पोलिसांना २४ तासांची मुदत; गोवा बंदची हाक; मोर्चावर लाठीहल्ला
गांवकारी, दि. १९ (प्रतिनिधी)
सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेला हल्ला कुणीतरी घडवून आणल्याचे निष्पन्न झाले आहे. या हल्ल्यामागील मास्टरमाईंडला २४ तासांत अटक झाली नाही, तर सोमवारी गोवा बंद करण्यात येईल, असा इशारा गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिला.
राज्यातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष आणि जागृत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने एकत्र येऊन रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधाराला जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, असा निर्धार सभेत करण्यात आला. राजकीय नेते–गुंडांच्या साटेलोट्याची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करावे, हल्लेखोरांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावेत आणि मुख्य सूत्रधाराला अटक करून या हल्ल्यामागील खरे कारण स्पष्ट करावे, अशी मागणी करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांसमोरील प्रस्ताव
विरोधी आमदार आणि पक्षाच्या अध्यक्षांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटले. यावेळी त्यांनी हल्लेखोरांवर तात्काळ राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावेत, राजकारणी आणि गुंडांच्या साटेलोट्याची चौकशी करण्यासाठी विशेष पोलिस तपास पथक नेमावे, रामा काणकोणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण देण्यात यावे आणि मुख्य म्हणजे या हल्ल्यामागील खऱ्या सूत्रधाराला अटक करावी, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी जीएमसी इस्पितळात जाऊन रामा काणकोणकर यांची विचारपूस करावी, अशी विनंतीही शिष्टमंडळाकडून करण्यात आली. रविवारपर्यंत मुख्य सूत्रधाराला अटक झाली नाही, तर हे आंदोलन अधिक चिघळणार असल्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला.
आंदोलकांवर लाठीचार्ज
आझाद मैदानावरून आंदोलकांनी थेट पोलिस मुख्यालयासमोर मोर्चा वळवला. तिथे जोरदार घोषणा दिल्यानंतर मोर्चा भाजप कार्यालयाकडे वळवण्यात आला. तिथे मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कॅप्टन वेन्झी व्हिएगस यांच्यावरही लाठीचा वापर करण्यात आला.
या लाठीचार्जच्या निषेधार्थ मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याकडे वळवण्यात आला, परंतु चर्चजवळच तो अडवण्यात आला. काही आंदोलक सगळीकडे पसरल्यामुळे बराच काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. अखेर मोर्चाला आल्तीनोपर्यंत जाण्याची अनुमती मिळाली आणि तो मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याजवळ अडवण्यात आला. आंदोलनाबाबत राज्यभरात माहिती पसरल्यानंतर आणखी लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. या आंदोलनात सर्व विरोधी आमदार तसेच विविध विरोधी पक्षांचे अध्यक्ष सहभागी झाले होते. काँग्रेसच्या सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनीही या मोर्चात सहभाग घेतला.
५ जणांना अटक, एकाचा शोध सुरू
पोलिसांनी काल रात्री हल्लेखोरांतील ५ जणांना अटक केली. एथोनी नदार (३१), फ्रान्सिस नदार (३१), मिंगेल आरावजो (२४) हे सांताक्रझचे; मनीष हडफडकर (२४) चोडणचा; आणि सुरेश नाईक (३१) पर्वरीचा रहिवासी आहेत. यापैकी अनेकजण सराईत गुन्हेगार असल्यामुळे त्यांना कुणीतरी सुपारी दिल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फरारी गुन्हेगारालाही लवकरच अटक करण्यात येईल. या प्रकरणाचा मुळापासून शोध घेतला जाईल, असे पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी सांगितले.





