
सरकारच्या कृतीविरोधात राज्यभरात संतापाची लाट
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी)
पर्वरी वडाकडील सीमेवरचा राखणदार म्हणून प्रचलित श्री देव खाप्रेश्वराची मूर्ती अखेर सोमवारी पहाटे ३.३० च्या सुमारास कामगारांद्वारे मूळ सीमेवरील स्थानावरून काढून कंत्राटदाराच्याच खाजगी वाहनातून ही मूर्ती कंटेनरमध्ये ठेवण्यात आली आहे. यानंतर तेथील वडाचे झाड मूळापासून उखडून ते देखील नेण्यात आले. वडाच्या झाडासकट श्री देव खाप्रेश्वराच्या मूर्तीची नव्या जागेत पुनःप्रतिष्ठापना केली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे धार्मिक विधीवत प्रतिष्ठापना केलेली ही मूर्ती धार्मिक विधींची पूर्तता न करताच तिथून हटविण्यात आली. ही हटविण्यासाठी कंत्राटदाराच्या परप्रांतीय कामगारांचा वापर करण्यात आला. या मूर्तीची अक्षरशः विटंबना करण्यात आल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. वडाचे झाड स्थलांतरित करून नवीन जागेत पुन्हा लावण्यात येणार आहे. परंतु या वडाच्या झाडाला ज्या तऱ्हेने उखडण्यात आले ते पाहता आणि या झाडासाठी निवडलेली जागा या झाडाच्या पुनःरोपणासाठी योग्य नाही, अशी प्रतिक्रिया तज्ज्ञांनी दिली आहे. सरकारने केवळ सोपस्कार पूर्ण केले असून वडाचे झाड आणि देवाच्या मूर्तीबाबत अजिबात संवेदना दाखवलेली नाही, अशी खंत अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
२०१९ मध्येच दिली होती मान्यता
पर्वरी उड्डाण पुलाच्या बांधकामाचा आराखडा तयार करताना २०१९ मध्येच या मंदिराच्या कारभाऱ्यांनी सरकारला मान्यता दिली होती, असा गौप्यस्फोट पर्वरीचे आमदार तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केला. आपण त्यावेळी विरोधात होतो आणि त्यामुळे या निर्णयात आपल्याला समावेश करून घेतला गेला नाही. या मान्यतेच्या आधारावरच सर्वोच्च न्यायालयाने या उड्डाण पुलाला मान्यता दिली आणि त्यानंतरच या कामाची निविदा जारी झाली आहे. आता आपण सरकारात आहे, हे हेरून काही लोक या विषय उपस्थित करून त्यात राजकारण आणू पाहत आहेत आणि त्यामुळे आपल्याला याबाबत काहीच बोलायचे नाही, असे रोहन खंवटे म्हणाले. या देवस्थानाशी संबंधित लोक भाजपचेच कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे ही मान्यता देताना त्यांच्यात आणि सरकारात चर्चा होऊनच ही मान्यता घेतली असेल, असे सांगतानाच विनाकारण राजकारण करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
पुरोहितांकडून निषेध
पर्वरी श्री खाप्रेश्वर देवाची मूर्ती हटविताना धार्मिक विधींची पूर्तता झाली नाही. या कामासाठी खास परराज्यांतून पुरोहित मागवण्यात आले आणि त्यांनी अवलंबिलेला प्रकार धर्मात बसत नाही, अशी प्रतिक्रिया गोमंतकीय पुरोहितांनी दिली. या प्रकारामुळे संपूर्ण पुरोहित वर्गावर स्वार्थाचा आरोप केला जात आहे. गोमंतकीय पुरोहित असे दुष्कृत्य अजिबात करणार नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे.
सरकारच्या हिंदुत्ववादाचा पर्दाफाश
केवळ परधर्मीय लोकांप्रती द्वेष पसरवण्यासाठीच हिंदुत्वाचा वापर केला जातो. राखणदाराचे स्थान गोमंतकीय समाज आणि धार्मिक व्यवस्थेत महत्त्वाचे आहे. त्या राखणदाराची विटंबना करून भाजपने आपले हिंदुत्व बेगडी असल्याचे सिद्ध केले आहे. तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी प्रगत झाली असताना हे वडाचे झाड आणि मूर्ती वाचवता येणे शक्य होते, परंतु भाजप सरकारची तशी इच्छाशक्तीच नव्हती, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांनी दिली. देवाचे तत्त्व जर कुणी मान्य करत असेल तर या घटनेचे तीव्र आणि गंभीर परिणाम दोषींना भोगावे लागणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.