ही अवलंबितता परवडेल काय ?

सरकारी पगार, सामाजिक योजनांचा भार या महसूलावर अवलंबून असल्याने आता हे स्वीकारूनच आपल्याला पुढे जावे लागेल. हा प्रवास आपल्याला नेमका कुठे नेऊन सोडणार हे कुणीच सांगू शकणार नाही.

ग्रामसभेचा आणि स्थानिकांचा विरोध डावलून धारगळ पंचायत मंडळातील सत्ताधारी ५ पंचसदस्यांनी सनबर्न महोत्सवाला तत्वतः ना हरकत देण्याचा घेतलेला ठराव राज्यावर दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे. पंचायतराज कायदा आणि घटनेच्या ७३ व्या दुरूस्तीत स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेल्या स्वायत्ततेचा अशा तऱ्हेने वापर होऊ लागला तर ग्रामस्वराज्य संस्थेलाच वाळवी लागेल, हे वेगळेपणाने सांगण्याची गरज नाही. ग्रामसभा ही सर्वोच्च असूनही ग्रामसभेचा ठराव अव्हेरून नेमका त्याविरोधात ठराव समंत करून घेण्याचे धाडस पंचसदस्यांत तयार होतेच कसे, हा मुलभूत प्रश्न आहे. हल्लीच सरपंचपदाच्या खुर्चीवर बसलेले सतीश धुमाळ यांच्या चेहऱ्यावरील तणाव स्पष्टपणे दिसत होता. हे सगळे वरती ठरलेले आहे. आम्ही फक्त बळीचे बकरे असेही ते नकळतपणे ते म्हणून गेले. अर्थातच वरून म्हणजे थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडून हा ठराव समंत करून घेण्याचा दबाव होता म्हटल्यावर ते बिचारे काय करू शकतील. पंचसदस्यांनी धाडस दाखवायला हवे वगैरे त्यांना उपदेशाचे डोस देणे सोपे असते परंतु सरकारकडून त्यांची विकासकामांत आणि इतर गोष्टींत होणारी अडवणूक त्यांना माहित असते आणि त्यामुळे आपल्या लोकांची साधी साधी कामेही ते करू शकत नाहीत. सरकारची आणि त्यात खुद्द मुख्यमंत्र्यांचीच मर्जी असेल तर मग अशा पंचसदस्यांना हत्तीचे बळ चढणे स्वाभाविक आहे. सनबर्न ही आपल्या पर्यटनाची गरज आहे. अर्थात योग्य धोरण, नियोजन आणि पारदर्शकता असेल तर त्याला विरोध होण्याची कारणही नाही. परंतु आत्तापर्यंत १७ सनबर्न महोत्सव झाले तरीही शेवटपर्यंत परवाने आणि मान्यतेबाबतची अनिश्तितता कायम ठेवण्यातच अनेकांचे खीसे भरतात हे काही आता लपून राहीलेले नाही. सनबर्नमधून मिळणाऱ्या वैयक्तीक फायद्यासाठी आपल्याकडे कुठल्याही थराला राजकारणी जाऊ शकतात हे आपण पाहीलेले आहेच. राज्याची अर्थव्यवस्थाच सध्या आपल्याला अघोरतेकडे वाहून नेत आहे. राजकारणाची नैतिकताच ढासळत चालली आहे. राज्यापेक्षा वैयक्तीक स्वार्थ आणि हीताला अधिक महत्व प्राप्त झाल्याने राज्याची वाटचाल संकटाच्या दिशेने कुच करू लागली आहे. खाण उद्योगाने इथल्या पर्यावरणाची प्रचंड हानी केली खरी परंतु त्यातून राज्याच्या तिजोरीला मदत झाली. खाण उद्योगाच्या नावाने अनेकजण गब्बर झाले. हा उद्योग बंद पडल्यानंतर आता तीच स्थिती पर्यटनात निर्माण झाली आहे. पर्यटनात पर्यावरणावर घाला तर पडतो आहेच परंतु इथली सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतीक वातावरणही दूषीत होत चालले आहे. बेशिस्त आणि भांडवलशाही पर्यटनामुळे गैरप्रकारांना पाठबळ मिळत आहे आणि सरकारवर दबाव टाकणारी एक समांतर व्यवस्था निर्माण झाली आहे. आपली अर्थव्यवस्थाच अबकारी, कॅसिनोंवर अवलंबित बनली आहे. मद्य, पार्टी आणि जुगार संस्कृती पर्यटनाचा आत्मा बनला आहे. हे रोखणे आता शक्य नाही. सरकारी पगार, सामाजिक योजनांचा भार या महसूलावर अवलंबून असल्याने आता हे स्वीकारूनच आपल्याला पुढे जावे लागेल. हा प्रवास आपल्याला नेमका कुठे नेऊन सोडणार हे कुणीच सांगू शकणार नाही.

  • Related Posts

    ऑर्डर.. ऑर्डर…

    केवळ भावना किंवा आपल्याला काय वाटते याला अर्थ नाही तर ते सिद्ध करण्याची किंवा त्याबाबतचे पुरावे हाती असण्याची गरज आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सनबर्न महोत्सवाला सशर्त मान्यता दिली…

    तुची डोळे उघड न्यायदेवते…

    हायकोर्टाने शर्ती आणि अटींची बंधने जी सरकार आणि आयोजकांना घातली आहेत त्यांचे खरोखरच पालन होते काय हे न्यायदेवता आता डोळ्यांवरील पट्टी हटविल्यामुळे पाहु शकेल, एवढीच काय ती अपेक्षा सर्वसामान्य नागरिक…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    21/12/2024 e-paper

    21/12/2024 e-paper

    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    ऑर्डर.. ऑर्डर…

    ऑर्डर.. ऑर्डर…

    तुची डोळे उघड न्यायदेवते…

    तुची डोळे उघड न्यायदेवते…

    20/12/2024 e-paper

    20/12/2024 e-paper

    राजेश नाईक यांचा ‘गॉडफादर’ कोण ?

    राजेश नाईक यांचा ‘गॉडफादर’ कोण ?
    error: Content is protected !!