१४ वर्षांचा सत्तावनवास संपणार ?

२७ जागांचा आकडा जाहीर करणे सोपे आहे; त्या २७ जागांसाठी ४० मतदारसंघांत विश्वासाचे राजकारण उभे करणे कठीण आहे.

गोव्यावर सर्वाधिक काळ सत्ता गाजवलेल्या काँग्रेसला मागील १४ वर्षे सत्तेबाहेर का राहावे लागले, याचे आत्मपरीक्षण खरोखरच झाले आहे का? हा प्रश्न आज काँग्रेससमोर उभा आहे. इतिहासातील चुका ओळखून त्यातून धडा घेणारा पक्षच भविष्यात नव्याने उभा राहू शकतो. पण काँग्रेसने गेल्या १४ वर्षांत नेमके काय शिकले, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
२०२७ मध्ये २७ जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त करत काँग्रेसने आज, २२ सप्टेंबरपासून ‘गोंय राखण यात्रा’ सुरू केली आहे. २७ दिवसांत गोव्याच्या ४० ही मतदारसंघांत पोहोचणारी ही यात्रा १८ ऑक्टोबरला संपणार आहे. जमीन, गोव्याची ओळख, पर्यावरण, रोजगार, भ्रष्टाचार आणि सामाजिक सलोखा अशा मुद्द्यांवर जनसंवाद साधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मात्र यात्रा काढणे आणि जनतेचा विश्वास परत मिळवणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.
२०१२ च्या विधानसभा निवडणुकीत मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने काँग्रेसविरोधात प्रभावी राजकीय वातावरण निर्माण केले. निकालात भाजपला २१ आणि मगोला ३ जागा मिळाल्या; आघाडीची बेरीज २४ झाली, तर काँग्रेस केवळ ९ जागांवर घसरली. काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. त्या पराभवामागे केवळ विरोधकांची ताकद नव्हती; सत्तेतील काँग्रेसविरोधातील असंतोषही निर्णायक होता.
म्हणूनच आज काँग्रेसने स्वतःला एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. २०१२ मध्ये जनतेने काँग्रेसला नाकारले, त्यानंतरच्या १४ वर्षांत काँग्रेसने जनतेच्या अपेक्षा समजून घेतल्या की केवळ निवडणुकीची वाट पाहिली ?
आज काँग्रेससमोर दुसरे मोठे आव्हान म्हणजे संघटन. पक्षाचे अनेक नेते आणि आमदार भाजपमध्ये गेले. त्यामुळे मतदारांच्या मनात काँग्रेसची प्रतिमा केवळ सत्तेपासून दूर असलेल्या पक्षाची राहिलेली नाही, तर निवडून दिलेला आमदार भाजपकडे जाण्याची शक्यता असलेला पक्ष अशीही तयार झाली आहे. ही प्रतिमा एका यात्रेने धुऊन निघणार नाही. त्यासाठी मतदारांना विश्वास देणारी ठोस राजकीय हमी आणि मजबूत संघटन आवश्यक आहे.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासमोर नेतृत्वाची उणीव भरून काढण्याचे आव्हान आहे. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यासमोर संघटनेतील नाराजी आणि मतभेद दूर करून कार्यकर्त्यांना एका दिशेने उभे करण्याचे आव्हान आहे. यात्रा किती किलोमीटर चालली यापेक्षा तिच्यानंतर किती कार्यकर्ते बूथवर उभे राहतात, हा खरा कस आहे.
२७ जागांचा आकडा जाहीर करणे सोपे आहे; त्या २७ जागांसाठी ४० मतदारसंघांत विश्वासाचे राजकारण उभे करणे कठीण आहे. काँग्रेसला आता भाजपविरोधी नाराजीवर स्वार होण्यापेक्षा स्वतःचा पर्याय उभा करावा लागेल. जमीन, पर्यावरण, रोजगार, भ्रष्टाचार, प्रशासन आणि गोव्याची ओळख या प्रश्नांवर केवळ घोषणा नकोत; स्पष्ट भूमिका, सातत्यपूर्ण संघर्ष आणि जनतेसमोर उत्तरदायित्व हवे.
‘गोंय राखण यात्रा’ ही काँग्रेसची निवडणूकपूर्व यात्रा आहे की आत्मपरीक्षणाची सुरुवात, हे पुढील काही महिन्यांत स्पष्ट होईल. १४ वर्षांचा सत्तावनवास संपवायचा असेल तर काँग्रेसला प्रथम जनतेच्या मनातील १४ वर्षांची नाराजी समजून घ्यावी लागेल. कारण गोवा जिंकण्यासाठी फक्त यात्रा पुरेशी नाही; गोमंतकीयांचा विश्वास जिंकावा लागेल.

  • Related Posts

    किती करणार मुंडकारांची थट्टा !

    एका घराच्या हक्कासाठी तीन पिढ्यांनी लढायचे आणि सरकारने प्रत्येक वर्षी नवी मुदत द्यायची, यालाच विकसित गोवा म्हणायचे काय? माजी मुख्यमंत्री तथा माजी कृषिमंत्री रवी नाईक यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्याचे…

    आल्वारा जमिनी; आव्हान स्वीकारा !

    मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महसूल अधिकाऱ्यांसह आमच्यासोबत बैठक घ्यावी. या बैठकीत आल्वारा जमिनींसंदर्भातील गैरकारभाराची सर्व प्रकरणे आम्ही त्यांच्यासमोर ठेवू. त्यानंतर ते नेमकी कोणती कारवाई करतात, तेच पाहायचे आहे. हे…

    You Missed

    शिरोड्यात हिमालयन समर्पण ध्यानस्थळी शारदीय नवरात्र अनुष्ठान

    शिरोड्यात हिमालयन समर्पण ध्यानस्थळी शारदीय नवरात्र अनुष्ठान

    15/10/2026 e-paper

    15/10/2026 e-paper

    राज्यावर ३८ हजार कोटींचे कर्ज

    राज्यावर ३८ हजार कोटींचे कर्ज

    जमीन, घरांची मालकी सत्तरीत पेटणार

    जमीन, घरांची मालकी सत्तरीत पेटणार

    किती करणार मुंडकारांची थट्टा !

    किती करणार मुंडकारांची थट्टा !

    Sattari Farmers Demand Ownership Rights Over Alvara Lands, Simplification of Regularisation Process

    Sattari Farmers Demand Ownership Rights Over Alvara Lands, Simplification of Regularisation Process