पणजी, दि. १२ : गोव्याची जमीन, पर्यावरण, अस्मिता, संस्कृती आणि भावी पिढ्यांचे भविष्य वाचविण्याचा नारा देत गोवा प्रदेश काँग्रेसने २२ सप्टेंबरपासून २७ दिवसीय ‘गोय राखण यात्रा’ काढण्याची घोषणा केली आहे. १८ ऑक्टोबरपर्यंत चालणारी ही यात्रा राज्यातील सर्व ४० विधानसभा मतदारसंघांतून जाणार असून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्याकडे यात्रेच्या संयोजकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, २०२७ मध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास टीसीपी कायद्यातील वादग्रस्त कलम 39A रद्द करण्याचा निर्णय हा नव्या मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय असेल, अशी घोषणा युरी आलेमाव यांनी केली.
दोनापावला येथील गोवा इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, कार्याध्यक्ष अल्टोन डी’कोस्टा, कार्लोस आल्वारेस फेरेरा, एम. के. शेख आणि सुनील कवठणकर तसेच मीडिया व कम्युनिकेशन विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर उपस्थित होते.
जमीन बळकावणे, डोंगर कापण्याविरोधात लढा
“ही लढाई कोणत्याही समाजाविरोधात नाही. ही गोव्याच्या जनतेची गोव्यासाठीची लढाई आहे,” असे स्पष्ट करत आलेमाव यांनी जमीन बळकावणे, डोंगर कापणे, भ्रष्टाचार, फसवणूक, बेरोजगारी आणि सरकारी नोकऱ्यांच्या कथित विक्रीविरोधात काँग्रेस आवाज उठवणार असल्याचे सांगितले.
“गोवा काही मोजक्या स्वार्थी शक्तींच्या ताब्यात जाऊ देणार नाही. गोव्याच्या जनतेच्या आशीर्वादाने २०२७ मध्ये काँग्रेस सत्तेवर आली तर मंत्रिमंडळाची पहिली स्वाक्षरी 39A रद्द करण्यासाठी असेल. गोव्याचे आणि गोमंतकीयांचे हित हेच आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य राहील,” असे आलेमाव म्हणाले.
शाश्वत पर्यटनावर भर
काँग्रेस सत्तेत आल्यास पर्यटनासाठी शाश्वत आणि संतुलित धोरण राबविले जाईल, असेही आलेमाव यांनी स्पष्ट केले. ब्रिटन आणि युरोपसह गोव्याच्या पारंपरिक आंतरराष्ट्रीय पर्यटन बाजारपेठेतून दर्जेदार पर्यटकांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. मात्र पर्यटनाच्या नावाखाली गोव्याचे पर्यावरण, संस्कृती आणि सामाजिक रचनेशी तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
ओपिनियन पोल, गोव्याला राज्याचा दर्जा आणि कोकणीला अधिकृत भाषेचा दर्जा मिळविण्याच्या प्रक्रियेतील काँग्रेसच्या योगदानाचाही त्यांनी उल्लेख केला.
‘जनता बोलेल, काँग्रेस ऐकेल’
प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी ही यात्रा केवळ राजकीय प्रचारापुरती मर्यादित नसून व्यापक जनसंवादाची मोहीम असल्याचे सांगितले. २७ दिवसांत सर्व ४० मतदारसंघांतील जास्तीत जास्त गावे, शहरे आणि वस्त्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
“आम्ही केवळ जनतेशी बोलणार नाही, तर त्यांचे म्हणणे ऐकणार आहोत. लोकांच्या समस्या, अपेक्षा आणि गोव्याच्या भविष्याबाबत त्यांची भूमिका समजून घेऊन काँग्रेसची पुढील राजकीय दिशा निश्चित केली जाईल. जनतेच्या इच्छेविरुद्ध काँग्रेस कोणताही निर्णय घेणार नाही,” असे चोडणकर म्हणाले.
सामाजिक सलोखा, एकता, पर्यावरणीय समतोल आणि गोव्याची संस्कृती जपण्यासाठी जनतेसोबत काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
‘गोंय विकपाक दिवचें ना, बीजेपीक जिकपाक दिंवचे ना’
“गोंय विकपाक दिवचें ना, बीजेपीक जिकपाक दिंवचे ना” हा यात्रेचा प्रमुख संदेश असणार आहे. यात्रेदरम्यान गोव्याच्या पारंपरिक ‘मांड’ संकल्पनेचा वापर जनसंवादासाठी करण्यात येणार आहे. या मांडांवर नागरिकांना आपले प्रश्न, सूचना आणि गोव्याच्या भविष्याबाबतची मते मांडण्याची संधी दिली जाणार आहे.
“मांड हे जनतेचे व्यासपीठ असेल. जनता बोलेल, चर्चा करेल आणि गोव्याचे भविष्यही जनता ठरवेल,” असे चोडणकर यांनी सांगितले.
राष्ट्रीय नेत्यांचाही सहभाग
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, प्रियंका गांधी वाड्रा, काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री तसेच सचिन पायलट यांच्यासह विविध राष्ट्रीय नेते यात्रेच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सहभागी होणार असल्याचे काँग्रेसने सांगितले.
२ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त साखळी मतदारसंघात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेत ‘गोय राखण यात्रा’च्या टी-शर्टचे तसेच प्रचारात्मक व्हिडिओचे अनावरण करण्यात आले. गोव्याची जमीन, पर्यावरण, वारसा, संस्कृती, रोजगार आणि भावी पिढ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व समाजघटकांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसने केले.





