
सरकार आणि आरोग्यमंत्री या अचानक उदभवलेल्या महाभयंकर प्रकरणावर काय उपाय काढतात आणि हे प्रकरण संपवतात हे जाणून घेण्याची तीव्रता देशभरातील वैद्यकीय क्षेत्रात लागून राहणार आहे हे मात्र नक्की.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी लोकांची मने जिंकण्याच्या नादात गोवा मेडिकल कॉलेज इस्पितळाच्या कॅज्युअल्टी विभागात केलेला आतताईपणा त्यांच्यावरच बुमरॅंग झाला. विशेष म्हणजे त्यांच्या खाजगी प्रसिद्धी विभागाकडून मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याच्या अपमानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जारी करण्यात आला. सर्वसामान्यांबाबत आरोग्यमंत्री किती संवेदनशील आहेत असे भासवण्याच्या प्रयत्नात त्यांचा उध्दटपणाच अधिक प्रसारित झाला आणि हळूहळू हा विषय राष्ट्रीय बनला. एका मंत्र्याकडून सरकारी सेवेतील वरिष्ठ डॉक्टरला मिळणारी अशी वागणूक कोणालाही मान्य होऊ शकत नाही. डॉक्टर किंवा वैद्यकीय सेवकांकडून होत असलेला हलगर्जीपणा किंवा दुर्लक्षितपणा हा चर्चेचा विषय आहेच; परंतु म्हणून आरोग्यमंत्र्यांची ही वागणूक स्वीकारण्याचा मूर्खपणा कोणीच करणार नाही. विशेषतः, इंग्रजी भाषेत ज्या मस्तवाल शब्दांत आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टरला संबोधले, त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळणे स्वाभाविक आहे. बेशिस्तीला कठोरपणाने आळा घालण्याची गरज आहे, परंतु त्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया ठरवलेली आहे. ही घटना एखाद्या रुग्णाच्या जीवावर बेतली आणि त्यातून हा प्रसंग निर्माण झाला असेही नाही. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी विनाकारण संयम गमावला, हेच या घटनेतून स्पष्ट होते. या घटनेचा वणवा देशभर पोहोचला आणि पंतप्रधान कार्यालयापर्यंत हे प्रकरण गेल्याचे लक्षात येताच, आरोग्यमंत्र्यांनी तातडीने एका वृत्तवाहिनीवर रात्री उशिरा मुलाखतीचे आयोजन केले. या मुलाखतीत त्यांनी डॉ. रूद्रेश कुट्टीकर आणि त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागितली. ही माफी दिल्यानंतर प्रकरण निवळेल असे वाटत होते, पण सोमवारी सकाळीच विविध डॉक्टर संघटनांनी आंदोलन छेडले आणि डीन यांची भेट घेऊन तातडीने जाहीर माफीची मागणी केली. त्याशिवाय, त्यांनी व्हीआयपी संस्कृती बंद करणे, इस्पितळातील व्हिडिओ किंवा फोटोग्राफीवर निर्बंध घालणे आणि रूग्णांच्या शिफारसींबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची मागणी केली. या मागण्या आरोग्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन डीन यांनी दिले असले तरी डॉक्टरांनी आपले आंदोलन सुरू ठेवल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आपल्या एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डॉ. रूद्रेश कुट्टीकर आणि त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागितली. परंतु काही आंदोलक डॉक्टरांचे समाधान झाले नाही. अपमानग्रस्त डॉ. रूद्रेश कुट्टीकर यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन आरोग्यमंत्र्यांनी कॅज्युअल्टीत येऊन कॅमेरासमोरच माफी मागावी, अशी मागणी केल्यामुळे परिस्थिती अधिक स्फोटक बनली आहे.
आता आरोग्यमंत्री किंवा सरकार हा पेच कसा सोडवते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अचानक डॉक्टरांनी एकजूट दाखवून आरोग्यमंत्री आणि सरकारला अडचणीत आणण्याचा हा यशस्वी प्रयोग केला. डॉक्टरांची ही एकजूट केवळ अधिकारांसाठीच नव्हे, तर डॉक्टरी पेशाचा आत्मसन्मान आणि सामाजिक जबाबदारी टिकवण्यासाठीही आवश्यक आहे.
या आदर्श पेशातील काही लोक, ज्यांनी आपल्या बेशिस्त वागणुकीमुळे या क्षेत्राला काळवंडले आहे, त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी डॉक्टरांच्या संघटनांनी एकत्र येण्याची गरज आहे. सरकारी इस्पितळांतील अपुऱ्या सुविधा किंवा अडचणी यावर उपाय शोधण्याऐवजी रुग्णांवर राग काढणे आणि रूग्णांची परवड करणे असे होऊ शकत नाही. कॅज्युअल्टीत अपमानित झालेल्या डॉ. रूद्रेश कुट्टीकर यांची मागणी खरोखरच पूर्ण होईल का? तसे घडल्यास हा राजकारण्यांसाठी मोठा धडा ठरेल. आता सरकार आणि आरोग्यमंत्री या अचानक उदभवलेल्या महाभयंकर प्रकरणावर काय उपाय काढतात आणि हे प्रकरण संपवतात हे जाणून घेण्याची तीव्रता देशभरातील वैद्यकीय क्षेत्रात लागून राहणार आहे हे मात्र नक्की.