गोंयकाराला स्वतःच्या भूमीत घरासाठी कर्ज मागण्याची वेळ येणे हेच दुर्दैव आहे. त्याहून मोठे दुर्दैव म्हणजे स्वतःच्या गावात राहण्यासाठी त्याला पर्याय शोधावे लागणे.
———————————————————
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘म्हजे घर’ आणि ‘म्हजो फ्लॅट’ या महत्त्वाकांक्षी योजनांनंतर आता विविध घटकांसाठी गृहकर्ज आणि घरदुरुस्ती कर्ज योजनांची घोषणा केली आहे. सरकारी कर्मचारी, महामंडळे, अनुदानित संस्था आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना घराचे स्वप्न पूर्ण करता यावे, हा या योजनांमागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे दोन ते अडीच महिने शिल्लक असताना घोषणांचा सुरू झालेला हा धडाका पाहता, सरकारला जनतेच्या घराच्या प्रश्नाची आताच आठवण का झाली, असा प्रश्न पडतो. घोषणा करणे सोपे; पण त्या प्रत्यक्षात उतरविणे आणि सामान्यांच्या आवाक्यात आणणे हे खरे आव्हान आहे.
आगामी निवडणुकीत ३० जागा आणि ५० टक्के मतांचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी योजनांचा आणि आश्वासनांचा सपाटा लावला आहे. नोकरभरती, दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण, गृहकर्ज योजना अशा घोषणांमधून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न दिसतो. मात्र, राजकारणात घोषणांची संख्या नव्हे, तर त्यांची पूर्तता महत्त्वाची असते. तीन मोफत सिलिंडरसाठी वार्षिक तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन अजूनही अनेक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. मग नव्या योजनांच्या अंमलबजावणीची हमी कोण देणार?
सरकारी कर्मचाऱ्यांना ३५ लाख रुपयांपर्यंत चार टक्के व्याजदराने गृहकर्ज, खासगी क्षेत्रातील पात्र कर्मचाऱ्यांना चार टक्के व्याजाची सवलत, तसेच महामंडळे आणि अनुदानित संस्थांतील कर्मचाऱ्यांना कर्जसुविधा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. भूमिहीन मूळ गोमंतकीयांना ३० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर पाच हजार रुपयांच्या शुल्कात निवासी गाळे देण्याचेही सरकारने जाहीर केले आहे. घोषणा आकर्षक असल्या तरी त्यांचा प्रत्यक्ष लाभ किती जणांना मिळणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
मुळात आज गोव्यात ३५ लाख रुपयांत चांगला फ्लॅट मिळणेही कठीण झाले आहे. दोन बेडरूमच्या फ्लॅटचे दर अनेक ठिकाणी ७० लाख रुपयांच्या पुढे आहेत. अशा परिस्थितीत ३५ लाखांचे कर्ज देऊन घराचे स्वप्न कसे पूर्ण होणार? दर लाखामागे साधारण एक हजार रुपये मासिक हप्ता गृहीत धरला, तर ३५ लाखांच्या कर्जासाठी दरमहा सुमारे ३५ हजार रुपये भरावे लागतील. त्यात स्वतःचे योगदान, नोंदणी शुल्क आणि इतर खर्च वेगळेच. सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नाचा विचार करता ही योजना कितपत परवडणारी आहे, याचे उत्तर सरकारने द्यायला हवे.
घरदुरुस्तीच्या बाबतीतही सरकारी योजना पुरेशी ठरणार नाही. मालमत्तेची कागदपत्रे, वारसाहक्क, जमिनीची मालकी आणि सरकारी परवानग्यांची गुंतागुंत सामान्य गोमंतकीयांना आधीच त्रासदायक ठरत आहे. ही प्रक्रिया सुलभ न करता कर्जाची सुविधा जाहीर करणे म्हणजे मूळ समस्येला बगल देण्यासारखे आहे. गोवा मानव संसाधन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना गृहकर्ज देण्यापेक्षा त्यांना नियमित सेवेत सामावून घेऊन सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि सुविधा देण्याची गरज अधिक महत्त्वाची होती. आर्थिक स्थैर्य नसेल तर कर्जाचा लाभ तरी कसा घेणार?
सरकारने सर्वांत महत्त्वाचा मुद्दा समजून घेण्याची गरज आहे. गोमंतकीयांना केवळ फ्लॅट नको आहे; त्यांना आपल्या गावात, आपल्या जमिनीवर आणि आपल्या संस्कृतीशी नाते जोडून राहता येईल असे घर हवे आहे. एकेकाळी स्वतःची जमीन घेऊन घर बांधणे शक्य होते. आज जमिनींचे वाढते दर, बांधकामाचा खर्च आणि जमिनींच्या व्यवहारातील गुंतागुंत यामुळे मूळ गोमंतकीयांसाठी स्वतःचे घर उभारणे अशक्यप्राय बनले आहे. गावांतील जमिनींचे व्यापारीकरण आणि वाढते नागरीकरण यामुळे मूळ रहिवासीच आपल्या गावातून बाजूला पडत आहेत. या वास्तवाकडे सरकारचे लक्ष आहे का?
मुंबई-पुण्यासारख्या शहरांत रोजगारासाठी जाणाऱ्या तरुणांना छोट्या फ्लॅटमध्ये राहण्याची तडजोड करावी लागते. पण आपल्या मातृभूमीत, आपल्या मूळ गावातही गोमंतकीयांना अशाच तडजोडी कराव्या लागणार असतील, तर हा विकास कोणासाठी? गावातील घर, अंगण, मोकळी जागा, शेजारधर्म आणि सामाजिक-सांस्कृतिक नाती यांचे महत्त्व केवळ चार भिंतींच्या फ्लॅटमध्ये मोजता येणार नाही. गोव्याची गावसंस्कृती टिकवायची असेल तर घरांच्या प्रश्नाकडे केवळ गृहकर्जाच्या चौकटीतून पाहून चालणार नाही.
सरकारने तज्ज्ञ वास्तुरचनाकार, नगरनियोजक आणि स्थानिक घटकांच्या सहभागातून गावांच्या पुनर्रचनेचा विचार करायला हवा. जुन्या घरांची दुरुस्ती, पारंपरिक घरांचे संवर्धन, गावांतील उपलब्ध जागांचा नियोजनबद्ध वापर आणि मूळ रहिवाशांना गावातच परवडणारी घरे उपलब्ध करून देणे, यासाठी ठोस धोरण हवे. मूळ गोमंतकीयांना त्यांच्या गावातच राहता येत नसेल, तर गृहकर्ज योजनांचा उपयोग किती?
सरकारने योजनांचा पाऊस पाडण्यापेक्षा गोमंतकीयांच्या घराच्या प्रश्नाचे मूळ शोधावे. कर्ज देणे हा उपाय असू शकतो; पण घर परवडणारे बनविणे, जमीन उपलब्ध होण्यातील अडथळे दूर करणे आणि गावांतील मूळ अस्तित्व टिकविणे ही सरकारची खरी जबाबदारी आहे.
गोंयकाराला स्वतःच्या भूमीत घरासाठी कर्ज मागण्याची वेळ येणे हेच दुर्दैव आहे. त्याहून मोठे दुर्दैव म्हणजे स्वतःच्या गावात राहण्यासाठी त्याला पर्याय शोधावे लागणे. गोंयकारालाच त्याच्या भूमीत चाकरमान्यासारखे जगावे लागणार असेल, तर मग ‘हाऊसिंग फॉर ऑल’चा गाजावाजा कशासाठी? गोंयकाराला फ्लॅट नव्हे, तर आपल्या मातीत हक्काचे घर हवे आहे!







