
गोमंतकीय जनतेचा विश्वास संपादन करणे आवश्यक – स्वप्नेश शेर्लेकर
गांवकारी, दि. ५ (प्रतिनिधी)
राज्यापुढे अनेक गंभीर संकटे उभी आहेत. विद्यमान भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचणे ही काळाची गरज आहे, आणि त्यासाठी विरोधकांनी एकत्र येणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा गोमंतकीय जनतेने ठेवली आहे. विरोधक जर आपसातच भांडत राहिले आणि भाजपला पुन्हा सत्तेचा मार्ग मोकळा करून दिला, तर त्यासारखे दुसरे दुर्दैव नाही, अशी खंत सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांनी व्यक्त केली.
दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस आणि रिव्होल्यूशनरी गोवन्स पार्टीचे अध्यक्ष मनोज परब यांच्यात सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व विरोधकांनी एकत्र यावे, अशी जनतेची अपेक्षा असताना हा संघर्ष नकारात्मक आहे. भाजपची संघटनशक्ती आणि डबल इंजिन सरकारचा प्रभाव लक्षात घेता, प्रत्येक मतदारसंघात भाजपविरोधात एकच मजबूत उमेदवार उभा करणे आवश्यक आहे. विरोधकांची विभागणी म्हणजे भाजपला सत्ता अर्पण केल्यासारखे ठरेल.
जनता भाजपच्या कारभारामुळे त्रस्त झाली आहे. जनतेचा कौल भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा असतानाही, भाजप आमदारांची आयात करून सत्तेवर टिकून आहे. जनमताचा अनादर कोणीही करू नये, यासाठी जनतेने दबाव निर्माण करणे गरजेचे आहे, असेही शेर्लेकर म्हणाले.
मनोज-फर्नांडिस यांच्यात सुसंवाद हवा
मनोज परब आणि कॅप्टन फर्नांडिस यांनी एकमेकांवर टीका करण्याऐवजी संवाद साधावा. राजकीय प्रचाराच्या नादात एकमेकांवर चिखलफेक करणे योग्य नाही. विरोधकांचा खरा शत्रू भाजप असताना, एकमेकांवर टीका करणे भाजपसाठीच फायदेशीर ठरेल. विजय सरदेसाई हे अनुभवी आमदार असून, विरोधकांच्या एकजुटीसाठी त्यांना पाठिंबा देणे आवश्यक आहे. मागील सत्ताकाळातील चुका त्यांनी पुन्हा करणार नाहीत, असा विश्वास जनतेने ठेवावा लागेल. विरोधकांनी एकमेकांवर विश्वास ठेवला नाही, तर जनतेचा विश्वास संपादन करणे कठीण होईल.
काँग्रेस-आप यांची एकजूट गरजेची
लोकसभा निवडणुकीत एकत्र काम केलेल्या काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने पुन्हा एकत्र यावे. देशभरात विरोधक एकमेकांविरोधात उभे राहत असल्याचे चित्र दिसते, जे भाजपसाठी पोषक आहे. काँग्रेसने प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पुढाकार घेऊन सर्वांना एकत्र आणण्याची जबाबदारी स्वीकारावी.
विधानसभेत एकजुटीने सरकारवर हल्ला
विधानसभेत विरोधकांनी एकजुटीने सरकारवर हल्ला चढवावा, असे शेर्लेकर म्हणाले. विश्वजीत राणे यांच्या विरोधात फक्त विरेश बोरकर आवाज उठवत आहेत. विजय सरदेसाई आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना भाजपचा पराभव करायचा असेल, तर नगरनियोजन खात्याच्या कारभाराचा पर्दाफाश करावा लागेल. सरकारशी गुप्त समजुता करून किंवा निवडक टीका करून विरोधक जबाबदारीपासून पळ काढू शकत नाहीत, असेही शेर्लेकर यांनी स्पष्ट केले.