याच भूमीत अध्यात्मिक महोत्सव आयोजित होतो. तिथे मोठ मोठे संत, महंत हजेरी लावतात पण या प्रकाराबाबत चकार शब्द काढत नाहीत. अशा महोत्सवांच्या प्रायोजकत्वाच्या अनुषंगाने धर्मगुरूंनी मौन धारण करण्याचे धोरण अवलंबिले तर मग सर्वसामान्यांच्या धर्मतत्वांची कदर असणारच कुणाला ? एका साध्या शब्दात या घटनेचा निषेध तरी व्हायला हवा होता, पण दुर्दैवाने तो देखील झाला नाही.
गोंयकारांमध्येच आता दोन गट पडले आहेत. एक गट हा आपला वैयक्तिक विकास, व्यक्तीगत उद्दिष्टे आणि स्वयंकेंद्रीत बनला आहे तर दुसरा गट या सगळ्या गोष्टींचा थेट संबंध आपले अस्तित्व, आपली संस्कृती आणि एकूणच गोंयकारपणाशी लावून त्याचा अर्थ काढू लागला आहे. सरकारने या महत्वाकांक्षी लोकांना हेरून त्यांना हाताशी धरले आहे आणि त्यांच्यामार्फतच सरकार आपल्या छुप्या योजना आणि उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी वावरत आहे. हेच गोंयकार दुसऱ्या गटातील गोंयकारांच्या मार्गातील अडथळा ठरू लागले आहेत. शेवटी काय तर गोंयकारच एकमेकांशी लढणार आहे आणि सरकार कोंब्याची झुंज लावून मजा पाहणार आहे.
पर्वरीतील श्री खाप्रेश्वराचे प्रकरण जर सरकारने पचवले तर भविष्यात कुठलेही प्रकरण हे सरकार सहजपणे पचवू शकते. इथे खाप्रेश्वर ही लोकदेवता इथल्या नीज गोंयकारांचे प्रतिनिधीत्व करते आणि त्यामुळे त्याची विटंबना आणि त्याचा अपमान हा इथल्या नीज गोंयकारांचा अपमान ठरतो. पण या अपमानाचे दुःख इतरांना नाही हे नेमके काय दर्शवते? धर्माचा ठेका घेतल्यागत पुन्हा पुन्हा अन्य धर्मियांविरोधात हिंदूंना भडकवणारी वृत्ती इथे हिंदूंच्या देवतेची विटंबना झाली तरीही बीळात लपून बसलेली आहे. श्री खाप्रेश्वराच्या निमित्ताने कोण कोण राजकीय दडपणाखाली किंवा राजकीय गुलामीखाली दबलेले आहेत हे तरी किमान पाहायला मिळाले.
रामायणाचा अभ्यास केल्यानंतर रावणाने सीतेचे हरण नेमके का केले, याचे स्पष्ट कारण मिळत नाही. त्याला खरोखरच सीतेचे हरण करण्याची गरजच काय होती, याचेही उत्तर मिळत नाही. परंतु त्याचे विधीलिखीत ठरले होते आणि प्रभू श्री रामाच्या हातून त्याचा अंत लिहिला गेला होता. ह्या कारणामुळेच रावणाकडून ही कृती घडली. श्री खाप्रेश्वराच्याबाबतीत घडलेल्या प्रकारामागे काहीतरी विधीलिखीत असणारच. ते आपल्याला एव्हाना कळणार नाही पण ही देवाची विटंबना करणाऱ्यांच्या नशीबी नेमके काय असेल हे कळण्यासाठी थोडा संयम ठेवावा लागेल. सत्तेची धुंदी जेव्हा चढते आणि अमर्याद सत्ता हाती मिळते तेव्हा अनेकदा सत्ताधाऱ्यांचा तोल जातो. ही परंपरा रामायण, महाभारतादी अनेक पुराण कथांमधून आम्ही पाहिलेली आहे. रामायण, महाभारताची महती सांगत असताना त्यातून बोध घेण्याचे मात्र आम्ही टाळतो. श्री खाप्रेश्वर ही लोकदेवता इथल्या स्थानिकांची राखणदेवता आहे. त्याच्याप्रती घडलेला हा प्रकार या लोकांना अजिबात रुचलेला नाही. आपल्या देवतेच्या अपमानाचा वचपा नियतीने घ्यावाच लागेल, अशी प्रचंड इच्छाशक्ती या लोकांची आहे. ही इच्छाशक्ती खरी ठरते की विकासाची निर्दयी वृत्ती सार्थ ठरते हे भविष्यकाळच स्पष्ट करेल.

  • Related Posts

    अखेर ‘टीसीपी’ ची चोरी पकडली

    आमदार वेन्झी व्हिएगश यांच्याकडून मंजुरीपत्र उघड पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) – पर्यटन खात्याकडून बासिलिका ऑफ बॉम जिजस चर्चनजीकच्या वारसा स्थळात केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेंतर्गत उभारल्या जाणाऱ्या प्रस्तावित प्रकल्पाला नगर नियोजन…

    पाण्यासाठी दाही दिशा

    कोणत्याही विवेकी माणसाला ही केवळ आपली थट्टाच सुरू असल्याचे जाणवेल. परंतु राजकीय लोकांना हे पूर्णपणे माहित आहे की लोकांनी आपला विवेक बाजूला काढून ठेवला आहे आणि त्यामुळे त्यांना सहजपणे आपल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    25/03/2025 e-paper

    25/03/2025 e-paper

    अधिवेशन म्हणूनच गरजेचे

    अधिवेशन म्हणूनच गरजेचे

    तवडकरांनी घातले सरकारच्या डोळ्यात अंजन

    तवडकरांनी घातले सरकारच्या डोळ्यात अंजन

    24/03/2025 e-paper

    24/03/2025 e-paper

    अखेर ‘टीसीपी’ ची चोरी पकडली

    अखेर ‘टीसीपी’ ची चोरी पकडली

    पाण्यासाठी दाही दिशा

    पाण्यासाठी दाही दिशा
    error: Content is protected !!