
बार्देशच्या नळांना पाण्याचा मार्ग मोकळा
डिचोली, दि. २९ (प्रतिनिधी)
तिलारीच्या साटेली – भेडशी येथील कालव्याला भगदाड पडल्यानंतर गेले सात दिवस बार्देश तालुक्यात तीव्र पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. आमठाणे धरणाचे पाणी सोडण्यासाठी जलस्त्रोत खात्याचे अधिकारी गेले चार दिवस प्रयत्न करत होते, परंतु आमठाणे धरणाची दारेच उघडत नसल्यामुळे पेच निर्माण झाला होता. अखेर नौदलाच्या अधिकाऱ्यांची मदत घेऊन हे दरवाजे खोलण्यात आल्याने बुधवारी संध्याकाळपर्यंत बार्देशला पाणी पुरवठा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
दरवाजे का उघडले नाहीत?
आमठाणे धरणाचे दरवाजे उघडण्यासाठी गेले चार दिवस जलस्त्रोत खात्याचे अधिकारी धडपडत होते, पण अखेर नौदलाच्या मदतीने ते उघडावे लागले. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. या दरवाजांच्या देखरेखीची जबाबदारी कुणाची होती आणि आपत्कालीन परिस्थितीत ते का उघडले गेले नाहीत याची चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
दिलगिरी व्यक्त
तिलारीच्या कालव्याला भगदाड पडून लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले याबद्दल मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिलगिरी व्यक्त केली. गोव्यातील तिळारीचे कालवे दुरुस्त करण्यासाठी सुमारे ३०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. याव्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प सुरू आहेत. आगामी काळात पाण्याचा प्रश्न निकालात येईल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.