गांवकारी,दि. ३ (प्रतिनिधी)
वास्को येथील न्यू मॉडर्न नगरपालिका बाजारपेठेला लागलेल्या भीषण आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना राज्य सरकारकडून आर्थिक मदतीचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुरगाव नगरपालिकेत आयोजित कार्यक्रमात बाधित व्यापाऱ्यांना प्रत्येकी एक लाख रूपयांची मदत केली.
आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना अतिरिक्त आर्थिक मदत देण्यात येणार असून, एकाही नुकसानग्रस्त व्यापाऱ्याला मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
आगीत दुकाने गमावलेल्या व्यापाऱ्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत महिनाभरात तात्पुरत्या दुकानांची उभारणी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांचे व्यवसाय पूर्ववत सुरू होईपर्यंत सरकार त्यांच्या पाठीशी राहील. तसेच बाजारपेठेला पुन्हा भेट देऊन पुनर्वसनाच्या कामाचा आढावा घेणार असल्याचेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, २८ ऑक्टोबरच्या रात्री लागलेल्या भीषण आगीत वास्को बाजारपेठेतील सुमारे १४० ते १५० दुकाने भस्मसात झाली होती. या दुर्घटनेत व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.





