आपण या दीपावलीच्या निमित्ताने आपल्या अवतीभोवतीचा काळोख दूर करून प्रेम, बंधुभाव, सर्वधर्म समभावाची ज्योत पेटवण्याचा सकंल्प करूया आणि हे जग सुखी व्हावेचा मंत्र जपूया.
जनावरातून माणसांत परिवर्तीत होण्यासाठी माणसाला हजारो वर्षे लागली. माणसात आल्यानंतरही स्वतःच्या बुद्धीचा वापर करण्यासाठी पुढे तेवढीच हजारो वर्षे गेली. प्रारंभीपासूनच युद्धाची आणि हिंसेची आवड असलेल्या माणसांत प्रेम, दया या भावना उत्पन्न व्हायला तशीच शेकडो वर्षे गेली. युद्धाची आणि नाशाची खुमखुमी असल्याने कित्येक राजवटी आपोआप नष्ट झाल्या. जेव्हा प्रेमभाव, दयाळूपणा आणि एकजुटता याचे महत्व माणसाच्या लक्षात यायले लागले तेव्हाच कुठेतरी माणूस या निसर्गात टिकला आणि ज्या धर्माचे ते प्रतिनिधीत्व करत होते तो धर्म टीकला. प्रामुख्याने हिंदू, ख्रिस्ती आणि ज्यू धर्मांचा त्यात मुख्यत्वाने उल्लेख करावा लागेल. ती हिंसेची, नाशाची आणि युद्धाची खुमखुमी अजूनही मानवजातीत टीकून आहे आणि म्हणूनच जगभरातील सर्वंच देश आज सरंक्षण क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक करत असल्याची वास्तवता समोर आली आहे. प्रेम, अहिंसा, बंधुभाव हे स्वभावगुणच मानवता आणि माणूसकी टीकवून आहेत अन्यथा मानवाचा टप्प्याटप्प्याने नाश ही एक निरंतर प्रक्रिया आहे. मानववंश शास्त्राप्रमाणे माणूस हा एक अत्यंत आळशी प्राणी होता आणि अजूनही आहे. जोपर्यंत संकट आपल्या दारात येऊन उभे होत नाही तोपर्यंत आपण जागे होत नाही. तरिही शास्त्र, तंत्रज्ञानाने आपल्याला संकटांची आगाऊ कल्पना किंवा सतर्कत देण्यात महत्वाचे योगदान दिले आहे. आज जगभरात समाजात विषमता विस्तारत चालली आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी रूंदावत चालली आहे. कुटुंब, समाज म्हणून एकजुटीची भावना पुन्हा एकदा विस्कळीत होऊ लागली आहे. सांपत्तीक दृष्ट्या सक्षम बनलेल्या माणसाला आता स्वतःवर एवढा अतिविश्वास वाटू लागला आहे की त्याला समाजाची गरज नाही,असा भास होऊ लागला आहे. हे लक्षण नेमके काय दर्शवते, याबाबत गंभीरतेने विचार करावा लागेल.
आपले सण, उत्सव हे प्रामुख्याने समाजाला एकत्रित आणण्याचे काम करतात. प्रत्येक सण हा मानवतेचा, माणूसकीचा, एकजुटीचा आणि बंधुभावाचा प्रेरणास्त्रोत म्हणता येईल. दिवाळी, दीपावली हा देखील असाच एक सण. आनंद, उत्साह, मित्रत्वाचा झरा निरंतर वाहत ठेवणारा हा सण आहे. उजेड, प्रकाश हे या सणाचे चिन्ह. काळोखाला दूर लोटून समाजात प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या या सणाचे महत्व फार मोठे आहे. काळोख हे दुखःचे प्रतिक. हे दुखः प्रकाशाने आणि उजेडाने दूर करून एकमेकांच्या आयुष्यात आनंद, सुख, उत्साहाचे बीज रोवणारा हा सण आहे. आपल्या चांगल्या गुणांतून, स्वभावातून, प्रेम, दया, बंधूभावातून प्रत्येकाच्या आयुष्यात माणूसकीचा दीवा लावण्याची प्रेरणा देणारा हा सण आहे. आपण या दीपावलीच्या निमित्ताने आपल्या अवतीभोवतीचा काळोख दूर करून प्रेम, बंधुभाव, सर्वधर्म समभावाची ज्योत पेटवण्याचा सकंल्प करूया आणि हे जग सुखी व्हावेचा मंत्र जपूया.