अवि ब्रागांझा या कौशल्य चाचणीत पूर्णपणे नापास झाला आहे. त्याला आपल्या भावनांवर आणि संतापावर ताबा मिळवावा लागेल. आपल्या भावनांना अशीच स्फोटक वाट मोकळी करून देण्याची सवय जर कायम राहीली तर कलाकार म्हणून त्याचा शेवट निश्चितच दूर नाही हे मात्र नक्की.
आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचे जोरदार पुरस्कर्ते पण म्हणून अभिव्यक्तीच्या नावाखाली काहीही केले तरी ते चालेल हे मात्र अयोग्यच आहे. कलाकार, साहित्यिकांनी अभिव्यक्तीच्या कवचकुंडलांचा आधार घेऊन आपला वैयक्तीक राग किंवा असुया व्यक्त करण्यासाठी आपल्या कलेचा किंवा व्यवसायाचा उपयोग करणे हे नैतिकतेला धरून नाही. अवि ब्रागांझा हा एक चांगला होतकरु रॅप गायक आपल्या आक्षेपार्ह व्हिडिओमुळे अडचणीत आला आहे. कलाकारांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवूनच कलेच्या रंगमंचावर चढले पाहीजे. प्रेम, करूणा, दया, माया आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे माणूसकीची रूजवण करण्याचे काम साहित्यिकस कलाकारांनी आत्तापर्यंत केले आहे. या देदीप्यमान वारशाला कलंक लावण्याचा अधिकार कुणालाच नाही, हे सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. दक्षिण गोव्यातील मुळ माजोर्डा या गांवचा हा तरूण रॅप गायक फेसबुकवरील माहितीप्रमाणे मस्कत-ओमान येथे वास्तव करतो. कुठल्या तरी मनोरंजन कंपनीसाठी तो करतो आणि बारीक-सारीक कॉन्सर्ट किंवा व्हिडिओ गाणी तयार करण्याचेही तो काम करतो. प्रसिद्ध श्रीलंकन युवा गायिका योहानी हीचे एक गाणे बरेच गाजले होते. या गाण्याचे कोकणी, हिंदी रिमिक्स करून अवि ब्रागांझा यांनी खूपच कीर्ती मिळवली होती. मनीके मागे हीते असे या गाण्याचे बोल होते. भाषा जरी समजत नसली तरी तो सुरेल आणि थेट काळजाला स्पर्श करणाऱ्या आवाजामुळे तरूणाईत हे गाणे प्रचंड हीट ठरले होते. अवि ब्रागांझा याने त्याला कोकणी साज देऊन या गाण्याची चीज केले होते. तेव्हा कुठे अवि ब्रागांझा हा कलाकार गोंयकारांना परिचित झाला. कोकणी भाषेला त्याने या गाण्यातून एक वेगळी ओळख प्राप्त करून दिली तसेच जगभरातील कोकणी मोगींनी त्याच्या या रिमिक्स गाण्याला पसंती दिली होती. गोंयकारांच्या काळजात आपले एक स्थान तयार केलेल्या अवि ब्रागांझा याने मात्र आपल्या एका नव्या आक्षेपार्ह व्हिडिओमुळे आपली लोकप्रियता तरी बुडवलीच परंतु एक कलाकार म्हणूनही असलेला मान सन्मान धुळीस मिळवला असेच आम्ही म्हणणार. ख्रिस्ती लोकांवरील हल्ले, चर्चवरील हल्ले यातून दुखावलेल्या अवि ब्रागांझा याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अत्यंत अश्लाघ्य भाषेत उल्लेख केला आहे. हे करत असताना त्यांनी हिंदू धर्माची अवहेलना आणि मस्करी केली आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी आपल्या ख्रिस्ती बांधवांना हिंसक सल्लाही दिला आहे. ही वृत्ती कुठल्याही कलाकाराला शोभणारी नाही. अभिव्यक्तीच्या मर्यादांचे पालन होणे गरजेचे आहे. या मर्यादांच्या कक्षेत राहूनच किती उत्स्फुर्तपणे आणि प्रभावीपणे आपण लोकांपर्यंत संदेश पोहचवू शकतो हे तर कलाकाराचे कौशल्य आहे. अवि ब्रागांझा या कौशल्य चाचणीत पूर्णपणे नापास झाला आहे. त्याला आपल्या भावनांवर आणि संतापावर ताबा मिळवावा लागेल. आपल्या भावनांना अशीच स्फोटक वाट मोकळी करून देण्याची सवय जर कायम राहीली तर कलाकार म्हणून त्याचा शेवट निश्चितच दूर नाही हे मात्र नक्की.