कोलवाळ पोलिसांकडून कारवाईबाबत चालढकल
गांवकारी,दि.५(प्रतिनिधी)
पत्नीच्या आत्महत्येमागे एका व्यक्तीकडून करण्यात आलेला कथित मानसिक छळ आणि वैवाहिक जीवनात जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलेले गैरसमज कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप करत पेडणे तालुक्यातील एका व्यक्तीने कोलवाळ पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित व्यक्तीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील अन्य लागू तरतुदींनुसार गुन्हा नोंदवून चौकशी करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे.
विशेष म्हणजे तक्रारदार व्यक्ती ही स्वतः पोलिस शिपाई म्हणून सेवेत आहे आणि त्याला दोन लहान मुली आहेत. १ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या या तक्रारीनुसार, तक्रारदाराच्या पत्नीने १८ ऑगस्ट २०२६ रोजी कोलवाळ येथे नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने या प्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.
तक्रारदाराने आपल्या निवेदनात संबंधित व्यक्ती अनेक वर्षांपासून परिचित असल्याचे सांगितले आहे. पूर्वी त्याला विविध प्रसंगी आर्थिक मदत केल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र त्याच्याबद्दल काही कथित बेकायदेशीर व्यवहारांची माहिती मिळाल्यानंतर आपण त्याच्याशी संबंध तोडल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
यानंतर संबंधित व्यक्तीने आपल्या पत्नीशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आणि आपल्याबद्दल विवाहबाह्य संबंध असल्याची कथित खोटी माहिती तिच्या मनात भरविल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. त्यामुळे पती-पत्नीमध्ये गैरसमज आणि वारंवार वाद निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणातील एक महत्त्वाचा दावा म्हणजे, पत्नीने संबंधित व्यक्तीसोबत झालेल्या काही संभाषणांचे कथित रेकॉर्डिंग केले होते आणि ती रेकॉर्डिंग तिने पतीला दाखविली होती. या संभाषणांतून वैवाहिक जीवनात गैरसमज निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
“पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणारी परिस्थिती निर्माण करण्यात संबंधित व्यक्तीची भूमिका होती,” असा आरोप तक्रारदाराने केला असून त्याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, तक्रार दाखल होऊन एक महिना उलटला तरीही अद्याप गुन्हा नोंदविण्यात आला नाही, अशी माहिती तक्रारदाराने केली आहे.





