बाऊन्सर्सच्या मदतीने घरात घुसखोरी

राजकीय दबावापुढे म्हापसा पोलिस हतबल ?

गांवकारी, दि. २६ (प्रतिनिधी)

धुळेर-म्हापसा येथील एका घरात व मालमत्तेत कथितरीत्या बेकायदा प्रवेश करून बाऊन्सर्सच्या मदतीने कुटुंबीयांना घराबाहेर काढणे, मारहाण करणे, मौल्यवान वस्तू ताब्यात घेणे तसेच जीवे मारण्याची धमकी देणे, असे गंभीर आरोप हळर्णकर कुटुंबीयांनी केले आहेत. या प्रकरणी तक्रार दाखल करूनही महिनाभर उलटला तरी म्हापसा पोलिसांनी एफआयआर नोंदविलेला नसल्याचा आरोपही तक्रारदारांनी केला आहे.
धुळेर येथील सदर घर व जमिनीवरील हक्काचा दावा करणारे दिनेश दिगंबर हळर्णकर, दीपरत्ना हळर्णकर आणि पिंकी हळर्णकर यांनी १८ जुलै २०२६ रोजी म्हापसा पोलिस निरीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत महानंद गजानन अस्नोडकर, सोनिया महानंद अस्नोडकर, शेल्डन फर्नांडिस, राज चिंचवाडकर यांच्यासह सुमारे २० जणांवर विविध गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
मालमत्ता हक्कावरून वाद
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, धुळेर येथील घर क्रमांक २/१३४/१ आणि पी.टी. शीट क्रमांक ७३ मधील चलता क्रमांक ३४ ही मालमत्ता गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ त्यांच्या ताब्यात व वापरात आहे. महानंद अस्नोडकर यांनी याच जमिनीचा दुसरा भाग भाटकाराकडून खरेदी केला असून, आपल्या मालमत्तेपुरते मर्यादित न राहता घर व जमिनीत हस्तक्षेप करून आपल्याला तेथून हटविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप हळर्णकर कुटुंबीयांनी केला आहे.
बाऊन्सर्सच्या मदतीने जबरदस्तीचा आरोप
महानंद अस्नोडकर आणि त्यांच्या पत्नीने बाऊन्सर्स व कामगारांच्या मदतीने घरात प्रवेश केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घराचा प्रवेशमार्ग जांभ्या दगडाचे बांधकाम व सिमेंटच्या साहाय्याने कायमस्वरूपी बंद केल्याचेही तक्रारदारांचे म्हणणे आहे. या झटापटीत दीपरत्ना हळर्णकर आणि पिंकी हळर्णकर यांना दुखापत झाल्याचा दावा करण्यात आला असून, दीपरत्ना हळर्णकर या ज्येष्ठ नागरिक असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
व्यवसायावरही परिणाम
या जागेतून आपला व्यवसाय सुरू असल्याचे सांगत, जबरदस्तीने ताबा घेतल्यामुळे उपजीविकेच्या साधनावरही परिणाम झाल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. घरातील सोन्याचे दागिने, विविध साधने, यंत्रसामग्री, उपकरणे आणि फर्निचरसह मौल्यवान वस्तू कथितरीत्या नेण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. हा प्रकार चोरी व घरफोडीच्या स्वरूपाचा असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
तसेच पोलिस किंवा अन्य सरकारी यंत्रणांकडे तक्रार केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी देण्यात आल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
महिनाभरानंतरही एफआयआर नाही
घटनेला महिन्याहून अधिक काळ उलटला तरी पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. महानंद अस्नोडकर हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकारिणी सदस्य असल्याने त्यांच्या राजकीय वजनामुळेच पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
पोलिसांनी तक्रारीवर गुन्हा नोंदवून न घेणे हे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचेही तक्रारदारांनी म्हटले आहे.
घटनेचा व्हिडिओ पोलिसांकडे
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तक्रारदारांनी पोलिसांकडे सादर केला आहे. या व्हिडिओमुळे प्रकरणाला वाचा फुटल्याचा दावा करण्यात आला असून, त्यावरून पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हे प्रकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यापर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येत असून, आता या प्रकरणी सरकार आणि पोलिस प्रशासन काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

  • Related Posts

    फोंड्यात धमक्या, कमिशनबाजीला ऊत

    मगोचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकरांचा हल्लाबोलगांवकारी, दि. २५ (प्रतिनिधी) आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने मतदारसंघनिहाय सर्वेक्षणाच्या माध्यमातून जनमताची चाचपणी सुरू केली…

    Complaint Accuses Goa Minister Vishwajit Rane, Deviya Rane of Fraud in Karapur Land Mutation

    A serious complaint alleging fraudulent mutation and illegal transfer of ancestral properties at Karapur has been lodged against Goa Minister Vishwajit Rane and Deviya Vishwajit Rane by Vishwasrao L. Rane, who claims to be a co-owner of the properties.

    You Missed

    26/08/2026 e-paper

    26/08/2026 e-paper

    बाऊन्सर्सच्या मदतीने घरात घुसखोरी

    बाऊन्सर्सच्या मदतीने घरात घुसखोरी

    आरोप गंभीर; सत्य काय ?

    आरोप गंभीर; सत्य काय ?

    25/08/2026 e-paper

    25/08/2026 e-paper

    फोंड्यात धमक्या, कमिशनबाजीला ऊत

    फोंड्यात धमक्या, कमिशनबाजीला ऊत

    मगोची साथ, भाजपची डोकेदुखी ?

    मगोची साथ, भाजपची डोकेदुखी ?