तुका म्हणे सेटल व्हावे !

मनोजच्या भाषणात बरेच वैयक्तिक मुद्दे आले जे टाळता आले असते. पण हातचे राखून बोलला तर तो मनोज परब कसला?
————————————————————————————
अंत्रुजसिंग फोंडेकर कुठे गायब झाला असा प्रश्न कोणालाही पडला नसेल. पण सद्या गोव्यात कमबॅक करायचे दिवस असल्याने मीही थाटामाटात कमबॅक करायचे ठरवले आहे. सोपटे आणि पार्सेकर भाजपात परत आले. उत्पल पर्रिकरही नव्या भाजप कार्यालयात दिसले. काँग्रेसमध्ये तर लोकांची एंट्री आणि रिएन्ट्री सुरूच आहे. लोक निवडणुकीच्या आधी काँग्रेसमध्ये येतात आणि निवडणूक झाली कि भाजपात जातात असा एक कल आपल्याला दिसतो. बार्देशमध्ये मांद्रेकर, कांदोळकर हे गोवा फॉरवर्डमध्ये बॅकडोर एंट्री करणार असे ऐकिवात आहे. फॉरवर्ड पक्षात बॅकवर्डांनाही जागा आहे हे जाता जाता फॉरवरडोत्तम विजय सरदेसाईंनी ध्वनित केलेले दिसते. पण कुठला पक्ष जॉईन करून कमबॅक करावा एवढी आमची काही ऐपत नाही. दोन लेख लिहून गायब होणारा मी आणि दोन निवडणुका लढून गायब झालेले मनोज परब – आम्ही दोघांनीही आता परत यायचे ठरवले आहे. आमच्या गायब होण्याचे कारण म्हणजे गोव्याचे राजकारण इतके रटाळ झाले होते कि त्याच चर्चा, तेच लोक, त्याच भानगडी आणि तेच ते वाचून ऐकून ह्यावर नवीन तरी काय लिहावे असा प्रश्न पडला होता. पण मनोज परबांच्या भाषणाने गोव्याच्या राजकारणात योग्य अशी तिखटमिठाची फोडणी टाकली. ते ऐकून आमचीही लेखणी शिवशिवू लागली. हे बेचव राजकारण थोडेसे चविष्ट होऊन काहीतरी मजा येईल हि माफक अपेक्षा. नाहीतरी आम्हाला पक्ष वा आमदार फोडायला कोणी कोटी देत नाही. सरकार बदलले म्हणून आमच्यासारख्यांच्या आयुष्यातले भोग काही बदलत नाही. दिवसाच्या धकाधकीतून किमान मनोरंजन तरी झाले पाहिजे. मनोज परबांनी सांगितले आहेच कि पुढचे तीन महिने गोव्याच्या जनतेचे भरपूर मनोरंजन होईल. प्रधानमंत्र्यांच्या ‘मन कि बात’ कार्यक्रमासारखे तेही आता ‘मनोज कि बात’ हा कार्यक्रम सुरु करणार आहेत आणि सगळ्या मनोज समर्थकांनी तो ऐकताना आपले फोटो फेसबुकवर टाकणे गरजेचे आहे असाही आदेश आरजी सुप्रीमोकडून जारी झाला आहे.

मनोज परब प्रायोरिटी बेसिसवर सिव्हिल कंत्राटे घेऊन चुना लावण्याचे काम करत आहे असे सूत्रांकडून कळले. विरेश बोरकरवर चढाई करण्यासाठी मनोज परबने दोड्डामनीची मानस वर काढली तर त्याला उत्तर म्हणून प्रायोरिटी मानस ह्या बांधकाम कंपनीबरोबर मनोजचे कसे संबंध आहेत हे विरेशने आपल्या व्हिडियोतून उघड केले. आपल्या दीड तासाच्या भाषणातही विरेश बोरकरला मीच घडवले आहे असे मनोज परब वारंवार सांगत होता. एकाअर्थी विरेश हा मनोजचा ‘मानस’पुत्र आहे हेच सांगण्याचा त्याचा अट्टाहास होता. मानशीवरची भांडणे गोव्यात काही नवीन नाही. राजकारणातही भरती ओहोटी चालूच असते. निवडणुकीच्या पावणीत सांत आंद्रेची मानस विरेशच्या नशिबी आली पण पुण्यात मनोजसाठी तळायला त्याने पोस्तां पाठवली नाही म्हणून तर हा संघर्ष उद्भवला नसावा ना?

मनोजच्या भाषणात बरेच वैयक्तिक मुद्दे आले जे टाळता आले असते. पण हातचे राखून बोलला तर तो मनोज परब कसला? ओल्ड गोवा आणि बांबोळीतील डोंगरावर आमदाराची गाडी जाते हे कळल्यावर रोहन खंवटे आणि विश्वजित राणे बेचैन झाले. हे डोंगर आपल्या नजरेस अजून का पडले नाहीत ह्या चिंतेमुळे त्यांनी सरळ टीसीपी कार्यालयाचा रस्ता धरला आहे. लवकरच ३९ ए च्या अंतर्गत ह्या डोंगराचे सेटलमेंट झोनमध्ये रूपांतर होऊन तिथे लवकरच एक नवीन टाऊनशिप येणार असे कळले. तिथे चुना लावायला मनोज परब गेला नाही म्हणजे मिळवली. नाहीतरी सेटलमेंट हे गोव्याच्या राजकारणाचे स्थायीरुप आहे. इथे कोण न कोणतरी सेटल होत असतोच. पूर्वी खाणव्यवसायाच्या दरम्यान गोव्याच्या जमिनीत मेटल शोधत होते. आता जमिनी सेटल होण्यासाठी शोधात आहेत. दिल्लीवाले गोव्यात सेटल होतात. त्यांना राहण्यासाठी महागडे व्हिलाज हवे असतात. त्यासाठी जमीन हवी. मग शेतीसाठी ठेवलेली जमीन सेटल होते. पण जमीन सेटल करायला वशिला पाहिजे. मग कार्यालयाच्या कारकुनापासून ते मंत्र्यांपर्यंत सगळे सेटल होतात. त्यांना विरोध करणारेही सेटल केले जातात. हा सेटलमेंटचा पैसा वापरून लोक निवडणूक लढतात. त्यात निवडून येऊन लोकांना सेटल करतात. पूर्वी मोतीलाल सेटलवाद नावाचे एक कायदेतज्ञ होते. पण जमिनी सेटल करण्याच्या नादात गोव्यात सगळेच कायदेतज्ञ बनले आहेत. ज्यांच्याकडे जमीनी आहेत ते डेव्हलपर बनतात. ज्यांच्याकडे नाहीत ते ब्रोकर बनतात. ब्रोकरला भारतीय जनतेच्या भाषेत काय म्हणतात ते दामू नाईकांना माहित असेलच. पूर्वी म्हणे गोव्यातल्या कोमुनिदादीचे तपशील कन्नड लिपीत लिहिले जात असे भेंम्ब्रे सांगताना ऐकले होते. त्या इतिहासाचीच पुनरावृत्ती म्हणून सादीक दोड्डामनी हा कानडी मनुष्य सांत आंद्रेच्या एका कोमुनिदादवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात होता असे उघडकीस आले. दोड्डा म्हणजे मोठे आणि मनी म्हणजे पैसा. सादीक चे नाव एकदम सार्थ आहे. ते नाव नंतर जमिनीच्या उताऱ्यावरून गायबही झाले. गायब झालेल्या व्यक्ती मनोज परबांसारख्या परत कमबॅकही करू शकतात. उद्या सांत आंद्रेत विरेश बोरकर नावाचा आमदार गायब होऊन सादीक दोड्डामनी नावाचा आमदार गोव्याच्या विधानसभेत पोचला तर काय मजा येईल?

ता. क. छट पूजा मिरामार किनाऱ्यावर मोठ्या धामधुमीत साजरी झाली. इथे भाजपच्या कृपेने आता इतके बिहारी सेटल झाले आहेत कि त्यांनी सेटल बिहारी भाजपेयी समाज स्थापन करणे तेवढे बाकी आहे. तूर्तास एवढेच.

अंत्रुजसिंग फोंडेकर

  • Related Posts

    वाघाच्या अस्तित्वाचे पुरावे तीन महिन्यांत देतो!

    पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचे वनमंत्र्यांना आव्हान ————————————————————————————————– गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) म्हादई अभयारण्यातील वाघाच्या चित्रफितीवरून वनमंत्री विश्वजित राणे यांनी केलेल्या दाव्याला पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी आव्हान दिले आहे. संबंधित चित्रफीत…

    सावंत – राणे मनोमिलनासाठी भाजपचे प्रयत्न

    भाजप संघटन सचिव शिवप्रकाश यांची मध्यस्ती ——————————————————————————————————— गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्यातील कथित मतभेद दूर करून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये…

    You Missed

    सादिक दोड्डामणीची ‘वरपर्यंत’ ओळख ?

    सादिक दोड्डामणीची ‘वरपर्यंत’ ओळख ?

    25/11/2026 e-paper

    25/11/2026 e-paper

    तुका म्हणे सेटल व्हावे !

    तुका म्हणे सेटल व्हावे !

    बाबूश मोन्सेरात यांच्यावर मौन का?

    बाबूश मोन्सेरात यांच्यावर मौन का?

    Talak Promoting Bollywood While Ignoring Goan Cultural Heritage: Vishal Pai Cacode

    Talak Promoting Bollywood While Ignoring Goan Cultural Heritage: Vishal Pai Cacode

    २०२७ च्या निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी; दिल्लीत रणनीतीवर खल!

    २०२७ च्या निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी; दिल्लीत रणनीतीवर खल!