वासंतीचे हौतात्म्य न्याय मागते

न्याय मिळवून देण्याऐवजी वेळकाढूपणा करण्यात आला. हीच सरकारी उदासीनता तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरली, असा लोकांचा ठाम विश्वास आहे.

कारापूरमधील आदिवासी महिला वासंती रामा सालेलकर हिचा संशयास्पद मृत्यू हा केवळ एका व्यक्तीचा अंत नाही, तर संपूर्ण आदिवासी आणि बहुजन समाजाच्या हक्कांवर झालेला आघात आहे. आपल्या वडिलोपार्जित जमिनीच्या अधिकारासाठी तिने अनेक वर्षे एकाकी झुंज दिली. भाटकार आणि बिल्डरांच्या दबावाला न जुमानता तिने न्यायासाठी लढा दिला. मात्र तिच्या मृत्यूने अनेक प्रश्न उभे केले आहेत. हा खरोखरच विजेचा अपघात होता की नियोजित घातपात?
वासंतीचे प्रकरण कुळ कायद्याअंतर्गत मामलेदार कार्यालयात अनेक वर्षे प्रलंबित होते. सरकारी यंत्रणेकडून तिच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाले. सामाजिक संघटनांनी तिचा विषय आदिवासी आयोगापर्यंत पोहोचवला, तरीही काही निष्पन्न झाले नाही. न्याय मिळवून देण्याऐवजी वेळकाढूपणा करण्यात आला. हीच सरकारी उदासीनता तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरली, असा लोकांचा ठाम विश्वास आहे.
वासंतीवर यापूर्वी अनेक हल्ले झाले होते – चाकूने व लोखंडी रॉडने मारहाण, विहिरीत विष टाकण्याचा प्रयत्न, शौचालयात माती टाकून त्रास देणे, भावाचा संशयास्पद मृत्यू. या सर्व घटनांमुळे तिच्या संघर्षाची तीव्रता आणि धैर्य स्पष्ट होते. तरीही तिने हार मानली नाही. सामाजिक संघटनांच्या मदतीने तिने निवेदने सादर केली, पण प्रत्यक्ष मदतीला कोणीही पुढे आले नाही. शेजाऱ्यांनी केवळ सहानुभूती दाखवली, पण उघडपणे साथ दिली नाही. एका गरीब महिलेकडून तब्बल ५२ हजार चौ. मीटर जमिनीसाठी सुरू असलेला लढा हा भाटकार आणि बिल्डरांना अजिबात रुचणारा नव्हता. हाच कारापूर गाव सध्या लोढा कंपनीच्या मेगा प्रकल्पामुळे चर्चेत आला आहे. ह्याच गावातील सातार्डेकर कुटुंबाचाही जमीन मालकीचा विषय सुरू आहे. परंतु जमीन मालकीचा हक्क सांगणारी कागदपत्रे आणि पुरावे असूनही सत्ता आणि पैशांच्या दबावापोटी त्यांच्या दाव्यांकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही, ही खरोखरच आपल्या लोकशाही व्यवस्थेची थट्टाच ठरली आहे.
राज्यात बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्यांच्या संघर्षाची माहिती दिली जाते. पण वासंतीसारख्या महिलांच्या लढ्याला प्रत्यक्ष पाठबळ देण्याची तयारी कुणी दाखवत नाही. बिरसा मुंडा यांनी शिकवले की जमीन, जंगल आणि पाणी हेच जीवनाचे आधार आहेत. वासंतीचा संघर्ष हाच संदेश पुन्हा अधोरेखित करतो.
गाकुवेधचे नेते रामकृष्ण जल्मी आणि ॲड. अजय प्रभूगांवकर यांनी वासंतीच्या मृत्यूमागे घातपात असण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यांनी एसआयटी किंवा सीबीआय तपासाची मागणी केली आहे. हा तपास निष्पक्षपणे झाला नाही तर आदिवासी समाजाचा विश्वास पूर्णपणे ढासळेल.
वासंती सालेलकर ही आदिवासी महिला आपल्या जमिनीच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढली. तिचा मृत्यू हा अपघात नसून आदिवासी समाजाच्या संघर्षाचे प्रतीक आहे. या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने झाला पाहिजे आणि तिच्या बहिणींना तरी जमिनीचा हक्क मिळाला पाहिजे. अन्यथा वासंतीचा आत्मा शांत बसणार नाही. हा अग्रलेख केवळ वासंतीच्या मृत्यूबाबत नाही, तर आदिवासी समाजाच्या न्यायासाठीच्या लढ्याचा आवाज आहे. सरकारने आणि समाजाने या आवाजाला प्रतिसाद दिला नाही, तर इतिहास त्यांना कधीच माफ करणार नाही.

  • Related Posts

    भाजप महिला जागी हो !

    भाजपमधील महिला संघटनात्मक पातळीवर सक्रिय असूनही समाजातील महिलांवरील अन्याय, अत्याचार तसेच महिलांशी संबंधित विषयांवर गप्प का राहतात, हा खरा चर्चेचा विषय आहे. महिला हीच खरी भाजपची ताकद आहे. भाजपाच्या यशात…

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    पोलिस खाते असे वागू लागले तर ती धोक्याची सूचना आहे. पोलिसांवरचा लोकांचा विश्वास गेला तर प्रत्येकजण न्यायासाठी स्वतःचा मार्ग पत्करू लागेल. प्रत्येकाने स्वतःच न्यायनिवाडा सुरू केला तर राज्यात अराजकता माजण्यास…

    You Missed

    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    24/03/2026 e-paper

    24/03/2026 e-paper

    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    भाजप महिला जागी हो !

    भाजप महिला जागी हो !

    23/03/2026 e-paper

    23/03/2026 e-paper

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…