मनोहर पर्रीकर हे सत्तेत आल्यानंतर ती जागा कुणालाच घेणे शक्य झाले नाही. त्या तोलामोलाचा विरोधी पक्षनेताच विरोधकांना सापडला नाही.
राज्यात एकीकडे सरकारविरोधात वातावरण बरेच तापत चालले आहे. जमीनींचे व्यवहार, सरकारी नोकऱ्यांचा व्यवहार तसेच अन्य गोष्टींवरून सर्वसामान्य लोकांत नाराजी पसरली आहे. या परिस्थितीचा लाभ विरोधकांनी घेणे क्रमप्राप्त ठरते. संख्येने केवळ ७ असलेले विरोधक आणि त्यात एकजुटीचा अभाव यामुळे सरकारचे तर फावले आहेच आणि त्यात आता विरोधकांच्या विरोधातच वेगवेगळ्या प्रकरणांचे कोलीतच सरकारच्या हाती सापडल्यामुळे जनता एकाकी आणि हतबल बनलेली पाहायला मिळते. आपल्या संसदीय लोकशाही पद्धतीत सत्ताधारीपेक्षा विरोधकांचे महत्व फार मोठे आहे. गोव्यात अगदी सुरूवातीला जॅक सिक्वेरा ते अलिकडच्या काळात मनोहर पर्रीकर यांनी विरोधी पक्षनेते म्हणून सर्वसामान्य जनतेच्या मनांत उमटवलेली छाप अजूनही लोकांच्या स्मृतीत आहे. मनोहर पर्रीकर हे सत्तेत आल्यानंतर ती जागा कुणालाच घेणे शक्य झाले नाही. त्या तोलामोलाचा विरोधी पक्षनेताच विरोधकांना सापडला नाही. सध्याच्या ७ विरोधकांमध्ये एकमेव ज्येष्ठ आमदार म्हणजे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई आहेत. उर्वरीत सर्व ६ आमदार पहिल्यांदाच विधानसभेत निवडून आले आहेत. दुर्दैवाने विजय सरदेसाई हे गोवा फॉरवर्ड पक्षाचे एकमेव आमदार आणि विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे असल्यामुळे त्यांच्याकडे हे पद येऊ शकत नाही. पहिल्यांदाच निवडून येऊनही युरी आलेमाव यांनी आपली चांगली ओळख तयार केली होती. मात्र अलिकडे ते सायलंट मोडवर नेमके का गेले आहेत, याचे उत्तर काही सापडत नाही. विजय सरदेसाई यांच्यात दम आहे, परंतु अलिकडेच १३० कोटी रूपयांचे एक आर्थिक घोटाळा प्रकरण सरकारने बाहेर काढले आहे, जिथे त्यांच्यासोबत त्यांचे पीए म्हणून काम करणारी व्यक्ती गुंतल्याचा आरोप आहे. या प्रकरणावरून अप्रत्यक्ष सरकारने त्यांची बोलती बंद करण्याचा घाट घातला आहे. काँग्रेसच्या तीन्ही आमदारांवर तर सरकारला सेट असल्याचा आरोप उघडपणे होतोच आणि त्यात आता युरी आलेमाव हे ट्वीटर बहाद्दर ठरल्यामुळे लोकांची घोर निराशा झाली आहे. तिकडे आम आदमी पार्टीचे दोन आमदार सक्रीयता दाखवतात खरे परंतु अलिकडे त्यांनी काँग्रेसलाही लक्ष्य करण्याचे सत्र आरंभल्याने इंडि आघाडीत बिघाडी होताना दिसत आहे. आरजीपीचे आमदार विरेश बोरकर हे एकला चलो रेचा नारा देत असले तरी तो आवाज खूप कमी प्रमाणात दिसतो. अशावेळी सरकार आपला जनताविरोधी अजेंडा पुढे रेटत चालले असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. भाजपात नव्याने दाखल झालेल्यांनी आता जुन्या आणि मुळ भाजपवासीयांनाच लक्ष्य करण्याचे सत्र सुरू केले आहे आणि पक्षाचे सरकारातील नेते हा सगळा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. तिकडे उत्तरेत भाजपचे दोन वेळा प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशी पदे भूषविलेले लक्ष्मीकांत पार्सेकर त्यांनीच पायाभरणी केलेल्या तुये इस्पितळाच्या विषयावरून आपल्याच सरकारविरोधात उभे ठाकले आहेत तर इथे पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना खोट्या तक्रारीवरून तुरूंगात जावे लागत आहे. पक्षाची ही वाटचाल कार्यकर्त्यांना घायाळ करत असताना सर्वसामान्य जनता देखील निराश आणि हतबल बनत चालली आहे हे मात्र खरे.