सलाम ! संतोबाराव सिंघमना

केवळ बदली आणि आवडते पोस्टिंग मिळवण्यासाठी आत्ताच्या काळात राजकीय नेत्यांसमोर लोटांगण घालणारे अधिकारी आपण पाहिले आहेत, परंतु बदलीची फिकीर न करता आपल्या पोलिस सेवेच्या तत्त्वांशी तडजोड न करणाऱ्या संतोबारावांना एकाच दिवशी दोन वेळा बदलीचा आदेश स्वीकारण्याचीही वेळ आली, यावरून त्यांचा बाणेदारपणा स्पष्ट होतो.

सिंघम चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मला आठवतंय की तत्कालीन पोलिस महासंचालकांनी खात्यातील अधिकाऱ्यांसाठी या चित्रपटाचा खास शो आयोजित केला होता. किमान हा चित्रपट पाहून एक तरी सिंघम निर्माण होईल, अशी भाबडी आशा होती. तसे पोलिस खात्यात सिंघम तयार झाले, पण ते केवळ शारीरिक पिळवटण्यापुरतेच. आत्मसन्मान, स्वाभिमान आणि पोलिस सेवेचा बाणा अंगीकारलेला सिंघम मात्र पाहण्याचा योग आला नाही. माजी पोलिस उपअधीक्षक संतोबाराव देसाई यांच्या निधनाची बातमी काल समजली. त्यांची कारकीर्द जवळून पाहण्याचा योग आला नाही, परंतु अनेक ज्येष्ठांकडून त्यांच्याबद्दल ऐकले. ते आपल्या काळातील खरे सिंघम होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
सत्तरीतील ठाणे गावचे खाशे म्हणूनही त्यांची ओळख होती. ते मूळ ठाणे-सत्तरीचे असले तरी त्यांनी फोंडा ही आपली कर्मभूमी म्हणून निवडली होती. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपले लक्ष उद्योग-व्यवसायात घालून एक यशस्वी उद्योजक म्हणूनही परिचित झाले. विशेष म्हणजे त्यांनी अनेकांना घडवले. दातृत्व ही त्यांची जमेची बाजू होती. शिक्षणासाठी अनेकांना त्यांनी मदत केली. पोलिस खात्यात रुजू होण्यासाठी अनेकांना मार्गदर्शन केले. अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज संघटनेचे यशस्वीरित्या नेतृत्व करून मराठा संकुल उभारणीच्या प्रारंभीच्या काळात महत्त्वाचे योगदान दिले. मगो पक्षाच्या तिकिटावर त्यांनी पर्ये मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना आव्हान दिले, परंतु ते पराभूत झाले. पराभूत झाल्यानंतर राजकारण हे आपले क्षेत्र नाही, हे ओळखून त्यांनी व्यवस्थित पद्धतीने राजकारणापासून अलिप्त राहण्याचा आणि आपला उद्योग तसेच सामाजिक कार्याकडे भर देण्याचा निर्णय घेतला.
एक कर्तबगार पोलिस अधिकारी म्हणून अजूनही आमचे अनेक ज्येष्ठ पत्रकार त्यांचा उल्लेख करतात. गुंडांचा कर्दनकाळ, कठोर आणि नियमाला धरून काम करण्याची त्यांची पद्धत. साहजिकच पोलिसांना आपल्या हुकुमाचे ताबेदार म्हणून वागवण्याची सवय असलेल्या वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या नाराजीला त्यांना सामोरे जावे लागले. केवळ बदली आणि आवडते पोस्टिंग मिळवण्यासाठी आत्ताच्या काळात राजकीय नेत्यांसमोर लोटांगण घालणारे अधिकारी आपण पाहिले आहेत, परंतु बदलीची फिकीर न करता आपल्या पोलिस सेवेच्या तत्त्वांशी तडजोड न करणाऱ्या संतोबारावांना एकाच दिवशी दोन वेळा बदलीचा आदेश स्वीकारण्याचीही वेळ आली, यावरून त्यांचा बाणेदारपणा स्पष्ट होतो.
उंच, धिप्पाड शरीरयष्टी, धारदार आवाज आणि राजबिंड व्यक्तिमत्त्व असल्यामुळे ते खरोखरच सुपरकॉप शोभायचे. सत्तरीचे देसाई खाशे असल्यामुळे साहजिकच त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्याशी त्यांचे कितपत जुळणार, याबाबत साशंकता होतीच. अधीक्षकपदासाठी पात्र असूनही त्यांना ही संधी मिळाली नाही आणि अशा पदांसाठी आपला बाणा सोडून शरणागती पत्करण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे ते उपअधीक्षक म्हणूनच निवृत्त झाले. आंदोलनावेळी कायदा-सुव्यवस्था हाताळण्यात त्यांचा कसब होता. चळवळ, आंदोलनाची पार्श्वभूमी जाणून घेतल्यास परिस्थिती हाताळण्यास मदत होते, असे त्यांचे म्हणणे होते. आता पार्श्वभूमी वगैरे काही नाही. अशा प्रसंगी आपल्या गॉडफादराच्या इशाऱ्यांवर हीरोगिरी करून आंदोलकांवर पोलिसी बळाचा वापर करणारेच अधिक दिसतात. समाजाने आणि वैयक्तिक स्तरावर आदर्श घेण्यासारखी व्यक्तिमत्त्वे अभावानेच घडत असतात. संतोबाराव देसाई हे त्यापैकीच एक होते. त्यांना भावपूर्ण आदरांजली.

  • Related Posts

    सुर्लकरांना न्याय, मोपा पीडितांना कधी ?

    सुर्लकरांना न्याय मिळतोय, ही चांगली सुरुवात आहे. पण प्रश्न एवढाच, मोपा पीडितांना न्याय कधी? सुर्ल ग्रामस्थांनी खाण कंपन्यांकडून झालेल्या प्रदूषणामुळे शेती, बागायती आणि जलस्रोतांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी उभारलेला लढा…

    सांगेतील वादावर पडदा

    कार्यकर्त्यांचे गैरसमज दूर झाल्याचा दामू नाईक यांचा दावा गांवकारी, दि. १० (प्रतिनिधी) समाजकल्याणमंत्री तथा सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी केलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भाजप मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक…

    You Missed

    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals

    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals

    प्रभव नायकांकडून मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्पाचा‘अपयशाचा ११वा वर्धापनदिन’ पाळला

    प्रभव नायकांकडून मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्पाचा‘अपयशाचा ११वा वर्धापनदिन’ पाळला

    1526–2026: 500 Years of the Foral

    1526–2026: 500 Years of the Foral

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM

    Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM