प्रभव नायक यांचा सरकारला सवाल
……………………………………………………………………………………………..
गांवकारी,दि.३ (प्रतिनिधी) : कोंबा येथील दीर्घकाळ प्रलंबित सांडपाण्याच्या समस्येची पाहणी करण्यासाठी नियोजित केलेली संयुक्त स्थळ पाहणी अचानक रद्द करण्यात आल्याबद्दल युवा नेते प्रभव नायक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नांना राजकीय अथवा प्रशासकीय कारणांमुळे बाजूला सारता येणार नाही. सार्वजनिक आरोग्य आणि मूलभूत सुविधांच्या बाबतीत कोणतेही राजकारण करणे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.
नागरी आरोग्य केंद्र, मडगाव यांच्याकडून ३० ऑक्टोबर २०२६ रोजी स्थळ पाहणीची नोटीस जारी करण्यात आली. ही नोटीस आपल्याला २ नोव्हेंबर २०२६ रोजी ईमेलद्वारे प्राप्त झाली. धक्कादायक बाब म्हणजे, अवघ्या काही तासांतच दुसरा ईमेल पाठवून ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कोंबा येथे होणारी पाहणी रद्द करण्यात आल्याचे कळविण्यात आले. पाहणी अचानक रद्द करण्यामागचे कारण काय आणि कोंबा येथील गंभीर सांडपाणी समस्येचे गांभीर्य लक्षात घेता पर्यायी तारीख अद्याप का जाहीर करण्यात आलेली नाही, असा सवाल प्रभव नायक यांनी उपस्थित केला.
हा प्रकार राजकीय डावपेच आहे आणि प्रकारांना मडगांवचो आवाज घाबरणार नाही. कोंबा येथील रहिवाशांचे प्रश्न, विहिरींचे स्वच्छ पाणी आणि सांडपाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे, हाच या पाठपुराव्यामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.






