विरोधकांनो, जनतेची निराश करू नका…!

विधानसभा अधिवेशन म्हणजे रणनितीचा भाग असतो. एखादा आमदार हुशार असून चालत नाही, तर सर्वांनी एकत्रितपणे रणनीती आखूनच सरकारला घेरता येते.

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै ते ८ ऑगष्टपर्यंत चालणार आहे. तब्बल १५ दिवसांच्या या प्रदीर्घ अधिवेशनाकडे संपूर्ण गोव्याच्या जनतेचे लक्ष लागले आहे. काही जण म्हणतात की जनतेला राजकारणात काहीही रस नाही, पण प्रत्यक्षात जनतेला बरेच काही लागून राहिले आहे. फक्त ते बाहेरून दिसत नाही. विविध प्रश्नांनी राज्य आणि गोव्याची जनता चक्रव्युहात अडकली आहे, आणि यातून बाहेर पडायचे कसे, हेच लोकांना समजत नाही. या अधिवेशनात सरकारकडून किंवा विरोधकांकडून जनतेला दिशा प्राप्त होईल काय, हा महत्वाचा प्रश्न आहे. या कार्यकाळात पहिल्यांदाच विरोधी बाकांवर केवळ ७ आमदार आहेत, तर सत्ताधारी बाकांवर तब्बल ३३ आमदारांचे सैन्य आहे. विरोधकांची ताकद कमी असली तरी मागील काही अधिवेशनांमध्ये त्यांनी सरकारवर प्रभाव टाकल्याचे दिसून आले. मात्र, या सात विरोधकांमध्ये समन्वयाचा अभाव आणि एकमेकांविरोधातील दुश्वास ही भाजपसाठी जमेची बाजू ठरली आहे. त्यामुळे विरोधक एकत्र येऊ नयेत, यासाठी भाजपने रणनीती आखली आहे. या सात विरोधकांपैकी फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई हे एकमेव अनुभवी आमदार आहेत. उर्वरित सहा आमदार प्रथमच विधानसभेत निवडून आले आहेत. तरीही प्रत्येकाला आपल्या पक्षाच्या भवितव्याची चिंता असल्यामुळे विधानसभेतील कामकाजाचे श्रेय मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. विरोधी पक्षांनी जनतेला विधानसभेसाठी प्रश्न पाठविण्याचे आवाहन केले होते. यानुसार विजय सरदेसाई यांनी “आमचो आवाज विजय” या उपक्रमांतर्गत सुमारे २ हजारांहून अधिक प्रश्न प्राप्त झाल्याची माहिती दिली आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाने अनेक ठिकाणी हा उपक्रम राबवला. काँग्रेसने “संविधान बचाव अभियान” अंतर्गत जनतेशी संवाद साधला. आम आदमी पार्टीनेही बैठका आयोजित करून जनतेच्या सूचना ऐकल्या. आरजीपीनेही जनतेला आवाहन केले. प्रत्येक पक्षाने स्वतंत्रपणे लोकांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला, आणि त्यात एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधीही गमावली नाही. काँग्रेसच्या डिचोली येथील बैठकीत एका व्यक्तीने आमदार विजय सरदेसाई यांच्यावर भूरूपांतराचा आरोप केला. यावर विजय सरदेसाई यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत हा आरोप भाजप आणि काँग्रेसच्या छुप्या दोस्तीचा भाग असल्याचे म्हटले. त्यांच्या प्रतिक्रियेवर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी प्रत्युत्तर देत सरदेसाई यांच्यावर टीका केली. विरोधकांतील ही धुमश्चक्री भाजपच्या गोटात आनंददायक ठरली आहे. युद्धापूर्वीच विरोधकांमध्ये गोंधळ निर्माण झाल्यामुळे भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे. विधानसभा अधिवेशन म्हणजे रणनितीचा भाग असतो. एखादा आमदार हुशार असून चालत नाही, तर सर्वांनी एकत्रितपणे रणनीती आखूनच सरकारला घेरता येते. मोठ्या आवाजात भाषणे करून सरकारवर तुटून पडल्याचे दाखवण्यापेक्षा, सरकारच्या अपयशावर माहितीच्या आधारे आणि युक्तिवादातून प्रकाश टाकणे अधिक प्रभावी ठरते. गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेस यांच्यातील वादात आता काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी हळदोण्याचे आमदार कार्लूस फेरेर्रा यांच्यावर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना पत्र पाठवले आहे. हे पत्र समाजमाध्यमांवर फिरत आहे. आमदार कार्लूस हे कुडचडे मतदारसंघात माजी मंत्री निलेश काब्राल यांच्या वाढदिवसाला उपस्थित होते आणि त्यांनी त्यांचे गुणगान गायले. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष खवळले आणि ही बाब त्यांच्यासाठी अडचणीची ठरली. हे संपूर्ण चित्र पाहता, विरोधक सरकारवर तुटून पडणार की एकमेकांची उणीदुणी काढून जनतेचा भ्रमनिरास करणार, हे प्रत्यक्ष अधिवेशनातच स्पष्ट होईल.

  • Related Posts

    गोव्यासमोरील मूक आपत्ती

    प्रत्येक मृत्यूमागे उद्ध्वस्त झालेले एक कुटुंब, अनाथ झालेली मुले आणि आर्थिक संकटात सापडलेले पालक किंवा जोडीदार आहेत. गोव्यातील वाढते रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणारे मृत्यू हे आता केवळ वाहतूक नियमांचे…

    पर्यावरण संरक्षण की धूळफेक ?

    अन्यथा पर्यावरण संरक्षणाच्या घोषणा आणि विकासाच्या मंजुऱ्या यांतील विरोधाभास हा जनतेच्या दृष्टीने ‘धोरण’ नसून ‘धूळफेक’ म्हणूनच पाहिला जाईल. गोव्यात विकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्ष नवा नाही. मात्र अलीकडच्या काळात एक…

    You Missed

    Vijai Sardesai Demands Transparency Over Proposed Privatization of Campal Sports Complex

    Vijai Sardesai Demands Transparency Over Proposed Privatization of Campal Sports Complex

    GPCC Blames BJP Government for Deteriorating Law and Order After Anand Patil’s Death

    GPCC Blames BJP Government for Deteriorating Law and Order After Anand Patil’s Death

    CM Pramod Sawant Highlights PM Modi’s Message on Self-Reliance and Nation Building After Mann Ki Baat

    CM Pramod Sawant Highlights PM Modi’s Message on Self-Reliance and Nation Building After Mann Ki Baat

    वटपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्यव्यापी वटवृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

    वटपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्यव्यापी वटवृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

    Transport Department Responds to Long-Pending Demands of Goa Private Bus Operators

    Transport Department Responds to Long-Pending Demands of Goa Private Bus Operators

    Youth Congress Holds Mashal March Demanding Action Over NEET Paper Leak

    Youth Congress Holds Mashal March Demanding Action Over NEET Paper Leak