
गोंयकारांनी सावध राहण्याची गरजः एल्वीस गोम्स
पणजी,दि.१५(प्रतिनिधी)
खाण उद्योग कोसळल्यानंतर पर्यटन हा राज्याचा आर्थिक कणा बनला आहे. ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन पर्यटनाच्या आड रिअल इस्टेट लॉबी गोव्यावर कब्जा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. क्षणिक फायद्यासाठी आपलेच गोंयकार त्यांच्या आमिषांना बळी पडत आहेत. आपण वेळीच शहाणे बनलो नाही तर आपला गोवा हाताबाहेर जाण्याची भिती माजी सरकारी अधिकारी आणि काँग्रेस नेते एल्वीस गोम्स यांनी व्यक्त केली.
गांवकारी शी संवाद साधताना एल्वीस गोम्स यांनी ही चिंता व्यक्त केली. राज्यात भूरूपांतरे आणि झोन बदलाचा सपाटाच सुरू आहे. आपला प्रदेश जर सुरक्षीत राहायचा असेल तर जमीनी गोंयकारांकडेच राहण्याची गरज आहे. या जमीनी दिल्लीवाल्यांच्या हातात गेल्यास आपण आपल्याच भूमीत उपेक्षीत राहणार आहोत,असेही एल्वीस गोम्स म्हणाले. पर्यटनाच्या नावाखाली सरकार रिअल इस्टेटवाल्यांसाठी लाल गलीचा पांघरून आहे. पर्यटनाच्या आड गोव्यात घुसखोरी करणारे हेच लोक कालांतराने गोंयकारांनाच या भूमीतून हुसकावून लावणार आहेत,असेही गोम्स म्हणाले.
शॅक्सवाल्यांचीही बाजू समजून घ्या
राज्यातील शॅक्स व्यवसाय हा स्थानिकांचा पारंपारिक व्यवसाय आहे. हे शॅक्स भाडेपट्टीवर देणे बेकायदा आहे. तरिही हे शॅक्स भाडेपट्टीवर दिल्याचा दावा खुद्द पर्यटनमंत्रीच करतात. हे खरे आहे तर मग खात्याने कारवाई का केली नाही,असा सवाल एल्वीस गोम्स यांनी केला. पर्यटन धोरणामुळे अनेक पारंपारिक शॅक्स व्यवसायिक या धंद्यापासून परावृत्त झाले आहेत. लॉटरी पद्धतीमुळे त्यांची संधी हुकते. नव्याने शॅक्स मिळालेले काही व्यवसायिक हेच शॅक्स स्थानिक पारंपारिक शॅक्स व्यवसायिकांना भाडेपट्टीवर देण्याचेही प्रकार घडतात. भाडेपट्टीवर शॅक्स दिलेल्यांची बाजूही एकून घेणे गरजेचे आहे. हे शॅक्स परप्रांतीयांच्या हाती जाणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे, असेही एल्वीस गोम्स यांनी स्पष्ट केले.
पर्यटन मालमत्ता कुणाच्या हाती ?
शॅक्स व्यवसाय परप्रांतीयांना भाडेपट्टीवर दिल्याच्या कारणांवरून पर्यटन खात्याने कारवाई सुरू केली आहे ही गोष्ट स्वागतार्ह आहे, परंतु उत्तर ते दक्षिणेतील पर्यटन खात्याच्या जमीनी आणि मालमत्ता खात्याने कुणाला भाडेपट्टीवर किंवा लीजवर दिल्या आहेत, त्याची यादी जाहीर केल्यास बरे होईल,असा टोला एल्वीस गोम्स यांनी हाणला. या जमीनी स्थानिक व्यवसायीकांना लीजवर देणे अशक्य आहे काय, असा सवालही त्यांनी केला.
राज्याचे धोरण, लाभार्थी कोण?
सरकारच्या धोरणांतून राज्याला फायदा मिळणे अपेक्षीत आहे. इथे धोरणे आखून कोण आपला वैयक्तीक स्वार्थ साधत आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे. राज्याचे पर्यटन दिशाहीन बनत चालले आहे. केवळ पायाभूत सुविधांच्या नावे जमिनींचे व्यवहार आणि कॅसिनो, जुगार आदींसारख्या व्यवसायांची मक्तेदारी हे आपल्या पर्यटनाला कुठे नेणार आहे, याचा प्रत्येकाने विचार करावा,असेही एल्वीस गोम्स म्हणाले.