पणजी : राज्यात अमली पदार्थांचे गुन्हे, खून, लैंगिक अत्याचार, चाकूहल्ले, हिंसक मारामाऱ्या आणि खुलेआम गोळीबाराच्या घटना वाढत असताना गोव्यातील कायदा व सुव्यवस्था गंभीररीत्या ढासळत असल्याचा आरोप गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. प्रतीक्षा नारुलकर खलप यांनी केला आहे. मुख्यमंत्री स्वतः गृहखाते सांभाळत असूनही नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी देण्यात ते अपयशी ठरल्याचा आरोप करत, परिस्थितीची जबाबदारी स्वीकारण्याची मागणी त्यांनी केली.
“गोवा हळूहळू गुंडाराजच्या दिशेने जात आहे. महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांना स्वतःच्या घरात, परिसरात आणि रस्त्यावर सुरक्षित वाटले पाहिजे. मात्र ही सुरक्षिततेची भावना दिवसेंदिवस कमी होत आहे,” असे खलप यांनी म्हटले.
राज्यात घडणाऱ्या प्रत्येक गंभीर गुन्ह्यानंतर सरकारकडून ‘कठोर कारवाई केली जाईल’ असे आश्वासन दिले जाते; मात्र गुन्हा घडल्यानंतरची कारवाई पुरेशी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुन्हे होऊच नयेत यासाठी प्रतिबंधात्मक यंत्रणा प्रभावी करणे, पोलिस दल अधिक सक्षम करणे आणि गुन्हेगारी टोळ्यांचे जाळे उद्ध्वस्त करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
“प्रत्येक गुन्ह्यानंतर दिल्या जाणाऱ्या आश्वासनांना आता गोमंतकीय कंटाळले आहेत. सरकारने गुन्हे रोखण्यासाठी नेमकी कोणती ठोस पावले उचलली आहेत, याची उत्तरे जनतेला हवी आहेत. मुख्यमंत्रीच गृहमंत्री असल्याने कायदा-सुव्यवस्थेच्या या ऱ्हासाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे,” असे खलप म्हणाल्या.
कोलवाळ कारागृहातील कथित ड्रग्ज रॅकेटवर सवाल
कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून कथितपणे अमली पदार्थांचे रॅकेट चालविले जात असल्याच्या आरोपांवरही खलप यांनी सरकारला लक्ष्य केले.
“उच्च सुरक्षा असलेल्या कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातही अमली पदार्थ पोहोचत असतील, तर संपूर्ण राज्यातील ड्रग्जच्या व्यवहारावर सरकारचे नेमके किती नियंत्रण आहे, हा गंभीर प्रश्न आहे. जनतेला पुन्हा एकदा ‘कठोर कारवाई’चे आश्वासन नको, तर सत्य आणि स्पष्ट उत्तरे हवी आहेत,” असे त्यांनी म्हटले.
राज्यात घडणाऱ्या प्रत्येक गुन्ह्याकडे स्वतंत्र घटना म्हणून पाहून सरकार जबाबदारी झटकू शकत नसल्याचेही खलप यांनी सांगितले. सातत्याने समोर येणाऱ्या गंभीर घटनांमुळे पोलिस प्रशासन, गुप्तचर यंत्रणा, गुन्हे प्रतिबंधक व्यवस्था आणि जबाबदारी निश्चित करण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.
गोवा शांतताप्रिय समाज आणि सुरक्षित वातावरणासाठी ओळखला जातो. हिंसाचार, ड्रग्ज आणि संघटित गुन्हेगारी हे गोव्याच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनू देता कामा नये, असे खलप यांनी म्हटले.
“महिलांना स्वतःच्या सुरक्षेची भीती, पालकांना मुलांच्या सुरक्षिततेची चिंता आणि ज्येष्ठ नागरिकांना स्वतःच्या परिसरात असुरक्षितता वाटत असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. गोमंतकीयांना भीतीमुक्त जीवन जगण्याचा अधिकार आहे,” असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना खलप म्हणाल्या, “सरकार प्रत्येक घटना घडल्यानंतर केवळ प्रतिक्रिया देत राहू शकत नाही. मुख्यमंत्री गोमंतकीयांच्या सुरक्षिततेची हमी देऊ शकत नसतील, तर त्यांनी त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदावरून पायउतार व्हावे.”
गोव्याला गुन्हा घडल्यानंतर केवळ कारवाईची घोषणा करणारे नव्हे, तर गुन्हे घडण्याआधीच त्यांना रोखण्यासाठी सक्षम, सक्रिय आणि जबाबदार सरकार हवे आहे, असेही डॉ. खलप यांनी स्पष्ट केले.





