
मगो पक्षाने भाजपला दिलेला पाठींबा जर खरोखरच सार्थ ठरवायचा असेल तर कुळ-मुंडकाराच्या विषयाला कायमची मुठमाती देऊन बहुजन समाजाला न्याय मिळवून द्यावा. हीच खऱ्या अर्थाने भाऊसाहेब आणि शशिकलाताईंना श्रद्धांजली ठरेल.
मांद्रे मतदारसंघाचे युवा आमदार जीत आरोलकर यांनी मुंडकारांच्या हक्कांखातर सुरू केलेल्या लढ्याचे स्वागतच व्हायला हवे. जीत आरोलकर हे बहुजन समाजाचे घटक आहेत. कुळ-मुंडकारांना न्याय्य हक्क देण्याचा संकल्प केलेल्या मगो पक्षाचे ते प्रतिनिधित्व करतात. त्यांच्याकडूनच वेळोवेळी या विषयाला तोंड फोडण्याचा प्रयत्न होतो, परंतु दुर्दैवाने मगो पक्षाकडून त्याची विशेष दखल घेतली जात नाही. मगो पक्षाने आपली पक्षाची ताकद जर या प्रयत्नांमागे लावली तर या विषयाला अजून बळकटी प्राप्त होणे शक्य आहे. पहिल्यांदाच विधानसभेत पोहचलेले युवा नेता कुळ-मुंडकारांच्या प्रश्नावर बोलताना पाहून बरे वाटते. मुंडकारांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे माजी मुख्यमंत्री रवी नाईक हे देखील विधानसभेत आहेत. त्यांनी खरेतर या बहुजन समाजाच्या युवा नेत्याला प्रोत्साहन देऊन मुंडकारांचा विषय एका फटक्यात निकालात काढण्यासाठी सरकारवर दबाव टाकण्याची गरज आहे. रवी नाईक हे मुंडकारांचे कैवारी होते. ते आज पात्रांव बनले. जीत आरोलकर हे बहुजन समाजाचे घटक असले तरीही रिअल इस्टेट व्यवसायात आल्यामुळेच ते विधानसभेत पोहचू शकले. एक उत्कृष्ट व्हॉलीबॉलपटू म्हणून उदयास आल्यानंतर क्रीडा खात्याच्या कोट्यातून ते पोलिस शिपाई म्हणून खात्यात रूजू झाले. यानंतर त्यांना रिअल इस्टेट व्यवसायाचा मंत्र गवसला आणि त्यांनी मागे वळून पाहिले नाही. विशेष म्हणजे जीत आरोलकर यांच्या बॅचचे आणखी दोन-तीन पोलिस शिपाई रिअल इस्टेट व्यवसायात चमकले. म्हापशाचे नगरसेवक तथा उद्योजक तारक आरोलकर आणि धारगळचे माजी जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. अर्थात बहुजन समाजातील या युवकांच्या यशाचे गमक म्हणजे रिअल इस्टेट व्यवसाय आणि या व्यवसायामुळेच ते आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनू शकले आणि इतरांशी स्पर्धा करू शकले. मांद्रे मतदारसंघातील मोरजी पंचायत क्षेत्रातील सिंथिया मोनिका फर्नांडिस या निराधार युवतीचे प्रकरण सरकारच्या डोळ्यांत अंजन घालणारेच ठरले आहे. राज्यातील भाजप सरकार लोकांना आभासी जगात रमण्यास भाग पाडत आहे. मातीच्या घरात ही निराधार युवती वास्तव करते. हे घर मुंडकार म्हणून नोंद आहे. तिला शौचालयाचीही सोय नाही. शंभर टक्के उघड्यावर शौचमुक्त राज्य म्हणून मिरवणाऱ्या सरकारचा हा खोटा दावा आमदार जीत आरोलकर यांनी फोल ठरवला हे बरे झाले. त्या युवतीचे पालक आणि भाऊ एका रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडले आणि ही युवती निराधार बनली. तिची परिस्थिती पाहून अंत्योदय, सर्वोदय आदी शब्दांचीच कीव यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या घरांच्या मालकीचे प्रॉपर्टी कार्ड देणारी स्वामित्व योजना सुरू केली. ही योजना राज्यात अपयशी ठरली. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत या योजनेबाबत केलेले वक्तव्य आणि योजनेच्या जाहिरातीतील दावे हे परस्परविरोधी आहेत. मुंडकारांना न्याय मिळवून देण्याचा विडा जीत आरोलकर यांनी उचललेला आहे. या लढ्याला सरकारातील अन्य बहुजन नेत्यांनी पाठींबा द्यावा. मगो पक्षाने भाजपला दिलेला पाठींबा जर खरोखरच सार्थ ठरवायचा असेल तर कुळ-मुंडकाराच्या विषयाला कायमची मुठमाती देऊन बहुजन समाजाला न्याय मिळवून द्यावा. हीच खऱ्या अर्थाने भाऊसाहेब आणि शशिकलाताईंना श्रद्धांजली ठरेल.