लीलया पेललेले शिवधनुष्य

आजकाल मराठी रंगभूमीवर अनेक जुन्या नाटकांची पुनर्निर्मिती होताना दिसते. विविध नाट्यसंस्था जुन्या गाजलेल्या नाटकांना नव्या रूपात पुन्हा रंगमंचावर आणत आहेत आणि प्रेक्षकही त्यांना चांगला प्रतिसाद देत आहेत. मात्र, “तो मी नव्हेच!” हे नाटक रंगमंचावर सादर करण्याचे धाडस प्रत्येक नाट्यसंस्था करू शकत नाही. कारण या नाटकाची परंपरा, त्यातील भूमिका आणि विशेषतः लखोबा लोखंडे ही व्यक्तिरेखा अत्यंत आव्हानात्मक मानली जाते.

यापूर्वी नाट्यसंपदा-मुंबई, सुयोग-मुंबई आणि श्रींची इच्छा-पुणे या संस्थांनी हे नाटक रंगमंचावर आणले आणि त्याचे शेकडो प्रयोग केले. नाट्यसंपदाने तर या नाटकाचे हजारो प्रयोग करून मराठी रंगभूमीवर एक वेगळाच इतिहास निर्माण केला. अशा पार्श्वभूमीवर पेपरमध्ये जाहिरात पाहिली की, श्री गंगाळदेव नाट्य मंडळ, मांद्रे-गोवा ही संस्था हे नाटक सादर करणार आहे, तेव्हा खरोखरच आश्चर्य वाटले. पण त्याचवेळी या संस्थेने एवढे मोठे धाडस दाखवले याचे मनापासून कौतुकही वाटले.

“तो मी नव्हेच!” हे माझे अत्यंत आवडते नाटक आहे. पंतांसोबत या नाटकाचे शेकडो प्रयोग करण्याचा योग मला आला. या नाटकात मी कुंकुचंद वेणीचंद मुंदडा, अग्निहोत्री, सुब्रम्हण्यम, मैसुरी इन्स्पेक्टर, वामनराव, भक्त मंडळातील भूमिका तसेच काही प्रयोगांत बॅरिस्टर विप्रदास अशा विविध भूमिका साकारल्या आहेत. पंतांप्रमाणेच डॉ. गिरीश ओक आणि संजय मोने यांनी साकारलेल्या लखोबा लोखंडे यांच्यासोबतही काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे हे नाटक पाहण्याची अनावर इच्छा झाली आणि गडकरी रंगायतन येथे श्री गंगाळदेव नाट्य मंडळाचा प्रयोग पाहिला.

पणशीकर यांनी लखोबा लोखंडे ही भूमिका अक्षरशः हिमालयाएवढ्या उंचीवर नेऊन ठेवली होती. डॉ. गिरीश ओक आणि संजय मोने यांनीही आपल्या परीने ही भूमिका उत्तमरीत्या साकारली आहे. त्यामुळे कोणत्याही कलाकाराची त्यांच्याशी तुलना करणे योग्य ठरणार नाही. मात्र या प्रयोगात लखोबाची भूमिका करणारे अनिल असोलकर यांनी हे शिवधनुष्य कुठेही न डगमगता, कुठेही अंगावर न पडू देता, अत्यंत सहजतेने आणि ताकदीने पेलले, हे विशेष उल्लेखनीय आहे.

अनिल असोलकर यांनी या भूमिकेचा आणि पंतांनी साकारलेल्या भूमिकेचा सखोल अभ्यास केल्याचे त्यांच्या अभिनयातून स्पष्ट जाणवले. अनेक प्रसंगांमध्ये पंतांचाच भास होत होता. गोव्याच्या हौशी रंगभूमीवर आणि नाट्यस्पर्धांमध्ये गाजलेले कलाकार म्हणून असोलकर यांची ओळख आहे. त्या अनुभवाचा ठसा त्यांच्या रंगमंचावरील वावरात स्पष्टपणे दिसून आला. कुठेही नवखेपणा जाणवला नाही, उलट भूमिका त्यांच्या अंगवळणी पडल्यासारखी भासली.

या नाटकातील इतर कलाकारांनीही आपल्या-आपल्या भूमिका समर्थपणे साकारल्या. प्रत्येक कलाकाराचे काम त्यांच्या व्यक्तिरेखेला साजेसे होते. फिरते नेपथ्य, प्रकाशयोजना आणि पार्श्वसंगीत यांनी नाटकाच्या परिणामकारकतेत भर घातली. संपूर्ण प्रयोगात संघटित प्रयत्नांची जाणीव होत होती.

गोव्यात काही प्रयोग केल्यानंतर मुंबईत पाच प्रयोग करणे हीदेखील कौतुकास्पद बाब आहे. श्री गंगाळदेव नाट्य मंडळाने घेतलेले हे धाडस आणि त्यामागील परिश्रम नक्कीच प्रशंसनीय आहेत. पुढील प्रयोगांसाठी संपूर्ण संस्थेला आणि सर्व कलाकारांना मनःपूर्वक शुभेच्छा!

— मोहन साटम
लेखक, दिग्दर्शक, अभिनेता

  • Related Posts

    फातोर्ड्यात वोट चोरी उघड

    आमदार विजय सरदेसाई यांचा आरोप गांवकारी,दि.१७(प्रतिनिधी) फातोर्डा मतदारसंघातील मतदारयादीतून तब्बल साडेचार हजार पात्र मतदारांची नावे वगळण्यात आली असून, मागील दोन निवडणुकांत कुडतरी मतदारसंघात मतदान केलेल्या ५० मतदारांची नावे फातोर्डा मतदारसंघात…

    उपनिरीक्षक सपना गावस यांच्या तपासाला अखेर यश

    बलात्कारप्रकरणी दोषीला जन्मठेप! गांवकारी, दि.१७ (प्रतिनिधी) अवघ्या १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आरोपीला पणजी येथील गोवा राज्य बाल न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून दोन लाख…

    You Missed

    फातोर्ड्यात वोट चोरी उघड

    फातोर्ड्यात वोट चोरी उघड

    उपनिरीक्षक सपना गावस यांच्या तपासाला अखेर यश

    उपनिरीक्षक सपना गावस यांच्या तपासाला अखेर यश

    राहुल गांधी येणार; काँग्रेसमध्ये जोश

    राहुल गांधी येणार; काँग्रेसमध्ये जोश

    गोव्याची वाटचाल कट्टरतेकडे ?

    गोव्याची वाटचाल कट्टरतेकडे ?

    RANE ORDERS INSPECTION OF COMBA SEWAGE MENACE, ASSURES SGDH UPGRADATION

    RANE ORDERS INSPECTION OF COMBA SEWAGE MENACE, ASSURES SGDH UPGRADATION

    17/10/2026 e-paper

    17/10/2026 e-paper