आझाद मैदानावर कामगारांचा एल्गार

कामगारविरोधी धोरणांचा जाहीर निषेध



गांवकारी, दि. १२ (प्रतिनिधी)

केंद्रातील भाजप सरकारने अवलंबिलेल्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ भारत बंद आंदोलनाला आज गोव्यातही मोठा प्रतिसाद मिळाला. शेकडो कामगारांनी पणजी येथील आझाद मैदानावर उपस्थिती लावून विविध मागण्यांसाठी एल्गार केला. सर्वसामान्यांचे जगणे असहाय्य करून सरकार केवळ बड्या उद्योजकांचे हित जपत असल्याचा आरोप कामगार नेत्यांनी केला. “कामगारांना उपाशी ठेवणारे सरकार हे कृतघ्न आहे,” अशी तीव्र टीका यावेळी करण्यात आली.
अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विविध कामगार संघटनांतर्फे हा भारत बंद आयोजित करण्यात आला. देशभरातील दहा प्रमुख कामगार संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून गोव्यातील सर्व कामगार संघटना सहभागी झाल्या. विशेषत्वाने अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच इलेक्ट्रिक कदंब बसगाड्यांचे चालक यांच्या लक्षणीय उपस्थितीमुळे आंदोलन चर्चेत राहिले. देशभरातील सुमारे ३० कोटी कामगार या भारत बंदमध्ये सहभागी झाले आहेत.

कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, राजू मंगेशकर, प्रसन्ना उट्टगी, सुभाष नाईक जॉर्ज, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि गोवा सरकारी कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष जॉन नाझारेथ आदी उपस्थित होते.
फोन्सेका यांनी सांगितले की, केंद्र सरकारने मंजूर केलेले कायदे कामगारांचे हक्क कमी करतात, संघटना स्थापन करण्याच्या अधिकारांवर गदा आणतात आणि कामगारांच्या पिळवणुकीचा मार्ग मोकळा करतात. या कायद्यांमुळे कामगारांना सहजपणे कामावरून कमी करता येते. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, विमा, रेल्वे आणि इतर उद्योगांचे खाजगीकरण करून सरकार कामगारांचे भवितव्य खाजगी उद्योजकांच्या हाती सोपवत आहे, अशी टीका त्यांनी केली.
आवश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती, किमान वेतनवाढीची मागणी आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा विस्तार याकडे सरकार पुरेसे लक्ष देत नाही. शेतकऱ्यांचे खरे प्रश्न सोडविण्याऐवजी सरकार जुजबी अर्थसहाय्य देऊन त्याचा प्रचार करण्यात कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, असा टोलाही त्यांनी हाणला.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न
राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. महिलांच्या सशक्तीकरणाच्या घोषणा करणारे सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांबाबत सहानुभूती दाखवत नाही, असा सवाल संघटनांनी केला. ही सेवा पूर्णवेळ बनली असूनही कर्मचाऱ्यांना न्याय्य हक्क दिले जात नाहीत, अशी तक्रार करण्यात आली.
कंत्राटी व रोजंदारी कामगारांची पिळवणूक
राज्यातील भाजप सरकारने कंत्राटी व रोजंदारी कामगारांची पिळवणूक सुरू ठेवली आहे. आपल्या मर्जीतील लोकांचा भरणा करण्यासाठी अनेक वर्षांपासून सेवेत असलेल्या कामगारांना पद्धतशीरपणे कामावरून कमी केले जात आहे. खाजगी क्षेत्रात कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. सरकारी नोकऱ्यांचा बाजार मांडला जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.

……………………………………………………………………………………………………………………………………………………

कॅसिनो हटवाच
मांडवी नदीत नवे मोठे कॅसिनो जहाज येणार असल्याने त्याविरोधातील आंदोलनाची धार अधिक तीव्र झाली आहे. पणजीतील नागरिकांनी आज महानगरपालिकेत ठिय्या मांडून महापौरांची भेट घेण्याचा प्रयत्न केला.
या आंदोलनात स्वातंत्र्यसैनिक व पद्मश्री लिबिया लोबो सरदेसाई यांनीही उपस्थिती लावली. “आम्हाला स्वच्छ मासे खायचे आहेत, कॅसिनोंची घाण नाही,” अशा शब्दांत त्यांनी कॅसिनोंचा निषेध केला.
आपचे राज्य निमंत्रक वाल्मिकी नायक यांनीही आंदोलनात हजेरी लावली. मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना महानगरपालिकेतून बाहेर काढले, ज्याचा निषेध करण्यात आला.
बंदर खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांची भेट घेऊन नव्या कॅसिनो जहाजाला विरोध नोंदवला जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. मांडवीतून कॅसिनो हटविण्याच्या मागणीवर सर्वजण ठाम असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सबिना मार्टीन्स, पेट्रीशिया पिंटो आदी महिला कार्यकर्त्या हजर होत्या.

  • Related Posts

    सत्ताधारी नेतेच उतरले आंदोलनात

    मिराबागेत तेंडुलकर, पावसकर तर कोळशाविरोधात आमोणकर मैदानात गांवकारी, दि. ११ (प्रतिनिधी) सावर्डे मतदारसंघातील मिराबाग येथील वादग्रस्त बंधाऱ्याविरोधी आंदोलकांना माजी मंत्री, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर तथा…

    सुर्लातील डंप हाताळणीला गुपचुप मंजुरी

    स्थानिकांत तीव्र नाराजी, जनसुनावणीची मागणी गांवकारी, दि. १० (प्रतिनिधी) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातील सुर्ला येथे व्ही.एम. साळगांवकर अँड ब्रदर्स प्रा. लि. या कंपनीला खनिज डंप हाताळणीसाठी पर्यावरणीय…

    You Missed

    Mirabag Dam: A Battle Between People and Power

    Mirabag Dam: A Battle Between People and Power

    12/02/2026 e-paper

    12/02/2026 e-paper

    आझाद मैदानावर कामगारांचा एल्गार

    आझाद मैदानावर कामगारांचा एल्गार

    मिराबाग बंधाऱ्याचे गुपीत काय?

    मिराबाग बंधाऱ्याचे गुपीत काय?

    The Feudalization of Governance

    The Feudalization of Governance

    11/02/2026 e-paper

    11/02/2026 e-paper