सेंट लॉरेन्स आगशी पंचायतीच्या ११ सदस्यांवर अपात्रता दाखल
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी)
तिसवाडी तालुक्यात सांतआंद्रे मतदारसंघातील सेंट लॉरेन्स आगशी पंचायतीच्या सर्वच्या सर्व ११ पंचसदस्यांवर अपात्रता याचिका दाखल झाली आहे. या सर्वंच पंचसदस्यांनी पंचायत निधीचा उपयोग वैयक्तीक फायद्यासाठी केल्याचा ठपका ठेवून हिलेरी परेरा यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे ही याचिका दाखल केली आहे.
ही याचिका काल मंगळवारी राज्य निवडणूक आयोगापुढे पुढील सुनावणीसाठी आली असता त्याबाबत १३ नोव्हेंबर २०२४ रोजी निवाडा दिला जाईल, असे आयोगाने कळवले आहे. विशेष म्हणजे पंचायतीच्या संपूर्ण पंचमंडळावरच अपात्रता याचिका दाखल होण्याचे हे पहिलेच प्रकरण घडले आहे.
पंचमंडळींनीच मिळवली कामे
पंचायत क्षेत्रातील नाले, ओहळ सफाई, झुडपे सफाई आदी कामे आदी कामे पंचमंडळींनीच केली आणि या कामांचा मोबदला आपल्या वैयक्तीक बँक खात्यावर जमा करून घेतला. ही पद्थत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे,असेही याचिकादाराने म्हटले आहे. विशेष म्हणजे या कामांसाठी निविदा जारी करून ही कामे देणे गरजेचे आहे. पंचमंडळींना पंचायत निधी थेट आपल्या खात्यात जमा करण्याचा अधिकार कुणी दिला,असाही सवाल युक्तीवादावेळी उपस्थित झाला.
कामांचे कमिशन की कामांचा खर्च
याचिकादाराने केलेल्या युक्तीवादात सर्व पंचसदस्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम ही त्या त्या कामांसाठीचे कमिशन असल्याचे म्हटले आहे. ही रक्कम धनादेशातून जमा करण्यात आली आहे. या रकमेबाबत कोणताही ठराव घेण्यात आलेला नाही. पंचायत निधीचा खर्च केल्याच्या बदल्यात पंचसदस्यांना कमिशन देण्याची ही प्रथा नेमकी काय,असा सवाल या सगळ्या व्यवहारांतून उपस्थित झाला आहे.
पंचायत सचिवांची भूमीका काय?
हे सगळे घडत असताना पंचायत सचिव नेमके काय करत होते,असा सवाल आता उपस्थित झाला आहे. हा निधी पंचसदस्यांच्या खात्यात जमा करताना पंचायत सचिवांनी त्याला मान्यता कशी दिली, हा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.
माहिती अधिकारातून पर्दाफाश
याचिकादाराने माहिती अधिकार कायद्याखाली ही सगळी माहिती मिळवली आणि त्यांना धक्काच बसला. त्यांनी ताबडतोब ही सगळी माहिती एकत्र करून ही याचिका दाखल केली. एड.ह्दयनाथ शिरोडकर यांनी याचिकादाराच्यावतीने युक्तीवाद केला. ही याचिका निवडणूक आयोगाकडून स्वीकारली जाते की फेटाळली जाते हे महत्वाचे आहेच परंतु ही याचिका पंचायत संचालनालयाकडे दाखल करावी लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
कोण आहेत पंचमंडळी?
१)एमी लियोनारा फर्नांडिस
२)एलन आंतोनियो सिल्वेरा
३)बेनी मान्यूएल सिल्वेरा
४)रेजिना मास्कारेन्हास
५)सेली गोन्साल्वीस
६)जुलीयस आल्मेदा
७)मोनी फर्नांडिस
८)हिरेश सुभा कवळेकर
९)पिएदाद मान्यूएल फर्नांडिस
१०)लक्षदीप काशिनाथ गांवस
११) जुलीएटा रिबेरो