
विरोध मोडून काढण्यासाठी सरकारला पाठींबा
गांवकारी, दि. ६ (प्रतिनिधी)
वाहतूक खात्याने जारी केलेल्या एप एग्रीगेटर नियमावली २०२५ विरोधात राज्यभरातील टॅक्सी संघटनांनी जोरदार विरोध दर्शवल्यानंतर आता या नियमावलीच्या समर्थनार्थ राज्यातील औद्योगिक संघटना एकत्र आल्या आहेत. या संघटनांनी सरकारला नियमावलीचे स्वागत असल्याचे कळवले आहे.
टॅक्सी एग्रीगेटर नियमावलीविरोधात राज्यभरातील टॅक्सी संघटनांनी आंदोलन छेडले आहे. या नियमावलीवर हरकती आणि सूचना सादर करण्यात आल्या असून, सुमारे १५०० हून अधिक सूचना वाहतूक खात्याकडे दाखल झाल्या आहेत. अनेक टॅक्सी संघटनांनी आपापल्या आमदार आणि मंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. एप एग्रीगेटरची सक्ती ही पारंपरिक टॅक्सी व्यवसायाला चिरडण्यासाठी करण्यात आली आहे, अशी भीती टॅक्सी संघटनांनी व्यक्त केली आहे. त्यांनी हेही म्हटले आहे की, ही सेवा गोव्यात टिकू शकणार नाही आणि त्यामुळे या व्यवसायावर उपजीविका करणाऱ्या सामान्य घटकांवर गंभीर परिणाम होईल. एकीकडे टॅक्सी संघटना या नियमावलीच्या विरोधात भूमिका घेत असताना, औद्योगिक संघटना मात्र एप एग्रीगेटर नियमावलीच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. विशेष म्हणजे गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज संघटनेने याबाबत पुढाकार घेतला आहे. गोवा राज्य औद्योगिक संघटना, वेर्णा औद्योगिक संघटना, लघु उद्योग भारती, गोवा टेक्नॉलॉजी संघटना आदी संघटनांनी या नियमावलीला पाठींबा दर्शवला आहे.