
सरकारने संवादातून पर्याय शोधावा – कौस्तूभ नाईक
गांवकारी, दि.७ (प्रतिनिधी)
जगभरात एप एग्रीगेटर प्रणाली लागू आहे, परंतु त्यामुळे स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांना ही तंत्रज्ञानाची सक्ती करणे अयोग्य आहे. एप एग्रीगेटर लागू केल्याने कुठल्या देशातील किंवा राज्यातील स्थानिक टॅक्सी व्यवसायिकांचे भले झाले आणि त्यांची प्रगती झाली हे सरकारने स्पष्ट करावे, असे आव्हान सामाजिक अभ्यासक कौस्तूभ नाईक यांनी दिले.
‘गांवकारी’शी साधलेल्या खास संवादात कौस्तूभ नाईक यांनी टॅक्सी व्यवसायिकांच्या ज्वलंत मुद्द्यांवर प्रकाश टाकला. त्यांनी टॅक्सी व्यवसाय अधिक सुसुत्र करण्याची गरज असल्याचे नमूद केले, तसेच पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना सुलभ व माफक दरात टॅक्सी सेवा उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे सांगितले. मात्र, स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांच्या उपजिविकेचा विचार न करता त्यांना वेठीस धरणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गोव्याच्या पर्यटन वृद्धीचा अभ्यास करता असे दिसते की, समुद्र किनाऱ्यांवर राहणारे मच्छीमार आणि बहुजन समाजातील घटकांनीच प्रारंभी पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित केले. त्या काळात पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या घटकांचा विरोध करणारेही अनेक होते, असे कौस्तूभ नाईक यांनी नमूद केले. आज पर्यटन क्षेत्राचा विस्तार झाल्याने मोठे आर्थिक हितसंबंध असलेले घटक लाभार्थी बनले आहेत, त्यामुळे मूळ पर्यटनाला चालना देणाऱ्या सामान्य टॅक्सी व्यावसायिकांच्या उपजिविकेवर परिणाम करणे हे अनुचित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जगभरात एप एग्रीगेटर संकल्पना अपयशी
युरोपसह अनेक देशांत एप एग्रीगेटर संकल्पना अपयशी ठरली आहे. त्या संकल्पनेमुळे स्थानिक टॅक्सी व्यावसायिक घटक संपुष्टात आला आहे. या प्रणालीमुळे स्थानिक व्यावसायिकांचा उद्धार झाला किंवा त्यांच्या जीवनमानात सुधारणा झाली असे कोणतेही ठोस उदाहरण सरकारने दाखवावे, असे आव्हान कौस्तूभ नाईक यांनी दिले.
या व्यवसायात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यवस्थापन होत असल्याने त्यातील अनेक गोपनीय बाबी आणि व्यूहरचना सामान्य टॅक्सी व्यावसायिक किंवा सर्वसामान्य लोकांच्या आकलनाच्या बाहेर आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सुसंवादातून समाधान शोधणे आवश्यक
राज्यातील टॅक्सी व्यवसायाचे सुसुत्रीकरण व्हावे, स्थानिकांच्या उपजिविकेच्या साधनांचे संरक्षण व्हावे, तसेच गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला अधिक शिस्तबद्ध आणि ठोस दिशा मिळावी, यासाठी सरकारने प्रयत्न करणे अपेक्षित आहे.
सरकारने टॅक्सी व्यावसायिकांवर कोणतेही निर्णय लादण्याऐवजी त्यांच्याशी सुसंवाद साधून ठोस उपाययोजना आखाव्यात, अन्यथा त्याचे गंभीर सामाजिक आणि आर्थिक परिणाम राज्यावर होऊ शकतात. त्यामुळे गोव्याच्या पर्यटन क्षेत्राचे नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे, असे मत कौस्तूभ नाईक यांनी व्यक्त केले.