“पैसा बोलतो…!”

या स्वाभिमानी सत्तरीकरांच्या संयमाचा स्फोट झाला तर त्यातून कुणाची राख होईल हे येणारा काळच ठरवेल.

आज सकाळीच एक फोन आला. फोन होता सत्तरीतून. गोव्यातील एका नामांकित मराठी दैनिकात हल्ली रोज एक पान विश्वजीत राणे आणि दिव्या राणे यांच्या जिल्हा पंचायत प्रचाराच्या फोटोंचे छापून येते. हे पान जाहीरातींचे आहे की बातम्यांचे, असा त्यांचा सवाल होता. मी देखील हे रोजचे एक पान पाहिले आणि मला देखील धक्का बसला. पण हे पान काही बातम्यांचे असू शकत नाही. रोज राणे दांपत्याचे फोटो छापले जात असतील तर ते जाहीरातीचेच पान असायला हवे.
या पानाच्या खाली “आरसीआय” असे लिहिलेले आहे. कदाचित रेव्हन्यू कलेक्शन इनिशिएटीव्ह असा त्याचा अर्थ असू शकतो. पण एका अग्रगण्य वर्तमानपत्राकडून रोजच्या प्रचाराचे फोटो छापून महसूल मिळवण्याचा उपक्रम सुरू केला असेल तर ते वाचकांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. वर्तमानपत्रांसाठी जाहीराती महत्त्वाच्या आहेतच, कारण त्यातूनच वर्तमानपत्र व्यवसायाची शाश्वतता अवलंबून असते. परंतु या जाहीरात व्यवसायाचीही काहीतरी नितीमत्ता असावी लागते. जाहीरातींतून त्या वृत्तपत्राचा वाचकांशी असलेला बाणा कायम टिकून राहणे तितकेच गरजेचे आहे. कुणीही केवळ पैशांच्या गुर्मीवर वर्तमानपत्र विकत घेतल्याचा आव आणत असेल किंवा आपल्या जाहीरातबाजीतून हे दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर ती त्या वर्तमानपत्रासाठी अजिबात शोभनीय गोष्ट नाही.
राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुका पहिल्यांदाच पूर्ण ताकदीने राजकीय पक्षांकडून लढवल्या जात आहेत. प्रत्येक आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्री देखील मैदानात उतरून आपल्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसतात. हे घडत असताना राज्य निवडणूक आयोग खरोखरच निवडणुकीची निःपक्षता आणि निर्भयतेची हमी देऊ शकेल काय? आयोगाची भरारी पथके नेमकी कुठे झोपा काढत आहेत हेच कळत नाही. या सर्व भरारी पथकांना सत्तरीच्या सीमा ओलांडण्याची म्हणे परवानगीच नाही, असे तेथील एका उमेदवाराचे म्हणणे आहे.
सत्तरीत पैशांचा पाऊस सुरू आहे. सगळ्या आजी-माजी सरपंच, पंच यांच्याकडे पैशांचे गठ्ठे सोपविले आहेत आणि ते या पैशांची खैरात मतदारांवर करून भाजपच्या मतदानपेटीत विक्रमी मतांचे लक्ष्य ठेवून वावरत आहेत. प्रत्यक्ष पैशांचा खुलेआम वापर सुरू असताना राज्य निवडणूक आयोगाने धृतराष्ट्राची भूमिका घेतली आहे. तिकडे भरारी पथकाकडून दखल घेण्याचा साधा विचारही केला जात नाही. एवढा दरारा आणि भय हा कधीच माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांच्या कार्यकाळात दिसला नाही. तो आज त्यांचे पुत्र विश्वजीत राणे यांनी निर्माण केला आहे.
सत्तरीला म्हणे पोलिसांची गरज नाही. इथले लोकच आपापसात आपले प्रश्न सोडवतील, असे एक वक्तव्य ब्रेकिंग न्यूजवर वाचनात आले. आता याच सरकारातील एका मंत्र्याचे हे वक्तव्य असेल तर त्याला काय म्हणावे हे समजत नाही. ही भाषा नेमकी काय सूचित करते?
राजकारण्यांकडून पैशांची खैरात सुरू आहे, पण म्हणून जनता या पैशांना बळी पडली आहे असे अजिबात होत नाही. या आमिषांना नकार दर्शवण्याचा धोका कुणीच पत्करू शकत नाही. या पैशांना नकार देणे म्हणजे आपला स्वाभिमान दाखवणे, आणि हा स्वाभिमान जपणे हेच खरे सत्तरीवासियांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.
एकीकडे आम्ही स्वाभिमान हरवल्याच्या बाता करतो आणि दुसरीकडे स्वाभिमानी लोकांना आपला स्वाभिमान व्यक्त करण्याचीही मोकळीक नाही, एवढी भीषण परिस्थिती सत्तरीवर ओढवली आहे. सत्तरी ही बंडखोरांची भूमी. हा राजकीय दबाव, दरारा किती काळ सत्तरीवासीय सहन करणार? या स्वाभिमानी सत्तरीकरांच्या संयमाचा स्फोट झाला तर त्यातून कुणाची राख होईल हे येणारा काळच ठरवेल.

  • Related Posts

    राष्ट्रपतींचा मान राखा

    न्यायसंस्थेत आणि राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी ते सामान्य कष्टकरी गोंयकारांच्या कायदेशीर आधारासाठी विविध चळवळीत सक्रीय होते. तीच चळवळी वृत्ती आजही त्यांच्या रक्तात वाहत असल्याने ते आपल्या अवतीभोवतीचे चित्र पाहून व्याकुळ झाले.…

    Congress Reviews Goa Political Situation, Begins Strategy for Ponda By-Poll and 2027 Elections

    Panaji: The Goa unit of the Indian National Congress held a strategic meeting at the AICC headquarters to discuss the political situation in the state and plan the party’s roadmap…

    You Missed

    Tuem Panchayat Backs ‘Enough is Enough’ Movement, Raises Alarm Over Villa Projects

    Tuem Panchayat Backs ‘Enough is Enough’ Movement, Raises Alarm Over Villa Projects

    Alleged Illegal Tree Felling at Mollem Raises Serious Environmental Concerns

    Alleged Illegal Tree Felling at Mollem Raises Serious Environmental Concerns

    14/04/2026 e-paper

    14/04/2026 e-paper

    कामगारांच्या आयुष्याकडे खेळ नको

    कामगारांच्या आयुष्याकडे खेळ नको

    ‘पार्सेकर फुड्स’ विरोधात आज महाआंदोलन

    ‘पार्सेकर फुड्स’ विरोधात आज महाआंदोलन

    Fake Loan Call Centre Busted in Goa; 7 Arrested in Midnight Cyber Crime Raid

    Fake Loan Call Centre Busted in Goa; 7 Arrested in Midnight Cyber Crime Raid