
“धार्मिक जीवनाची सुरवात ‘विवेक आणि वैराग्य’ या गोष्टींनी होते. पूर्ण शुद्धीत असल्याशिवाय विवेक जागा कसा राहील? जेव्हा वर्तनाबद्दल शंका उत्पन्न होईल तेव्हा संतांच्या जीवनाकडे बघायला हवे, रोमटात नाचणार्या लोकांकडे नव्हे.”
मी आठवीत असतानाची गोष्ट. कोणी पाहुणे आमच्या शाळेत आले होते. ते दारूमुक्तीबाबत प्रचार करीत. त्यांचे भाषण आम्हा मुलांसाठी ठेवण्यात आले होते. त्यांनी दारू आणि तंबाखू या दोन व्यसनांच्या दुष्परिणामांबद्दल माहिती देऊन आयुष्यात दारू आणि तंबाखू यांची कधीच चव घेऊ नका असे आवाहन आम्हाला केले. आपल्या भाषणात ते हेदेखील म्हणाले की ‘इस्लाम हा कदाचित एकमेव धर्म असेल जो स्पष्ट शब्दात दारू न पिण्याची आज्ञा देतो.’ माझ्यासाठी त्यांचे हे विधान धक्कादायक होते. कारण माझा असा समज होता की हिंदू धर्म देखील दारू निषिद्ध मानत असला पाहिजे. माझे बाबा आणि माझे आजोबा यांच्याकडून मला ‘दारू पिणे’ हे अधर्म असल्याचे संस्कार मिळत होते. (मला हे कबूल केले पाहिजे की माझ्या आतापर्यंतच्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात, दारूची चव घेण्यास मी कधीच धजावलो नाही, याचे ठोस आणि एकमेव कारण म्हणजे माझ्यावर झालेले धार्मिक संस्कार!) त्यामुळे त्या वक्त्यांनी सांगितलेले विधान अर्धवट असावे असे मला वाटले. त्यांच्या व्याख्यानानंतर त्यांनी जेव्हा काही शंका असल्यास विचारा म्हणून आम्हाला सांगितले, तेव्हा मी माझी ही शंका विचारली. तेव्हा ते म्हणाले, ‘भगवद्गीतेत दारू पिऊ नका अशी स्पष्ट आज्ञा नाही. उलट शिमगा हा असा एक धार्मिक सण आहे, ज्यात दारू प्यायली जाते!’ त्यांच्या या म्हणण्याचा प्रतिवाद करायला माझ्याकडे त्यावेळी मुद्दा नव्हता. तरीही मला त्यांचा मुद्दा पटतही नव्हता. त्यांच्या भाषणानंतर आम्ही पुन्हा पुढच्या तासिकांसाठी वर्गात आलो. पण त्यांच्या भाषणातील तो मुद्दा माझ्या डोक्यातून जाईना.
मी घरी पोचल्यापोचल्या बाबांना विचारले. बाबा म्हणाले, “तुमच्या शाळेत आलेल्या पाहुण्यांनी भगवद्गीता अभ्यासलेली दिसत नाही. अख्खा सोळावा अध्याय यावरच तर आहे!”
बाबांच्या या म्हणण्याने मी आणखी संभ्रमीत झालो. पाहुणे सांगत होते की दारू पिऊ नये असे एकही वाक्य गीतेत नाही आणि बाबा म्हणत होते की अख्खा सोळावा अध्याय त्यावरच आहे. माझ्या संभ्रमाचा अंदाज येऊन बाबा म्हणाले, “सोळाव्या अध्यायात भगवान म्हणतात,
निर्भयत्व मन:शुद्धी योग-ज्ञानी सुनिश्चय
यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय ऋजुता तप!
अहिंसा शांति अक्रोध त्याग सौजन्य सत्यता
अ-लुब्धता दया भूती मर्यादा स्थैर्य मार्दव!
पवित्रता क्षमा तेज धैर्य अद्रोह नम्रता
हे त्याचे गुण जो आला दैवी संपत्ति घेऊनी!
हे गुण म्हणजे दैवी संपत्ती असे भगवान म्हणतात. माणसाने दारू प्यायली तर हे गुण बाणवता येतील का? नाही.
मी जेव्हा असे म्हणतो की माझे माझ्या मुलावर प्रेम आहे, तेव्हा ‘मी माझ्या मुलाला उपाशी ठेवणार नाही’ हे वेगळे सांगण्याची गरज नाही. प्रेम या शब्दातच ‘मी ज्याच्यावर प्रेम करतो त्याला मी त्रास होईल असे वागणार नाही’ असा अर्थ असतोच. तिसर्या अध्यायात भगवान जेव्हा असे म्हणतात की ‘निष्काम कर्म करावे’ तेव्हा निषिद्ध कर्म करू नये, हा अर्थ त्यात असतोच. जर एखादा माणूस दारू विकत असेल तर ते निष्काम कर्म ठरूच शकणार नाही. ते वेगळे सांगण्याची गरज नाही.
दुसरा मुद्दाही लक्षात घे की ते वक्ते ‘शिमग्याच्या उत्सवात दारू पितात’ हा दाखला देऊन कर्मकांड आणि धर्म यात गल्लत करत आहेत. कर्मकांड आणि अध्यात्म यात गल्लत करत आहेत.
धर्म हा देवाकडे जाण्याचा मार्ग आहे. तो मार्ग दारूच्या दुकानावरून जात नसतो.
धार्मिक जीवनाची सुरवात ‘विवेक आणि वैराग्य’ या गोष्टींनी होते. पूर्ण शुद्धीत असल्याशिवाय विवेक जागा कसा राहील? जेव्हा वर्तनाबद्दल शंका उत्पन्न होईल तेव्हा संतांच्या जीवनाकडे बघायला हवे, रोमटात नाचणार्या लोकांकडे नव्हे.”
मला मुद्दा पटला आणि त्यांच्या शेवटच्या वाक्याचे हसू आले.
“बुद्ध अवतारात भगवंतांनी निःसंदिग्धपणे पंचशीलांचा उपदेश दिला आहे. दारू पिऊ नका असा स्पष्ट शब्दात उच्चार केला आहे. मुळात एखादी गोष्ट का करायची नाही, हे कळले की ती टाळणे सोपे होते. मानवी जीवनाचे ध्येय ‘मुक्ती’ आहे. ‘आत्यंतिक दुखनिवृत्ती, चिदानंद प्राप्ती’ आहे. या मोठ्या श्रेयस्कर ध्येयाचा पाठपुरावा करायचा की आताच्या क्षणिक मजा देणाऱ्या गोष्टीच्या नादी लागायचे? यालाच श्रेयस विरुद्ध प्रेयसचा झगडा म्हणतात. हा झगडा आपल्या प्रत्येकाच्या मनात सतत चालू असतो. भगवान यालाच दैवी संपत्ती विरुद्ध आसुरी संपत्तीचा झगडा म्हणतात. या दोन्ही प्रवृत्ती आपल्या प्रत्येकात असतात.”
“बाबा, हे कंटाळवाणे होतेय. उदाहरण देऊन सांगाल का?” मी विचारले.
“हे समजून घेण्यासाठी संत विसोबा खेचर यांची गोष्ट उत्तम उदाहरण होईल,” बाबा म्हणाले.
विसोबा खेचर हे नाव ऐकताच मला अमर चित्र कथेचे संत ज्ञानेश्वर हे पुस्तक आठवले. सावंतवाडीत भरलेल्या पुस्तक प्रदर्शनातून बाबांनी अमर चित्र कथा मालिकेतील भगवद्गीता, संत ज्ञानेश्वर, लोकमान्य टिळक आणि भगवान बुद्ध ही चार पुस्तके आणली होती. ती चित्रमय असल्याने आणल्याच्या दुसर्याच दिवशी मी ती वाचून काढली होती.
विसोबा चाटी नावाचा एक पुरोहित ज्ञानेश्वरांच्याच गावात राहत असे. जसे इतर पुरोहित ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांची हेटाळणी करीत, त्यांना त्रास देत तसाच विसोबा चाटी देखील त्रास देई. एकदा मुक्ताईने मांडे करायचे ठरवले. मांडे बनवण्यासाठी तव्याच्या आकाराचे भांडे हवे होते. त्या काळात भांडी मातीची असत. गावातले कुंभार मातीची भांडी बनवत. मुक्ताई मांड्यांसाठी मातीचा परळ आणायला कुंभाराकडे गेली. विसोबाने तिला पाहिले. त्याने तिच्या हातातला मातीचा परळ हिसकावून घेतला आणि फोडला. आणि त्याने कुंभाराला धमकी दिली की त्याने या मुलांना कसलीही मदत केली तर तो त्याची सगळी भांडी फोडून टाकेल. मुक्ताईलाही त्याने खूप शिव्याशाप दिले. विसोबा आणि इतर सगळी पुरोहित मंडळी ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना यासाठी छळत होती कारण त्यांच्या वडिलांनी संन्यास सोडून पुन्हा संसार केला होता. या मंडळीनी या मुलांच्या आईवडिलांना जीवन संपवायला प्रवृत्त केले होते. आईवडीलांशिवाय पोरकी झालेल्या या मुलांचे हाल मात्र वाढतंच चालले. पुरोहितांनी बहिष्कार घातल्यामुळे ही मुले गावाच्या बाहेर झोपडी करून राहत असत. पण जेव्हा ती भिक्षा मागायला गावात येत तेव्हा त्यांना लोक टोचून बोलत. शिव्या शाप देत. त्यांना छळणार्या मंडळीची इतरांना दहशत वाटे. त्यामुळे त्या पोरक्या मुलांची दया एखाद्याला आली तरी त्यांना मदत करणे कठीण असे. जशी विसोबाने कुंभाराला त्याच्या मांडवातील सर्व भांडी फोडून टाकण्याची धमकी दिली तशी सर्वानाच दहशत असे.
विसोबा हा पुरोहित होता. देवाधर्माचा त्याने अभ्यास केला होता. पण व्यवहारात त्याचे वागणे गीतेच्या सोळाव्या अध्यायात वर्णन केलेल्या आसुरी संपत्तीसारखे होते,
स्वयं पूजित गर्विष्ठ धने माने मधांद ते
नावाचे करिती यज्ञ दंभाने अव्यवस्थित!
“पण विसोबाला आपण असे खऱ्या धर्मापासून दूर गेलो आहोत, आपण जे वागतो आहोत तो अधर्म आहे याची जाणीव नव्हती. त्याला गीता पाठ होतीच, पण आपला व्यवहार गीतेच्या उपदेशाच्या विरुद्ध आहे, हे मात्र त्याला कळत नव्हते. माणसाला जर धार्मिक मार्गावर यायचे असेल तर त्याला आपण ‘दांभिक’ बनलो आहोत, याची जाण यायला हवी. ही जाण येण्याचा प्रसंग विसोबाच्या जीवनात फार विचित्र तर्हेने आला. मुक्ताईच्या हातातला परळ फोडून टाकल्यानंतर विसोबा ती भावंडे आता काय करतात ते बघायला तिच्या मागून गेला. कशी ती निराश होतात, कशी ती रडतात हे पाहण्याच्या विकृत प्रवृत्तीने तो गेला. झोपडीच्या फटीतून आत काय चालले आहे ते तो पाहू लागला. काय दिसले त्याला आत? ज्ञानेश्वर वाकले आहेत. त्यांची पाठ तापली आहे. आणि मुक्ताई त्यांच्या पाठीवर मांडे भाजते आहे. या दृष्याने त्याच्या मनात परिवर्तन झाले. आपण आसुरी पद्धतीने या मुलांशी वागलो. नाही नाही ते बोललो. त्यांच्या कोवळ्या मनाचा अजिबात विचार केला नाही. त्यांना कोणी मदत करु नये म्हणून मदत करणार्यांना धमक्याही दिल्या. आपण चुकलो. वाईटात वाईट शिक्षा मिळाली तरी आपले पाप पुसले जाणार नाही. त्याच्या मनात आतापर्यंत आसुरी प्रवृत्तीचा विजय होत आला होता, पण आता दैवी संपत्ती वरचढ झाली. आणि पुढल्याच क्षणी तो त्या मुलांचे पाय धरण्यासाठी झोपडीत घुसला. आगंतुक कोणी आत घुसला, हे बघून मुक्ताईच्या तोंडून शब्द निघाले, ‘खेचरा, परता सर!’ मुक्ताईचे ते शब्द विसोबांसाठी मंत्र होते. विसोबा ऐहीक मोहातून ‘परते झाले’. ‘ईशावास्यम् इदम् सर्वम्’ याची ते साधना करू लागले. सर्वत्र भरलेला परमेश्वर ते पाहू लागले. आता ते आसुरी संपत्तीवाला विसोबा चाटी उरले नाहीत, ते दैवी संपत्तीवाले संत विसोबा खेचर झाले. त्यांना सर्वत्र घनदाट भरलेला परमेश्वर दिसू लागला आणि ते संत नामदेवांसारख्या संतश्रेष्ठालाही तो सर्वत्र भरलेला विठ्ठल दाखवू शकले. विसोबांसारखे संतदेखील आसुरी संपत्तीच्या प्रभावाखाली जाऊ शकतात, तिथे आपली काय गत असेल? तेव्हा हे भान सतत असले पाहिजे की आपली प्रवृत्ती सोळाव्या अध्यायात भगवान वर्णन करतात तशी तर होत नाही ना, म्हणजे आपण असा तर विचार करत नाही ना की,
हे आज लाभले आता तो जोडीन मनोरथ
हे आहे ते हि होईल माझे चि सगळे धन!
मी मारिला चि तो शत्रू मारीन दुसरे हि जे
मी स्वामी आणि मी भोक्ता सुखी मी सिद्ध मी बळी!
कुलीन मी चि संपन्न माझी जोडी कुठे असे
यज्ञ-दान-विलासी मी जल्पती अज्ञ मोहित!
तेव्हा आपण यज्ञ, दान वगैरे करत असलो तरी ‘मी धार्मिक’ हा नकळत शिरणारा अहंकार आपल्याला देवापासून दूर नेऊ शकतो. म्हणून सतत जागे राहीले पाहीजे,” बाबा म्हणाले.
……
– डॉ. रुपेश पाटकर