पोलीस अधीक्षकांना सहा महिन्यांतील तक्रारींचा अहवाल सादर करण्याचे निर्देश
—————————————-
गांवकारी,दि. २६ (प्रतिनिधी)
राज्यातील ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी वारंवार निर्देश देऊनही प्रभावी कारवाई करण्यात अपयश आल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने संबंधित सरकारी यंत्रणांना कडक शब्दांत फटकारले. विशेषतः किनारपट्टी भागातील वाढत्या ध्वनिप्रदूषणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षकांना मागील सहा महिन्यांत प्राप्त झालेल्या तक्रारींचा पोलीस स्थानकनिहाय सविस्तर अहवाल प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यातील विविध भागांत, विशेषतः किनारपट्टी परिसरात रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात संगीत वाजवणे, ध्वनिवर्धकांचा अनियंत्रित वापर करणे आणि ठरवून दिलेल्या आवाजाच्या मर्यादांचे उल्लंघन करणे याविषयी नागरिकांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. न्यायालयाने यापूर्वीही संबंधित अधिकाऱ्यांना ध्वनिप्रदूषण नियंत्रण नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, परिस्थितीत अपेक्षित सुधारणा दिसून न आल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
न्यायालयाने उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांकडून मागील सहा महिन्यांतील संपूर्ण माहिती मागवली आहे. या अहवालात प्रत्येक पोलीस स्थानकाच्या हद्दीत ध्वनिप्रदूषणाच्या किती तक्रारी प्राप्त झाल्या, त्या कोणत्या माध्यमातून आल्या, त्यावर संबंधित पोलिसांनी कोणती कारवाई केली, किती प्रकरणे नोंदवण्यात आली आणि किती तक्रारी प्रलंबित राहिल्या, यासंबंधीची माहिती अपेक्षित आहे.
पोलीस नियंत्रण कक्षात आलेल्या तक्रारींचाही या अहवालात समावेश करावा लागणार आहे. त्यामुळे केवळ पोलीस स्थानकांत प्रत्यक्ष दाखल झालेल्या तक्रारीच नव्हे, तर दूरध्वनी, हेल्पलाइन किंवा नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून नोंदवण्यात आलेल्या तक्रारी आणि त्यावर झालेल्या कार्यवाहीचाही तपशील न्यायालयापुढे ठेवावा लागेल.
तक्रारी आल्या; कारवाई किती झाली?
ध्वनिप्रदूषणाविरोधात तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली का, आवाज बंद करण्याचे निर्देश दिले का, ध्वनिक्षेपक किंवा अन्य उपकरणे जप्त केली का आणि नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली का, याबाबतही न्यायालयाला स्पष्ट माहिती हवी आहे. केवळ तक्रारींची नोंद करून प्रकरणे बंद करण्यात आली की प्रत्यक्ष प्रतिबंधात्मक आणि दंडात्मक कारवाई करण्यात आली, हे अहवालातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणावर सोमवार, ३० नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असून, पोलीस अधीक्षकांकडून सादर करण्यात येणाऱ्या माहितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





