आधीच स्वतः निकाल लावून देवीवर तो लादण्यापेक्षा निकालाचा अधिकार देवीवरच सोपवणे योग्य ठरले असते.
गोवा ही पुण्यभूमी आणि देवभूमी म्हणून आपण मानतो. देशात आणि अन्यत्र जगात अलिकडच्या काळात एकापेक्षा एक नैसर्गिक आपत्तींचे सत्र सुरू असताना, सुरक्षित राज्य म्हणून गोव्याचा लौकिक आहे. देशात इतरत्र, विशेषतः दिल्लीतील वाढते प्रदूषण आणि गोंगाटातून विरंगुळा मिळवण्यासाठी लोक गोव्याकडे सेकंड होम म्हणून पाहत आहेत. अर्थात, इतरांचे सेकंड होम मूळ गोमंतकीयांच्या ओरिजिनल होमच्या मुळावर येऊ पाहत आहे, ही गोष्ट निराळी.
कुळदेव, ग्रामदेव आणि राखणदार अशा संकल्पनेतून इथली समाजरचना उभी राहिली आहे. एखादा गोंयकार जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी तो आपले कुळ, ग्रामदेव आणि राखणदाराला केळी किंवा वीडा ठेवायला विसरणार नाही. त्याची नाळच या अध्यात्मिक रचनेशी जुळलेली असल्याने ती आजीवन गोंयकारासोबत जोडलेली आहे.
गोव्याच्या या अध्यात्मिक पवित्रतेला अलिकडच्या काळात राजकीय व्यवस्थेने अशुद्ध करण्याचा विडा उचलला आहे. राजकारण्यांनी या श्रद्धास्थानांचा बाजार मांडून देवाप्रतीची भावना आणि उत्कटता बाधित केली आहे. देवालाही सहजपणे फसवता येते आणि विकत घेता येते, असे काही राजकारणी आपल्या कृतीतून दाखवत असल्याने या पवित्र आणि पुण्यभूमीचा वारसा ढासळत चालला आहे.
वास्तविक धर्म आणि धार्मिक भावना हा खरेतर खाजगी विषय आहे; परंतु या खाजगी विषयाला सार्वजनिक स्वरूप प्राप्त करून लोकांच्या श्रद्धेचा आणि भावनांचा गैरवापर करण्याची सवय काही राजकीय नेत्यांना जडली आहे. या राजकीय लोकांच्या देणग्या आणि आर्थिक सहाय्याला भुलून देवस्थान समित्यांकडून मंदिरे आणि श्रद्धास्थाने त्यांना वैयक्तिक वापरासाठी आदान देण्याची पद्धत कुठेतरी बंद होणे, ही काळाची गरज बनली आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आमदारांनी विविध धार्मिक स्थळांवर जाऊन पक्षांतर करणार नाही, अशी हमी सांगणे करून किंवा गाऱ्हाणे घालून त्याचे प्रदर्शन मांडले होते. त्यापैकी अनेकजण पक्षांतर करून भाजपात दाखल झाले. “देव पाहून घेईल” असे म्हणणारे अजूनही देवाच्या कृतीची वाट पाहत आहेत.
दिगंबर कामत यांची देवभक्ती तर प्रचलितच आहे. त्यांनी चक्क देवाला विचारले आणि देवाने त्यांना आशीर्वाद दिला, असेही म्हणून टाकले. अर्थात, अनेकांना ही थट्टा वाटेल; परंतु देवाकडे प्रसाद, पाकळी लावून प्रश्न विचारून आपल्या विविध समस्या आणि प्रश्नांचे निवारण करण्याची सोय आपल्याकडे उपलब्ध आहे. मग आपल्या चुकांचे आणि पापांचे निवारण सहजपणे देवासमोर करण्याची ही मोकळीक मिळत असेल, तर देवाच्या श्रद्धेचा बाजार मांडायला काही राजकारणी अजिबात मागे नाहीत.
सरकारी नोकऱ्यांसाठी पैसे घेण्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी पूजा नाईक हिने केलेल्या आरोपांवरून वीजमंत्री सुदिन ढवळीकर बरेच अस्वस्थ झाले आहेत. सहजिकच आहे. तीने केलेले आरोप गंभीर आहेत. ती ज्या तऱ्हेने ठामपणे आरोप करत आहे, ते पाहता तिला खोटे ठरविण्यासाठी सुदिन ढवळीकर यांना आपले निर्दोषत्व सिद्ध करावे लागेल किंवा पोलिसांना चौकशीअंती ते पटवून द्यावे लागेल.
आता हा सगळा वाद सुरू असतानाच ढवळीकरांच्या समर्थकांनी श्री देव कटमगाळ आणि श्री देवी नवदुर्गेला गाऱ्हाणे घालून ढवळीकरांना अभय देण्याची विनंती केली. श्री नवदुर्गेसमोर गाऱ्हाणे घालताना तेथील ब्राह्मणाने देवीसमोर आधीच ढवळीकरांच्या निर्दोषत्वाची हमी दिली आहे. ढवळीकरांना राजकीय लक्ष्य केले जात असल्यामुळे जे कुणी या कृत्यात सहभागी असतील त्यांना देवीच्या चरणी ओढून आणून सत्य बोलण्याची बुद्धी द्यावी, असे आक्रमक सांगणे करण्यात आले.
हे सगळे पाहिल्यानंतर कुणीही इतक्या पवित्र राजकीय नेत्याच्या पायाचे उदकच घ्यावे, असे वाटेल. राजकारणात राहिल्यानंतर काय काय करणे भाग पडते, हे वेगळेपणाने सांगण्याची गरज नाही. किमान देवासमोर आणि देवाकडे बोलण्याचा अधिकार असलेल्या ब्राह्मणाने किंवा पुजाऱ्याने त्याची जाणीव ठेवण्याची गरज आहे. आधीच स्वतः निकाल लावून देवीवर तो लादण्यापेक्षा निकालाचा अधिकार देवीवरच सोपवणे योग्य ठरले असते.




