“वंदे मातरम्”; राजकारण नको!


लोकसभेत या विषयावर सुमारे १० तास चर्चा झाली. त्याच विषयावर राज्य विधानसभेत इतर ज्वलंत प्रश्न बाजूला सारून चर्चा घडवून आणण्यात राष्ट्रप्रेमापेक्षा राजकारणच अधिक दिसते.

‘वंदे मातरम्’ हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे एक प्रभावी प्रतीक म्हणून उदयास आले. पिढ्यान्‌पिढ्या स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणा देत, देशाच्या स्वातंत्र्याच्या सामूहिक आकांक्षेसाठी विविध प्रांतांतील व समुदायांतील जनतेला एकत्र बांधणारे हे गीत ठरले. त्याची साहित्यिक उत्कृष्टता आणि भावनिक प्रभाव यांनी भारताच्या राष्ट्रीय चेतनेच्या जडणघडणीत निर्णायक भूमिका बजावली.
राष्ट्रीय गीताच्या १५० वर्षांच्या पूर्ततेनिमित्त, एकात्मता, देशभक्ती आणि घटनात्मक मूल्ये—विशेषतः तरुण पिढीमध्ये—बळकट करण्यासाठी त्याचे आजही असलेले शाश्वत महत्त्व आत्मपरीक्षण करण्याची ही योग्य संधी आहे. त्यामुळे या ऐतिहासिक टप्प्याचे महत्त्व आणि भारताच्या राष्ट्रीय जागृतीस दिलेल्या योगदानाला साजेशा पद्धतीने त्याचे स्मरण व गौरव करण्याची आवश्यकता आहे. याच कारणास्तव गोवा विधानसभा अधिवेशनात हा विषय चर्चेसाठी घेण्याचे सरकारने ठरवले आहे.
राज्यासमोर अनेक महत्त्वाचे विषय असताना, जनतेची मागणी असूनही त्यांना बगल देऊन सरकारने ‘वंदे मातरम्’ या विषयावर चर्चा घडवून आणली. त्यामुळे विधानसभेच्या मूळ संकल्पनेला बाजूला सारून त्याचा राजकीय फायद्यासाठी उपयोग केला जात आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
‘वंदे मातरम्’ म्हणजे मातृभूमीला वंदन. मातृभूमी म्हणजे देश, त्यातील नागरिक, पर्यावरण, जैवसंपदा आणि भूगोल. या ऐतिहासिक काव्यातून भारतभूमीला केलेले वंदन स्फूर्तीदायक आहे. १८७५ साली बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या या गीताच्या १५० वर्षांच्या पूर्ततेची दखल म्हणून लोकसभेत चर्चा झाली. आता भाजपशासित राज्य विधानसभांमध्येही या विषयावर चर्चा होत आहे. ही चर्चा घडविण्यात काहीच गैर नाही; परंतु लोकांच्या भावनांचा आदर राखणे हे सरकारचे कर्तव्य आहे.
वंदे मातरम् ची मूल्ये नव्या तरुण पिढीत रुजविण्यासाठी सरकार विविध उपक्रम राबवू शकते. मात्र विधानसभेत चर्चा घडवून आणून राष्ट्रभक्तीच्या नावाखाली राजकारण करणे ही अयोग्य कृती आहे. लोकसभेत या विषयावर सुमारे १० तास चर्चा झाली. त्याच विषयावर राज्य विधानसभेत इतर ज्वलंत प्रश्न बाजूला सारून चर्चा घडवून आणण्यात राष्ट्रप्रेमापेक्षा राजकारणच अधिक दिसते.
या चर्चेला विरोध करणाऱ्यांच्या राष्ट्रभक्तीवर संशय घेतला जाईल, त्यांना राष्ट्रद्रोही ठरवले जाईल—अशी भीती आहे. परंतु भ्रष्टाचार, जनतेशी द्रोह आणि पर्यावरणाशी द्रोह करणाऱ्यांनीच खरा राष्ट्रद्रोह केला आहे. त्यामुळे राष्ट्रभक्तीचा जागर करून लोकांच्या मनात भावना चेतवून आपली पापे धुवून टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचा संशय घेण्यास वाव आहे.
राज्यासमोर वाढते रस्ते अपघात, व्यसनाधीनता, कॅसिनो संस्कृती, बेरोजगारी, पर्यावरणाचा नाश, बेसुमार भूरूपांतरे, ड्रग्जचा विळखा अशा अनेक संकटांचा सामना आहे. यांचा सर्वाधिक परिणाम महिलांवर होताना दिसतो. हीच ती माता आज घायाळ आहे. या मातेला या समस्यांतून मुक्त करण्याऐवजी सरकार ‘वंदे मातरम्’च्या नावाखाली उसनी देशभक्ती दाखवून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहे.
लोकांच्या प्रामाणिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विधानसभा हे पवित्र स्थळ आहे. जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करून त्यांना दिलासा देणे हीच खरी राष्ट्रभावना आणि खरी देशभक्ती आहे. परंतु सत्तेच्या बळावर विधानसभेच्या पवित्र स्थानाचा राजकीय लाभासाठी उपयोग करणे ही वृत्ती लोकशाहीसाठी घातक आहे.
‘वंदे मातरम्’च्या विषयावर चर्चा होण्यात काहीच गैर नाही; परंतु ज्वलंत विषयांना बगल देऊन हा विषय प्राधान्याने घेण्याची सरकारची धावपळ ही निव्वळ ढोंगीपणा आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही.

  • Related Posts

    भाजपविरोध की स्वपक्षवृद्धी?

    प्रत्येक मतदारसंघात भाजपविरोधात एकच सक्षम उमेदवार उभा राहिला, तरच खरी लढत होऊ शकते. अन्यथा विरोधी पक्षांच्या स्वतंत्र मोहिमा आणि स्वतंत्र दावे हे भाजपसाठीच सोयीचे ठरतील. गोव्यातील राजकारणात निवडणुकांची चाहूल लागताच…

    सत्तेच्या नशेला आवरा

    लोकशाही केवळ निवडणुकांनी जिवंत राहत नाही. ती प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांमुळे, स्वतंत्र प्रसारमाध्यमांमुळे, निर्भय सामाजिक कार्यकर्त्यांमुळे आणि निष्पक्ष प्रशासनामुळे मजबूत होते. गोव्यातील राजकारण आणि प्रशासन यांच्यातील सीमारेषा दिवसेंदिवस अधिक धूसर होत…

    You Missed

    15/06/2026 e-paper

    15/06/2026 e-paper

    स्मार्ट मीटरवरून ढवळीकर टार्गेट

    स्मार्ट मीटरवरून ढवळीकर टार्गेट

    भाजपविरोध की स्वपक्षवृद्धी?

    भाजपविरोध की स्वपक्षवृद्धी?

    सत्तेच्या रडारवरील कार्यकर्ता; स्वप्नेश शेर्लेकर

    सत्तेच्या रडारवरील कार्यकर्ता; स्वप्नेश शेर्लेकर

    GPCC Chief Girish Chodankar Urges SEBI to Halt Vedanta Iron & Steel Listing Over Alleged ₹16,500 Crore Goa Liability

    GPCC Chief Girish Chodankar Urges SEBI to Halt Vedanta Iron & Steel Listing Over Alleged ₹16,500 Crore Goa Liability

    Four-Day ‘Rakhandar Padyatra’ Begins Across Goa-Karnataka-Maharashtra Border Region

    Four-Day ‘Rakhandar Padyatra’ Begins Across Goa-Karnataka-Maharashtra Border Region