बोअरवेलच्या पाण्यात सांडपाणी मिसळले

बिल्डरविरोधात कारवाईबाबत टाळाटाळ

गांवकारी, दि. २० (प्रतिनिधी)

दाबोळी येथील प्रभू बिल्डर्समध्ये आढळलेल्या अतिसार (डायरिया) प्रकरणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात बिघाड होऊन ते पाणी बोअरवेलच्या पाण्यात मिसळल्यामुळेच उद्भवल्याची माहिती दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी दिली. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी उपाययोजना आखण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
दाबोळी येथील प्रभू बिल्डर्स संकुलात आतापर्यंत एकूण १५६ रुग्णांची नोंद झाली आहे. “पहिला रुग्ण १२ मार्च रोजी आढळला. त्याच आठवड्यात ५५ रुग्णांची नोंद झाली. सध्या १५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या आठवड्यात बुधवारी दोन रुग्ण आढळले, तर गेल्या चोवीस तासांत एकही रुग्ण आढळून आला नाही. या उद्रेकाची माहिती मिळताच आरोग्य विभागाने तत्काळ संकुलातील ५ इमारतींमधील ३२८ फ्लॅटमधील सर्व रहिवाशांची तपासणी केली. बहुतांश रुग्ण एका विशिष्ट इमारतीत आढळले.”
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात बिघाड

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने १६ मार्च रोजी तपासणी केली असता सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प योग्यरित्या कार्यरत नसल्याचे आढळले. त्यामुळे प्रक्रिया न केलेले पाणी प्रक्रिया केलेल्या पाण्यात मिसळून ते बोअरवेलच्या पाण्यात गेले आणि तेच पाणी रहिवाशांनी वापरल्याने हा उद्रेक झाला. दरम्यान, बिल्डरविरोधात आरोग्य कायद्याप्रमाणे कारवाई होईल असे सांगितले जात असले तरी कारवाईबाबत टाळाटाळ केली जात असल्याची स्थानिकांची तक्रार आहे.
“सर्व रुग्णांवर आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून त्यांना ओआरएस आणि आवश्यक औषधे दिली जात आहेत,” असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
त्यांनी पुढे सांगितले की, “मागील २४ तासांच्या आकडेवारीनुसार परिस्थिती स्थिर आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने बिल्डरला दूषित पाणी बोअरवेल किंवा इतर पाण्यात मिसळू नये याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.”
पाण्याचे नमुने तपासले

दरम्यान, पाणीपुरवठा विभागाने संकुलातून पाण्याचे नमुने तपासले. काही नमुने दूषित तर काही सुरक्षित आढळले. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या टाक्या, स्विमिंग पूल आणि इतर साठवण यंत्रणांतील पाणी सुरक्षित होते, तर गार्डन आउटलेट, बोअरवेल आणि पाइपलाइनमधील पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले. सध्या बिल्डरने परिस्थिती हाताळत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून पाण्याचा पुरवठा सुरू केला आहे.
आरोग्यमंत्र्यांची नजर

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दाबोळीतील तीव्र अतिसार प्रकरणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध यंत्रणांकडून समन्वयाने तत्काळ कारवाई सुरू करण्यात आल्याचे सांगितले. “आरोग्य यंत्रणा, अन्न व औषध प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम खाते मिळून संयुक्तपणे काम सुरू केले आहे,” असे राणे यांनी म्हटले.
घराघरांत तपासणी मोहीम राबवली जात असून पाण्याचे स्रोत आणि परिसराची सखोल तपासणी केली जात आहे. नागरिकांना उकळलेले पाणी पिणे यासारख्या खबरदारीच्या उपाययोजनांबाबत जनजागृतीही करण्यात आली आहे.
“सर्व रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून त्यांना वेळेवर वैद्यकीय सेवा दिली जात आहे. सक्रिय रुग्ण शोध मोहीम सुरूच राहणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
ओआरएस सहज उपलब्ध करून देण्यात येत असून सर्व पाण्याच्या स्रोतांची तपासणी सुरू आहे. तसेच स्टूल सॅम्पल चाचण्या, जनजागृती आणि विभागांमधील समन्वय यावर पुढील कारवाई अवलंबून असेल, असेही त्यांनी नमूद केले.
उकळलेलेच पाणी प्या

दरम्यान, आरोग्य सेवा संचालनालयाने नागरिकांना स्वच्छतेबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अतिसाराची लक्षणे म्हणजे दिवसातून तीन किंवा अधिक वेळा पातळ शौच होणे, तसेच उलट्या, ताप आणि निर्जलीकरण यांचा समावेश होतो. हे प्रामुख्याने दूषित अन्न किंवा पाण्यामुळे होते.
नागरिकांनी केवळ उकळलेले, गाळलेले किंवा क्लोरीनयुक्त पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ताजे अन्न खावे, हात स्वच्छ धुवावेत आणि लक्षणे दिसल्यास त्वरित ओआरएस घ्यावे व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्वतः औषधे घेणे टाळावे आणि लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असा इशाराही देण्यात आला आहे. दीर्घकाळ अतिसार, रक्तमिश्रित शौच, सतत उलट्या, उच्च ताप किंवा तीव्र निर्जलीकरणाची चिन्हे दिसल्यास तातडीने उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

  • Related Posts

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    South Goa MP Capt. Viriato Fernandes on Monday strongly raised the issue of families who surrendered their land for railway projects, demanding that Konkan Railway give them priority in manpower recruitment as well as allotment of shops at railway stations.

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार

    खासगी बस वाहतूकदारांची सरकारला नोटीसगांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) : राज्यातील खासगी बस व्यावसायिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्या सात दिवसांत सोडवाव्यात; अन्यथा गोव्यात येणारे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना…

    You Missed

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    24/08/2026 e-paper

    24/08/2026 e-paper

    24/08/2026 e-paper

    24/08/2026 e-paper

    कारापूरवासीयांची सुटका करा

    कारापूरवासीयांची सुटका करा

    ‘मेटा’ची दिलगिरी; एक गाजवलेली, एक दडपलेली

    ‘मेटा’ची दिलगिरी; एक गाजवलेली, एक दडपलेली

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार