पेडणे,दि. ३१ (प्रतिनिधी) : विर्नोडा-पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये शासकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. साक्षी प्रसाद गवंडी हिची डिसेंबर महिन्यात ओडिशा येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी गोवा विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे.
गुजरात येथे २७ व २८ ऑक्टोबर रोजी झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत साक्षीने गोवा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना १०२ किलो वजनी गटात उल्लेखनीय कामगिरी केली. या यशाच्या जोरावर तिने अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
साक्षी सध्या पेडे-म्हापसा येथे प्रशिक्षक श्री. महेश कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेटलिफ्टिंगचे नियमित प्रशिक्षण घेत आहे. सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर तिने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत स्थान मिळवले आहे.
साक्षीच्या या यशामुळे पेडणे तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, तिच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे. आगामी राष्ट्रीय स्पर्धेतही ती उत्कृष्ट कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





