दोतोर, आरोग्याची काळजी घ्या !

राजकारण्यांचा फक्त चेहराच पाहायची आम्हा जनतेला सवय झालेली आहे. त्यांच्या मनात, हृदयात नेमके काय चालते हे कुणीही जाणू शकत नाही.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रकृतीसंबंधीची बातमी काल रात्री सोशल मीडियावर फिरू लागली. राजकीय नेत्यांच्या आरोग्य किंवा तत्सम बातम्या अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरतात; अर्थात तो प्रत्येकाच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. काल रात्री पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य हृदयरोगतज्ज्ञ आणि व्यवस्थापकीय ट्रस्टी डॉ. पुर्वेज ग्रँट यांच्या नावाने एक अधिकृत बुलेटीन जारी झाले. यात मुख्यमंत्र्यांवर यशस्वी अँजिओप्लास्टी प्रक्रिया झाल्याचे सांगून, कोणत्याही अडचणीविना ही प्रक्रिया पार पडली असून ते पूर्णपणे स्थिर असल्याचे नमूद करण्यात आले. त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आल्याचेही या बुलेटीनमध्ये सांगण्यात आले.
ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. सर्व प्रमुख माध्यमांनी ती शुक्रवारच्या अंकात प्रसिद्ध केली. टाईम्स ऑफ इंडियासारख्या राष्ट्रीय दैनिकानेही याची दखल घेतली. गुरुवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या विविध कार्यक्रमांच्या बातम्या त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तसेच माहिती खात्याकडून प्रसिद्ध होत होत्या. अशावेळी अचानक रात्री ही बातमी मिळाल्यामुळे चिंता निर्माण होणे स्वाभाविक होते. राजकीय नेत्यांच्या प्रकृतीसंबंधीची माहिती सहसा सार्वजनिक केली जात नाही; अशा माहितीत गुप्तता राखली जाते. महानगरपालिकेच्या निकालादिवशी अशाच प्रकारे ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या प्रकृतीसंबंधी वावड्या उठवण्यात आल्या होत्या. मात्र बाबुश मोन्सेरात पॅनलच्या विजयाच्या शुभेच्छा देणारा संदेश एक्स प्लॅटफॉर्मवर आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या नावाने झळकल्यानंतर या वावड्या कमी झाल्या.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १९ मार्च रोजी आपल्या पदाची सात वर्षे पूर्ण केली. ह्याच दिवशी त्यांना इस्पितळात दाखल व्हावे लागले आणि अँजिओप्लास्टी प्रक्रियेची बातमी पसरल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये, चाहत्यांमध्ये, कुटुंबीयांमध्ये आणि गोव्याच्या जनतेत काही प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली. सकाळीच इन गोवाचा ब्रेकिंग संदेश आला की ते नियमित तपासणीसाठी इस्पितळात गेले होते. सर्व चाचण्या योग्य प्रकारे पार पडल्या आणि त्यांच्यावर अँजिओप्लास्टीसारखी कोणतीही प्रक्रिया झाली नाही. ही बातमी धक्कादायक होती.
यानंतर सीएमओ कार्यालयाकडूनही अधिकृत माहिती देण्यात आली की ही फक्त नियमित तपासणी होती. सीएमओच्या विनंतीवरून एक व्हिडिओ जारी करण्यात आला. या व्हिडिओत डॉक्टरांनी स्पष्ट केले की त्यांच्यावर कोणतीही मोठी शस्त्रक्रिया झाली नाही; तपासणी झाली आणि ते अगदी निरोगी आहेत. शुक्रवारीच त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. एक दिवस ते पुण्यात आराम करतील आणि रविवारी परततील, अशी माहिती देण्यात आली.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी वक्तव्य केले की मुख्यमंत्र्यांवर अँजिओप्लास्टी झाली असून ते स्थिर आहेत. अखेरीस मुख्यमंत्र्यांचाच एक व्हिडिओ जारी झाला आणि त्यांनी स्पष्ट केले की ते फक्त नियमित तपासणीसाठी आले होते आणि अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यातून डॉक्टरांचे बुलेटीन, दामू नाईक यांचे वक्तव्य या सगळ्या गोष्टी अफवा ठरल्या असे म्हणावे लागेल. बाकी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे निर्व्यसनी व्यक्ती आहेत. खाण्यापिण्यापासूनच्या गोष्टींवर त्यांचे नियंत्रण असते. सकाळी उठून रोज व्यायाम, योगा हा त्यांचा नित्यक्रम आहे. त्यांच्या कामाचा व्याप पाहता ते रोज सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहतात. त्यांच्या चेहऱ्यावरील ऊर्जा आणि उत्साह कधीच कमी झालेला दिसत नाही.
राजकारण्यांचा फक्त चेहराच पाहायची आम्हा जनतेला सवय झालेली आहे. त्यांच्या मनात, हृदयात नेमके काय चालते हे कुणीही जाणू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी हीच जनतेची विनंती.

  • Related Posts

    गोव्यासमोरील मूक आपत्ती

    प्रत्येक मृत्यूमागे उद्ध्वस्त झालेले एक कुटुंब, अनाथ झालेली मुले आणि आर्थिक संकटात सापडलेले पालक किंवा जोडीदार आहेत. गोव्यातील वाढते रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणारे मृत्यू हे आता केवळ वाहतूक नियमांचे…

    पर्यावरण संरक्षण की धूळफेक ?

    अन्यथा पर्यावरण संरक्षणाच्या घोषणा आणि विकासाच्या मंजुऱ्या यांतील विरोधाभास हा जनतेच्या दृष्टीने ‘धोरण’ नसून ‘धूळफेक’ म्हणूनच पाहिला जाईल. गोव्यात विकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्ष नवा नाही. मात्र अलीकडच्या काळात एक…

    You Missed

    Transport Department Responds to Long-Pending Demands of Goa Private Bus Operators

    Transport Department Responds to Long-Pending Demands of Goa Private Bus Operators

    Youth Congress Holds Mashal March Demanding Action Over NEET Paper Leak

    Youth Congress Holds Mashal March Demanding Action Over NEET Paper Leak

    GUJ Elects Executive Committee for 2026–2028; Rajtilak Naik Re-Elected President

    GUJ Elects Executive Committee for 2026–2028; Rajtilak Naik Re-Elected President

    27/06/2026 e-paper

    27/06/2026 e-paper

    शहरीकरणाचा बेत अखेर फसला

    शहरीकरणाचा बेत अखेर फसला

    गोव्यासमोरील मूक आपत्ती

    गोव्यासमोरील मूक आपत्ती