राष्ट्रीय महामार्गावरील निष्काळजीपणा; तांबोसे पुलावर भरधाव डंपरमधून मोठमोठे दगड कोसळले, प्रवाशांचा जीव टांगणीला

पेडणे,दि.२५ जून: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ (NH-66) वरील उगवे आणि तांबोसे दरम्यान असलेल्या तांबोसे पुलावर गुरुवारी सायंकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. भरधाव वेगाने धावणाऱ्या एका डंपरमधून अचानक मोठमोठे दगड महामार्गावर कोसळू लागल्याने वाहनचालकांमध्ये एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र काही क्षणांचा फरक असता तर मोठा अपघात घडण्याची शक्यता होती.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दगडांनी भरलेला डंपर मर्यादेपेक्षा अधिक माल घेऊन भरधाव वेगाने जात होता. डंपरवरील दगड झाकण्यासाठी कोणतीही ताडपत्री किंवा सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नव्हती. पुलावरील चढ-उतार आणि वाहनाच्या वेगामुळे डंपरमधील मोठे दगड मागील बाजूने थेट महामार्गावर पडू लागले.

पावसाळ्याचे वातावरण असल्याने सुरुवातीला मागून येणाऱ्या वाहनचालकांना नेमके काय घडत आहे हे समजले नाही. काही क्षणांसाठी दगडांचा अक्षरशः वर्षाव होत असल्याचा भास निर्माण झाला. वाहनचालकांनी प्रसंगावधान राखून वाहने थांबविल्याने संभाव्य दुर्घटना टळली.

या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील जड वाहनांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ओव्हरलोड वाहतूक, माल सुरक्षितपणे न झाकणे आणि वेगमर्यादेचे उल्लंघन यामुळे इतर वाहनचालकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित डंपर चालक आणि मालकावर कठोर कारवाई करावी, तसेच राष्ट्रीय महामार्गावर अशा निष्काळजीपणाला आळा घालण्यासाठी नियमित तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

  • Related Posts

    गोमंतकीय अस्तित्वासाठी कुंकळळीच्या महानायकांचे बलिदान अतुलनीय; धर्मरक्षण आणि स्वराज्यासाठी दिलेल्या लढ्याला इतिहासात तोड नाही – सुभाष फळ देसाई

    कुंकळळी, दि. १६ : गोमंतकाच्या अस्तित्वासाठी, धर्मरक्षणासाठी आणि स्वराज्याच्या संकल्पनेसाठी १५८३ मध्ये कुंकळळीच्या महानायकांनी दिलेल्या बलिदानाला इतिहासात तोड नाही. त्यांच्या त्यागामुळेच गोमंतकीय समाज आपली संस्कृती, धर्म आणि अस्मिता जपू शकला,…

    ई-२० इंधनाची अंमलबजावणी स्थगित करा; स्वतंत्र चौकशीची काँग्रेसची मागणी

    पणजी, दि. १६: गोव्यात ई-२० (२० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल) इंधनाची सर्वसाधारण अंमलबजावणी तात्काळ स्थगित करून त्याबाबत स्वतंत्र वैज्ञानिक, आर्थिक आणि पर्यावरणीय अभ्यास करण्यात यावा, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस…

    You Missed

    गोमंतकीय अस्तित्वासाठी कुंकळळीच्या महानायकांचे बलिदान अतुलनीय; धर्मरक्षण आणि स्वराज्यासाठी दिलेल्या लढ्याला इतिहासात तोड नाही – सुभाष फळ देसाई

    गोमंतकीय अस्तित्वासाठी कुंकळळीच्या महानायकांचे बलिदान अतुलनीय; धर्मरक्षण आणि स्वराज्यासाठी दिलेल्या लढ्याला इतिहासात तोड नाही – सुभाष फळ देसाई

    ई-२० इंधनाची अंमलबजावणी स्थगित करा; स्वतंत्र चौकशीची काँग्रेसची मागणी

    ई-२० इंधनाची अंमलबजावणी स्थगित करा; स्वतंत्र चौकशीची काँग्रेसची मागणी

    SIO Condemns Goa Education Directorate Circular, Threatens Legal Action

    SIO Condemns Goa Education Directorate Circular, Threatens Legal Action

    16/07/2026 e-paper

    16/07/2026 e-paper

    गोव्याच्या भविष्याचा निर्णायक लढा

    गोव्याच्या भविष्याचा निर्णायक लढा

    पाटो टीसीपीसमोर जनसागर लोटणार

    पाटो टीसीपीसमोर जनसागर लोटणार