फातर्पेकरीण देवस्थान समितीने केले स्पष्टीकरण
मडगांव, दि. २४ (प्रतिनिधी)
फातर्पेतील श्री शांतादुर्गा फातर्पेकारीण देवस्थानच्या जत्रोत्सवात मुसलमान व्यापाऱ्यांवर बंदी लागू करण्यात आल्याची वार्ता खोटी आहे. देवस्थान समितीने कुठल्याही धर्माला अथवा घटकांवर बंदी किंवा निर्बंध लागू केलेले नाहीत. हा उत्सव धार्मिक पावित्र्यात आणि सुरक्षेत साजरा व्हावा हाच केवळ देवस्थानचा हेतू असल्याचे स्पष्टीकरण फातर्पेकरिण देवस्थान समितीने उपजिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या खास बैठकीत केले.
उपजिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक
केपेचे उपजिल्हाधिकारी मनोहर कारेकर, मामलेदार नथन अफोन्सो आणि कुंकळ्ळीचे पोलिस उप-निरीक्षक सुदन भोसले यांच्या उपस्थितीत २० डिसेंबर २०२४ रोजी ही बैठक झाली. या बैठकीस देवस्थानचे एटर्नी मंगेश देसाई, सतिव संतोष नाईक देसाई खजिनदार आनंद नाईक देसाई हे हजर होते. देवस्थान समितीने यंदाच्या जत्रोत्सवात मुसलमान व्यापाऱ्यांवर बंदी लागू केल्याची खबर सर्वंत्र पसरल्यामुळे चिंतेचे वातावरण बनले आहे. भारतीय संविधानात धर्माच्या आधारावर एखाद्यावर अन्याय करता येत नाही आणि त्यामुळे असा निर्णय हा संविधानाच्या विरोधात ठरणार असल्याचे उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मामलेदार नथन अफोन्सो यांनीही यासंदर्भात देवस्थानच्या निर्णयाबाबतची वार्ता सर्वंत्र पसरल्याने त्यामुळे चुकीचा संदेश पोहचल्याची माहिती दिली.
देवस्थानच्या आमसभेत ठराव पास झालाच नाही
देवस्थानच्या आमसभेत असा कोणताही ठराव मंजूर झालेला नाही आणि त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यामुळे देवस्थानच्या महाजनांनाही मनस्ताप झाल्याची माहिती यावेळी देवस्थान समितीने दिली. हा विषय काही महाजनांनी आमसभेत उपस्थित केला होता परंतु त्याबाबत चर्चा झाली असली तरी त्याची नोंद किंवा ठराव घेण्यात आला नाही. प्रामुख्याने जत्रोत्सवातील धार्मिक पावित्र्य आणि सुरक्षा या अनुषंगानेच काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते,असेही त्यांनी सांगितले. फातर्पेकरिणीचा जत्रोत्सव हा परंपरागत धार्मिक सलोख्याचा एक आदर्श मानला जातो. विविध जात, धर्म, पंथाचे लोक या उत्सवात भक्तीभावाने सहभागी होतात आणि देवीचे आशीर्वाद घेतात. हा उत्सव कायम सर्वसमावेशकतेचा आदर करणारा असल्याने एखाद्या धर्माच्या लोकांना परावृत्त करण्याचा प्रश्नच उदभवत नाही,असेही यावेळी समितीने स्पष्ट केले.
प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य
जत्रोत्सवातील सुरक्षा आणि अन्य गोष्टींबाबत देवस्थान समितीला पोलिस आणि इतर सरकारी यंत्रणांचे पूर्ण सहकार्य लाभणार असल्याची ग्वाही उपजिल्हाधिकारी कारेकर आणि मामलेदार नथन अफोन्सो यांनी दिली. हा उत्सव कुठल्याही अनुचित प्रकाराविना शांततेत, भक्तीभावात संपन्न व्हावा यासाठी पोलिस, अग्निशमन दल, आपत्कालीन सेवा आदींचे सहकार्य लाभणार असल्याची हमीही त्यांनी दिली.