“गुरु हा समाजाचा शिल्पकार आहे,” असे आपण अभिमानाने म्हणतो. मात्र आज हाच शिल्पकार स्वतःच्या आयुष्याशी झुंज देत आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारा शिक्षक स्वतःच्या भविष्याबाबत असुरक्षित झाला आहे. मानसिक ताण, आर्थिक अस्थिरता, वाढत्या जबाबदाऱ्या आणि नोकरीची सततची भीती या चक्रात अनेक शिक्षक अडकले आहेत.
अलीकडे अनेक LBT शिक्षकांना सेवेतून बाहेर पडावे लागले. त्यानंतर पुन्हा संधी मिळाली, पण तीही केवळ करार पद्धतीवर आणि अवघ्या ₹२०,००० मानधनावर. महागाईच्या झळा दिवसेंदिवस वाढत असताना एवढ्या मानधनात कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, घरभाडे, प्रवास, वैद्यकीय खर्च आणि इतर जबाबदाऱ्या कशा पेलायच्या, हा प्रश्न आज हजारो शिक्षकांसमोर उभा आहे.
याहूनही वेदनादायक बाब म्हणजे अनुभवाला न्याय मिळत नाही. सरकारी अनुदानित शाळांमध्ये अनेक वर्षे प्रामाणिक सेवा बजावलेल्या शिक्षकांचा अनुभव अनेक ठिकाणी ग्राह्य धरला जात नाही. पगार शासनाकडून दिला जातो, सेवा नोंदी शिक्षण विभागाकडे असतात, तरी त्या अनुभवाला दुय्यम का मानले जाते? शिक्षकाने घालवलेली आयुष्यातील मौल्यवान वर्षे इतकी स्वस्त आहेत का?
आज शिक्षकाचे काम केवळ वर्गात शिकवण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. तो वर्ग सजवतो, अध्यापन साहित्य तयार करतो, चार्ट, मॉडेल्स, प्रकल्प साहित्य उपलब्ध करून देतो. अनेक शाळांमध्ये झेरॉक्स मशीन, प्रिंटर, आवश्यक शैक्षणिक साधने, अगदी शिक्षकांसाठी व्यवस्थित स्टाफरूमसुद्धा उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करायची तरी कशी?
पेट्रोलचा खर्च, प्रिंटआउट, अध्यापन साहित्य, विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांसाठी लागणारा खर्च अनेकदा शिक्षक स्वतःच्या खिशातून करतो. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून तो सर्व विसरतो; पण त्या त्यागाची दखल कोण घेतो?
यासोबतच अनेक सरकारी शाळांमध्ये नियमित मुख्याध्यापक नसल्याने अतिरिक्त प्रशासकीय जबाबदाऱ्या शिक्षकांवरच येतात. अध्यापन, ऑनलाइन नोंदी, अहवाल, विविध सरकारी उपक्रम, बैठका आणि प्रशासकीय कामांचा वाढता बोजा शिक्षकाच्या खांद्यावर टाकला जातो. अपेक्षा मात्र सतत वाढतच राहतात.
सर्वात मोठी वेदना म्हणजे नोकरीची असुरक्षितता. प्रत्येक सकाळी शाळेत जाताना अनेक शिक्षकांच्या मनात एकच प्रश्न असतो—”उद्या माझी नोकरी असेल का?” हा प्रश्न त्यांना मानसिकदृष्ट्या पोखरत राहतो. वर्गात विद्यार्थ्यांसमोर हसतमुखाने उभा राहणारा शिक्षक आतून मात्र तुटत असतो.
शिक्षक हा देखील एक माणूस आहे. त्यालाही कुटुंब आहे, मुलांचे भविष्य घडवायचे आहे, स्वप्ने आहेत, जबाबदाऱ्या आहेत आणि उद्याची भीतीही आहे. ही भीती त्याच्या आत्मविश्वासालाच खिळ बसवत आहे.
आज विविध सरकारी विभागांतील कर्मचाऱ्यांना वेतन आयोगांचा लाभ, नियमित वेतनवाढ, सेवा सुरक्षितता आणि इतर सुविधा मिळत आहेत. हा त्यांचा हक्कच आहे. मात्र विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारा शिक्षकच या सन्मानापासून आणि आर्थिक स्थैर्यापासून इतका दूर का ठेवला जातो?
शिक्षक दया मागत नाही. तो उपकारही मागत नाही. त्याची मागणी फक्त इतकीच आहे—
- अनुभवाला योग्य मान्यता,
- सन्मानजनक वेतन,
- सेवेची सुरक्षितता,
- शाळांमध्ये आवश्यक मूलभूत सुविधा,
- आणि मानसिक शांततेने काम करण्याचा अधिकार.
आजचा प्रश्न केवळ शिक्षकांचा नाही; तो संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या भवितव्याचा आहे. कारण शिक्षक सक्षम असेल, तरच विद्यार्थी सक्षम घडतील आणि विद्यार्थ्यांमुळेच देशाचे भविष्य उज्ज्वल होईल.
आज जे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि समाजातील जबाबदार नागरिक आहेत, त्यांनाही कधीतरी एखाद्या शिक्षकानेच अक्षरओळख करून दिली होती. मग त्या शिक्षकांच्या वेदना समजून घेण्याची वेळ आता आलेली नाही का?
शेवटी एकच प्रश्न उरतो—
या समाजात शिक्षकाला न्याय कधी मिळणार?
कारण शिक्षक रडला, तर त्याचा आवाज फारसा ऐकू येत नाही; पण शिक्षक तुटला, तर संपूर्ण समाजाचे भविष्य तुटते.
एक पीडित शिक्षिका





