
कळंगुटात जलसफर बोट उलटल्याने एकाचा मृत्यू
पणजी,दि.२५(प्रतिनिधी)
सरत्या वर्षांच्या पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गोव्यात देशी- विदेशी पर्यटकांची झुंबड उडाली असतानाच आज कळंगुट येथील एका अपघाताने या उत्साहाला गालबोट लागले. पर्यटकांना जलसफारीसाठी घेऊन गेलेली एक बोट कळंगुट समुद्रात उलटल्याने एका पर्यटकाचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ पर्यटकांना समुद्रात घेऊन गेलेली ही बोट उलटली. यातील १२ पर्यटकांना वाचवण्यात येथील जीवरक्षकांना यश आले, मात्र खेड महाराष्ट्र येथील सूर्यकांत पोफळकर (४५) या पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला. वाचवण्यात आलेल्यांपैकी १२ पैकी ८ पर्यटकांना कांदोळी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान एका लहान मुलासह पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी जीवरक्षक, कळंगूट पोलिस, पर्यटक पोलिस आणि वाहतूक पोलिसांनी तात्काळ धाव घेतली.
इतर ठिकाणीही अपघात आणि बळी
सत्तरी पाटवळ येथे शिकारीला गेलेल्या ठिकाणी बंदूकीची गोळी लागून समत खान या २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून या घटनेचा तपास सुरू आहे. पर्वत- पारोडा याठिकाणी ओव्हरटेक करण्याच्या नादात झालेल्या अपघातात रोशन मुझावर ४१ वर्षीय इसम ठार होण्याची घटना घडली. दोन दुचाकींत हा अपघात घडला. सावईवेरे येथे अनंत देवस्थानच्या तळीत मुलांना पोहायला शिकवणाऱ्या युवकाचा बुडून मृत्यू होण्याचाही प्रकार घडला. तुळशीदास दत्ता पालकर असे या इसमाचे नाव आहे. तो चांगला पोहणारा होता परंतु त्याला ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे ही घटना घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बेभान पर्यटक आणि असुरक्षीत गोंयकार
राज्यात सरत्या वर्षाच्या पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. बहुतांश पर्यटक हे भाड्याने दुचाकी किंवा रेंट ए कार घेऊन फिरत असल्याने ते बेभान होऊन वाहने हाकत असल्याचे जाणवत आहे. रस्ते माहित नसल्यामुळे मोबाईलवरून गुगल सर्चच्या वापर करून वाहने चालवण्याचे प्रकार घडत असल्याने त्याचा फटका नियमीत वाहतुकीवर होत असल्याच्या तक्रारी आहेत. रेंट ए कारबाबत हीच परिस्थिती आहे. पर्वरी येथे उड्डाणपुलामुळे आधीच वाहतूक कोंडी निर्माण होत असताना आता पर्यटकांमुळे तिथे आणखीनच कोंडी निर्माण होऊ लागल्याने गोंयकारांना आपल्या नेहमीच्या कामात व्यत्यय येत असल्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.