सहजिकच तो अनेकांसाठी अडचणही ठरू शकतो. तो पळाला की त्याला पळायची संधी दिली याचाही शोध घ्यावा लागणार आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कधी मिळतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.
खून, खूनी हल्ला, बनावटगिरी तसेच बनावट आणि बोगस कागदपत्रांच्या आधारे जमीनींचे व्यवहार करून कोट्यवधी रूपयांची माया जमवलेला सराईत गुन्हेगार सुलेमान उर्फ सिद्धीकी खान पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला. गुन्हा शाखेच्या कोठडीत असलेल्या सुलेमानने तेथीलच एका आयआरबीच्या शिपायाला पाशात अडकवले. त्या शिपायानेच त्याला कोठडीतुन बाहेर काढुन आपल्याच दुचाकीवरून पळायला सहाय्य केले. एवढेच नव्हे तर तो शिपाई देखील बेपत्ता आहे. हा सगळाच प्रकार अनाकलनीय असाच आहे. गेल्या चार वर्षांपासून देशात १५ गुन्हे दाखल झालेला हा गुन्हेगार फरार होता, यावरून पोलिसांना त्याचे कसब ओळखता यायला हवे होते. अथक प्रयत्न करून पोलिसांनी त्याला हुबळीतून ताब्यात घेतले खरे परंतु सुलेमानने मात्र गोवा पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगून त्यांच्या हातात तुरी देऊन पळ काढला ही गोवा पोलिसांसाठी नक्कीच अशोभनीय अशीच गोष्ट म्हणावी लागेल. सुलेमान खान पळाला पण त्याला गोवा पोलिसांच्याच एका शिपायाने सहाय्य केले ही गोष्ट अधिक गंभीर आहे. अलिकडच्या काळात पोलिस आणि गुन्हेगारांचे साटेलोटे सिद्ध करणारे अनेक प्रकार घडले आहेत. काही ठिकाणी तर पोलिसांनीच अशा गुन्हेगारांना हाताशी धरून वेगवेगळ्या माध्यमांतून लोकांना धमकावून आणि ब्लॅकमेल करून माया जमविण्याचा धंदाच सुरू केल्याचीही प्रकरणे समोर आली आहेत. शिक्षकी पेशा प्रमाणेच पोलिस खाते हे देखील एक आदर्श खाते आहे परंतु अलिकडे पोलिसांत भरती झाल्यानंतर एका वर्षांत जो बंगला किंवा फ्लॅट विकत घेत नाही तो मुर्ख म्हणून गणला जातो ही परिस्थिती आहे. सगळीकडेच गोंयकार पैशांसाठी काहीही थराला जायला लागला आहे, हे कशाचे द्योतक आहे हेच समजेनासे झाले आहे. जमिन व्यवहारांतही हीच परिस्थिती. ह्याच जमीन व्यवहारांतून गवंडी म्हणून काम करणारा सुलेमान आघाडीचा जमीन डीलर बनला आणि अलिशान गाड्यांतून फिरू लागला होता. विशेष म्हणजे सुलेमान खानच्या या व्यवहारात अनेक बडी मंडळी सामील असण्याची शक्यता आहे. त्याचे व्यवहार बघणारी एक मोठी टीमच कार्यरत होती. या टीममध्ये बडे बडे वकिल, नोटरी, अधिकाऱ्यांचाही समावेश होता. राजकारण्यांकडेही त्याचे निकटचे संबंध होते. म्हापशात खुद्द माजी उपमुख्यमंत्री स्व. फ्रान्सिस डिसोझा यांनी त्याला एक जमीन विकत दिल्याचा दस्तएवज पुढे आला आहे. १९९६ सालचा हा दस्तएवज बनावट असल्याचे पोलिस सांगतात पण या जमिनीवर घरे उभारण्यात आली तरीही त्याची कल्पना मुळ जमीनमालकांना कशी काय आली नाही, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. सुलेमान याचे कुटुंबिय कर्नाटकातील शिमोगा इथले असले तरी त्याची जन्म आणि कर्मभूमी म्हापसाच होती आणि म्हापसाचे अनेक लोक त्याच्याशी संबंधीत आहेत.
सुलेमान पळून जाण्याचा हा कट केवळ तो आणि पोलिस शिपायांपुरतीच मर्यादित आहे की ह्यात अन्य कुणी सहभागी आहेत, याचा शोध घ्यावा लागेल. सुलेमानकडे अनेकांच्या कुंडल्या आहेत कारण त्यांच्या मदतीनेच तर तो इथपर्यंत पोहचला होता. सहजिकच तो अनेकांसाठी अडचणही ठरू शकतो. तो पळाला की त्याला पळायची संधी दिली याचाही शोध घ्यावा लागणार आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कधी मिळतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.