मानवी तस्करी विरोधात कार्यशाळा संपन्न


महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांचा सहभाग, ‘मुक्ती चळवळ’ची स्थापनापर्वरी, दि. १२- दिनांक ९ आणि १० मे हे दोन दिवस पर्वरी येथील दास्या केंद्राच्या सभागृहात गोवा व महाराष्ट्रातील मानवी तस्करी विरोधी कार्यकर्त्यांची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेसाठी गोव्यासह महाराष्ट्राच्या नऊ जिल्ह्यांतील प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यशाळेचे आयोजन अर्ज (अन्याय रहित जिंदगी) या संस्थेने केले होते.


गोव्यात देहविक्रयातून सुटका झालेल्या मुलींपैकी सुमारे ३०% महिला या महाराष्ट्रातील असल्याचे आढळून आल्याने, गेल्या दीड वर्षांपासून अर्ज संस्थेने या संदर्भात काम हाती घेतले होते. या कामाचा एक भाग म्हणून, महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांतून महिला गोव्यात आणल्या गेल्याचे आढळले, त्या जिल्ह्यांत अर्जने कार्यशाळा घेतल्या. गेल्या दीड वर्षांत अशा एकूण बारा कार्यशाळा घेण्यात आल्या.


या कार्यशाळांचा उद्देश संबंधित जिल्ह्यांतील सरकारी यंत्रणा आणि संवेदनशील नागरिक यांना जागृत करून तिथून होणारी तस्करी थांबवणे हा होता. दुसरा उद्देश म्हणजे गोव्यात सुटका झालेल्या मुलींना आपापल्या जिल्ह्यात परत गेल्यानंतर आवश्यक त्या सेवा मिळाव्यात, जेणेकरून त्यांची पुन्हा तस्करी होणार नाही.


या कार्यशाळांच्या वेळी सहभागी नागरिकांकडून मानवी तस्करी रोखण्याबाबत तपशीलवार मार्गदर्शन करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ही दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत अनैतिक मानवी तस्करी विरोधी कायदा, प्रतिबंधक उपाय, सुटकांची प्रक्रिया, पुनर्वसन आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पालघर, कोल्हापूर, सातारा, अहिल्यानगर व भंडारा या नऊ जिल्ह्यांतील प्रतिनिधी सहभागी होते.


कार्यशाळेच्या अखेरीस सहभागी प्रतिनिधींनी मानवी तस्करी विरोधात संघटित व सातत्यपूर्ण कामाची गरज अधोरेखित करत ‘मुक्ती चळवळ’ सुरू करण्याचे ठरवले. ही चळवळ संवेदनशील गटांसोबत जाणीवजागृतीचे काम करेल, समाजातील पुरुषांची महिलेला विकत घेण्याची प्रवृत्ती कमी करण्याचे प्रयत्न करेल, तसेच प्रसारमाध्यमांतून देहविक्रीबाबतच्या अप्रत्यक्ष जाहीरातींकडे सरकारी यंत्रणांचे लक्ष वेधून यावर कारवाईसाठी पाठपुरावा करेल. मुक्ती चळवळीची निमंत्रक म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार जुईली पांगम यांची निवड करण्यात आली.


ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी अर्जचे संचालक अरुण पांडे, उपसंचालक ज्युलियाना लोहार, प्रकल्प अधिकारी नेहा चारी, सोशल वर्कर मंजुळा शिंत्रे आदींनी मेहनत घेतली. कार्यशाळेची सांगता गोवा राज्य बालअधिकार आयोगाचे अध्यक्ष शशिकांत पुनाजी यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली.

  • Related Posts

    आरजीपीतील अंतर्गत वादाचा स्फोट

    अध्यक्ष मनोज परब यांचा सोशल मीडियावर हल्लाबोल गांवकारी, दि. १२ (प्रतिनिधी) रिव्होल्यूशनरी गोवन्स पार्टी (आरजीपी)तील अंतर्गत वादाने आता सार्वजनिक रूप धारण केले आहे. पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी आज आपल्या…

    उपसरपंच, सचिव सुट्टीवर

    कारापूर-सर्वण पंचायतीचा कारभार ठप्प गांवकारी, दि. ११ (प्रतिनिधी) कारापूर-सर्वण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत हाऊस ऑफ अभिनंदन लोढा प्रकल्पाचे काम बंद करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस जारी करण्यासह इतर महत्त्वाचे ठराव मंजूर झाले आहेत.…

    You Missed

    12/05/2026 e-paper

    12/05/2026 e-paper

    ‘उजो’ मालवायला देऊ नका !

    ‘उजो’ मालवायला देऊ नका !

    आरजीपीतील अंतर्गत वादाचा स्फोट

    आरजीपीतील अंतर्गत वादाचा स्फोट

    मानवी तस्करी विरोधात कार्यशाळा संपन्न

    मानवी तस्करी विरोधात कार्यशाळा संपन्न

    उपसरपंच, सचिव सुट्टीवर

    उपसरपंच, सचिव सुट्टीवर

    सावधान ! जागते रहो…

    सावधान ! जागते रहो…